राज्यातील निर्बंध १५ जूनपर्यंत कायम राहणार

जनदूत टिम    30-May-2021
Total Views |
मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं देशात हाहाकार माजला होता. त्याचा सर्वात मोठा महाराष्ट्रालाही बसला होता. सध्या राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असली तरी धोका अद्यापही कमी झालेला नाही. दरम्यान, रविवारी मुख्यमंत्रीउद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हद्वारे राज्यातील जनतेशी संवाद साधला.
 
uddhav-thackeray1121_2019
 
वर्ष दीडवर्ष अवघड असलेली म्हणजेच स्वत:वरील बंधनं अनुभवता आहात,” असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी सर्वांचे आभार मानले. “जी जनता आपल्यावर प्रेम करते त्यांच्यावर निर्बंध लादण्याचं कटू काम मला नाईलाजानं करावं लागत आहे. यावेळच्या कोरोनाबाधितांच्या सर्वोच्च संख्येचं शिखर सणासुदीपूर्वीच गाठलं आहे. गेल्या वेळी ते सणासुदीनंतर गाठलं होतं. म्हणावं तितकी संख्या अद्याप खाली आलेली नाही. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ९२ टक्क्यांवर आलाय ही दिलायासादायक बाब आहे,” असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी नमूद केलं.
 
“यावेळी आपण कडक निर्बंध लावले आहेत. लॉकडाऊन केलेला नाही. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या वाढताना दिसतंय. शहरी भागात संख्या कमी होतेय तर ग्रामीण भागात संख्या हलकी वाढताना दिसत आहे,” असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. राज्यातील निर्बंध १५ जूनपर्यंत कायम राहणार असून ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे तिकडे निर्बंध शिथिल करण्यावर तर ज्या ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे तेथे निर्बंध अधिक कठोर केले जाणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. ज्या लोकांना रस्त्यावर उतरायचं आहे त्यांनी कोरोना योद्धे म्हणून उतरावं असंही ते म्हणाले.
“तिसरी लाट ही आपल्या वागणुकीवर अवलंबून आहे. गेल्या लाटेतील विषाणू आणि यावेळी आलेल्या लाटेतील विषाणूमध्ये फरक आहे. संसर्गाचं प्रमाण वाढवण्याचं प्रमाण नव्या विषाणूमध्ये अधिक आहे. तसंच रुग्णांना बरं होण्यासही वेळ लागत आहे. रुग्णसंख्या गेल्या वेळच्या तुलनेत अधिक आहे,” असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले
कोरोनाच्या कालावधीत आपण अन्न सुरक्षा योजनेमध्ये २ लाख मेट्रिक टन अन्नधान्याचं वाटप केलंय. तर शिवभोजन योजनेचाही ५४-५५ लाख लोकांना फायदा झाला आहे. नोंदणीकृत कामगारांना १५४ कोटी रूपयांचा निधी खात्यात जमा केला आहे. फेरीवाले, घरकाम करणाऱ्यांसाठी, आदिवासींसाठी काही लाख रूपयांचा निधी जमा केल्याची माहितीही उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिली.
लसीकरण वेगवान करणार
४५ च्या वरील नागरिकांच्या लसीकरणाची जबाबदारी केंद्रानं घेतली आहे. तर त्या खालच्या वयोगटातील लोकांच्या लसीकरणाची जबाबदारी राज्याची आहे. एकरकमी लसीचे पैसे देण्याचीही आपली तयारी आहे. आपण चोवीस तास लसीकरण करू. आपली क्षमता आहे. परंतु त्याला मर्यादा आहे. लसीची उत्पादन क्षमता तितकी झालेली नाही. जून महिन्यापासून लसीचा पुरवठा सुरळीत होईल असं सांगण्यात आलं होतं. जशा लसी येतील त्याप्रमाणात लसीकरणाचा वेगही वाढवणार आहोत. सव्वादोन कोटी नागरिकांना आपण लसीकरण केलं आहे, अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. लवकरच १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचं लसीकरण लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
वर्षभरात किती वाढवल्या वैद्यकीय सुविधा
प्रयोगशाळा : ६००
डीसीएच, डीसीएचसी, सीसीसी : ६६७४
आयसोलेशन खाटा : ३ लाख २९ हजार ३३० ( १५.४१ टक्के भरले आहेत )
आयसीयू खाटा: ३१ हजार ४ ( ४८.२७ टक्के भरले आहेत )
ऑक्सिजन खाटा : १ लाख ५ हजार ७५९ ( ३२.४५ टक्के भरले आहेत )
व्हेंटीलेटर्स : १२ हजार ६१६ (५१ टक्के उपयोगात )
मास्क एन ९५ : २१ लाख ९८ हजार ५०५
पीपीई कीट : १३ लाख ९६ हजार २६
तौक्ते वादळामुळे मोठं नुकसान
यावेळी त्यांनी तौक्ते वादळामुळे झालेल्या नुकसानीवरही भाष्य केलं. त्या वादळानं आपल्याला मोठा फटका दिला. “या वादळाची माहिती मिनिटा मिनिटाला मी घेत होतो. कोकणचा दौरा केल्यानंतर नुकसानीचीही कल्पना आली. आपण नुकसान भरपाईची घोषणा केली आणि आता ती देण्यासही सुरूवात होणार आहे. केंद्राचे निकष बदलायला हवे. परंतु आपण गेल्यावेळी लावलेल्या निकषांप्रमाणेच मदत देणार आहोत,” असंही त्यांनी स्पष्ट केलं. आपल्याला किनारपट्टीवर कायमचे काही उपाय करण्याची गरज असल्याचंही उद्धव ठाकरे यांनी नमूद केलं.