कडावमध्ये तलावाच्या स्वच्छतेसह रस्ते, मो-या व वाहने पार्किंगच्या व्यवस्थेच्या कामांना वेग

जनदूत टिम    28-May-2021
Total Views |
कर्जत : मागील वर्षीपासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्याने जगात महामारी पसरली होती. त्यामुळे अनेक विकासकामे अर्धवट राहिली असल्याचे चित्र होते. मात्र आता कर्जत तालुक्यातील कडाव ग्रामपंचायतीने पुढाकार घेत विकासकामांत वेग घेतला आहे. त्यासह ग्रामपंचायत हद्दीतील विविध कामे मार्गी लावली जात आहेत.
 
kadav55_1  H x
 
कडाव ग्रामपंचायतीची निवडणुक झाली आणि कोरोनाच्या आलेल्या लाटांमध्ये विकासकामांनी गटांगळ्या खाल्या. परंतु, जसजसा कोरोना नियंत्रणात येऊ लागला तसे कडाव ग्रामपंचायतीने विकास कामे मंजुर करुन ती पुर्ण करण्याचा झपाटा लावल्याचे चित्र आहे. कडाव माणकिवली रस्त्यावरील धोकादायक झालेल्या मोरीच्या कामाचा शुभारंभ केल्यानंतर कडाव ग्रामपंचायतीने कडाव येथील तळ्याची वाडी व तलाव ह्यामधील असलेला रस्ता दोन्ही बाजुने खचला होता त्या रस्त्याची दुरुस्ती करुन त्याठिकाणी देखील नवीन मोरी बांधण्याच्या कामास सुरुवात केली.
 
कडाव येथील गणपती मंदिरात येणा-या भाविकांना वाहने पार्किंग करण्यासाठी कुठेही जागा नसल्यामुळे भाविक आपली वाहने मुख्य रस्त्याच्या दुतर्फा पार्क करत होते. त्यामुळे कडाव बाजारपेठेत वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत होती. भाविकांच्या वाहनांमुळे ट्रॅफिक होत असल्याने रायगड जिल्हा परिषदेचे माजी सभापती अशोक भोपतराव ह्यांच्या संकल्पनेतुन मंदिराच्या दक्षिण बाजुला तलावाच्या किनारी भरावा करुन वाहनांसाठी पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच उन्हाळ्यात कडाव गावातील तलावात मुबलक पाणी साठा होत नसल्यामुळे गावातील विहिरी व बोअरवेलचे पाणी आटुन जात होते. त्यामुळे गावातील नागरिकांना पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ येत होती.
 
म्हणुन कडाव ग्रामपंचायतीचे सरपंच अशोक किसन पवार यांनी ग्रामपंचायतमार्फत तलावातील गाळ व वाढलेली झाडे झुडपे काढुन टाकली आहेत. तेव्हा पावसाळ्यात पावसाचे पाणी तळ्यात अधिक साचेल व गावातील विहिरी व बोअरवेलचे पाणी आटणार नाही अशी सोय होणार आहे. तलावाच्या स्वच्छतेबरोबरच तलावाच्या क्षमतेपेक्षा अधिक प्रमाणात झालेले पाणी बाहेर जाण्यासाठी देखील अनंता उपाध्ये यांच्या घराजवळ तलावाला पाईप टाकुन नव्याने मोरी बांधण्यात आली आहे.
 
ह्याशिवाय कडाव तळ्याची वाडी येथील आदिवासी बांधवांसाठी लवकरच स्वतंत्र नळपाणी योजना सुरू करण्यात येणार असल्याची माहिती रायगड जिल्हा परिषदेचे माजी सभापती अशोक भोपतराव ह्यांनी दिली. कडाव ग्रामपंचायतीकडुन विकासाच्या वाटा मोकळ्या होत असल्याने नागरिक समाधान व्यक्त करत आहे.