जलसंपदा विभागाच्या मोऱ्या फार्महाऊसच्या दिमतीला, शासनाच्या पाईप मोऱ्यांचा खाजगीसाठी सर्रास वापर

जनदूत टिम    27-May-2021
Total Views |

  • फार्म हाऊस मालकासाठी जलसंपदा विभागाचे "रेड कार्पेट"

कर्जत : कर्जत तालुक्यातील प्रसिद्ध पाली भूतीवली धरण येथे धरणाच्या कामासाठी पाईप मोऱ्या ठेवण्यात आल्या आहेत. मात्र जलसंधारण विभागाच्या अखत्यारीतील या धरणाच्या पाईप मोऱ्या चक्क येथील एका फार्महाउस मालकाने स्वतःच्या फार्ममध्ये वापरल्या आहेत. शासनाच्या या पाईप मोऱ्यांचा वापर आता खाजगी वापरासाठी होत आहे. मात्र झोपेचे सोंग घेतलॆल्या जलसंधारण विभागाने या फार्म हाऊस मालकाकडे दुर्लक्ष करत त्यासाठी रेड कार्पेट अंथरल्याचा प्रकार समोर येत आहे. तेव्हा याबाबतीत शासनाला जाग येणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे.
 
nala_1  H x W:
 
कर्जत तालुक्यात पाण्याचे दुर्भिक्ष लक्षात घेऊन भविष्यात येथील शेती ओलिताखाली आणण्याच्या दृष्टीने पाली भूतीवली धरणाची निर्मिती झाली. या धरणासाठी तीन गावे स्थलांतरित करण्यात आली असून परिसरातील १५ गावामधील ११०० हेक्टर ज़मीन ओलिताखाली आणण्यासाठी हे धरण बांधले गेले. १९९२ मध्ये धरणाचे काम सुरू झाले आाणि धरणाची मुख्य भित २००४ मध्ये पूर्ण झाल्यानंतर धरणाच्या जलाशयात पाणीसाठा झाला. मात्र त्यावेळपासून आजतागायत धरणातील पाणी शेतीसाठी सोडण्याकरिता कालवे बांधण्यात आलेले नाहीत. पाटबंधारे खात्याला एवढ्या वर्षात कालवे बांधण्यासाठी जमिनीचे अधिग्रहण करता आले नाही. त्यामुळे येथील मुख्य कालवा आणि उजवा तसेच डावा असे १५ किलोमीटर लांबीचे कालवे बांधून पूर्ण झाले नाहीत.

nala445_1  H x  
 
परिणामी धरणाचे पाणी शेतीसाठी येत नाही अशी भूमिका पाटबंधारे भूमिका घेत असते. तर या धरणातील पाणीसाठा हा मृतसाठा असला तरी मध्यंतरी या धरणातील पाणी पाटबंधारे खात्याने एका बिल्डरला दिले होते. अशातच आता धरणाच्या खालच्या बाजूला जेथून कालवे काढले जाणार होते. त्याठिकाणी एका व्यक्तीचा फार्म हाऊस निर्माण केला जात आहे. या फार्म हाऊससाठी शासनाच्या जलसंधारण विभागाच्या पाटबंधारे खात्याचे पाईप मोऱ्या सर्रास वापरल्याची घटना घडली आहे. त्याचबरोबर प्रस्तावित धरणाच्या कालव्यांचे मार्ग वळवण्याचा उद्योग देखील या महाभागाकडून करण्यात आला आहे. मात्र या सगळ्याकडे जलसंधारण विभागाच्या रायगड लघु पाटबंधारे खात्याचे सपशेल दुर्लक्ष झाल्याचे चित्र आहे. गेले अनेक दिवस या मोऱ्या पळवून खाजगीसाठी वापरल्या जात आहे.
 
मात्र तरीही त्याकडे पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष झाल्याने पाटबंधारे विभागाची भूमिका संशयास्पद आहे. तर याबाबत कर्जत येथील जलसंधारण विभागाच्या रायगड लघु पाटबंधारे खात्याकडे विचारणा करण्याचा प्रयत्न केला असता उपअभियंता हे कार्यालयात आढळून आले नाहीत कि फोनवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी फोन उचललाच नाही. त्यामुळे पाटबंधारे विभागाने या फार्महाउस मालकालासाठी रेड कार्पेट अंथरल्याच्या चर्चाना ऊत आला आहे. तेव्हा आता शासन यात लक्ष देऊन दोषींवर कारवाईचा बडगा उगारणार कि पाटबंधारे विभागा गांधारीची भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.