शेतकरी विरोधी काळे कृषी कायदे रद्द करूनच परतणार – डॉ. अशोक ढवळे

जनदूत टिम    26-May-2021
Total Views |

  • १०,००० शेतकऱ्यांचे शक्तिप्रदर्शन, ३५० शेतकऱ्यांवरील खोटे खटले मागे..!

मुंबई : शेतकरी विरोधी काळे कृषी कायदे रद्द करूनच परतणार असल्याचे अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे सांगत हिसार येथे १०,००० शेतकऱ्यांच्या शक्तिप्रदर्शना मुळे हरियाणाच्या भाजप सरकारला ३५० शेतकऱ्यांवरील खोटे खटले मागे घ्यावे लागले. यावरून शेतकऱ्यांचा विजय नक्कीच आहे असे डॉ. ढवळे यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलता सांगितले.
 
mulani44_1  H x
 
यावेळी डॉ. ढवळे म्हणाले की, २४ मे रोजी हरियाणाच्या शेतकऱ्यांनी भाजपच्या राज्य सरकारविरुद्ध एक मोठा विजय मिळवला. त्या दिवशी संयुक्त किसान मोर्चाच्या नेतृत्वाखाली हिसार शहराच्या क्रांतिमान पार्क मध्ये १०,००० हून अधिक शेतकऱ्यांची विशाल सभा झाली. राज्य सरकारने त्या दिवशी आंदोलन दडपण्यासाठी ३,००० हून अधिक पोलीस आणि रॅपिड ऍक्शन फोर्सचे कमांडो तैनात केले होते. पण हजारो शेतकरी त्यांचे ट्रॅक्टर्स, ट्रॉली, टेम्पो, गाड्या व इतर वाहनांनी जमताच या दमन यंत्रणेचे काही एक चालले नाही. १६ मे रोजी हिसार येथे भाजपचे मुख्यमंत्री खट्टर यांच्या कार्यक्रमात हजारो शेतकऱ्यांनी शांततापूर्ण निदर्शने केली होती. त्यावर पोलिसांनी जबर लाठीहल्ला केला आणि अश्रुधुराच्या नळकांद्या फोडल्या.
 
शेकडो शेतकरी गंभीररीत्या जखमी झाले. त्यावर कडी म्हणजे पोलीस केसेस होणार नाहीत असे आधी मान्य करूनही दोन दिवसांनी भाजप सरकारने ३५० शेतकऱ्यांवर कलम ३०७ (खुनाचा प्रयत्न) व इतर गंभीर कलमे लावून खटले भरले. २४ मे रोजी शेतकऱ्यांनी विभागीय आयुक्त कार्यालयाला घेराव घालण्याचे ठरवले होते. पण घेराव सुरू होण्यापूर्वीच प्रशासनाने एसकेएम ला चर्चेचे आमंत्रण दिले. विभागीय आयुक्त व इतर अधिकाऱ्यांशी तब्बल चार तास चर्चा झाली. शेवटी ३५० शेतकऱ्यांवरील १६ मे चे व त्यापूर्वीचे सर्व पोलीस खटले मागे घेण्याचे, १६ मे रोजी पोलिसांनी शेतकऱ्यांच्या ज्या अनेक वाहनांची नासधूस केली होती त्यांची नुकसानभरपाई देण्याचे, आणि रामचंद्र नावाचा जो शेतकरी २४ मे च्या आंदोलनात हृदयविकाराच्या झटक्याने मरण पावला त्याच्या कुटुंबातील एकाला सरकारी नोकरीत सामावून घेण्याचे प्रशासनाला मान्य करावे लागले. १६ मे च्या पोलीस दडपशाहीबद्दल आयुक्तांनी दिलगिरी व्यक्त केली. शेतकरी आंदोलनाचे हे सर्व मोठे विजय होते.
 
हिसारच्या विशाल सभेत जनविरोधी आणि कॉर्पोरेटधार्जिण्या मोदी सरकारवरही टीकेची झोड उठविण्यात आली आणि २६ मे चे देशव्यापी आंदोलन प्रचंड यशस्वी करण्याची हाक देण्यात आली. संयुक्त किसान मोर्चाच्या ज्या नेत्यांनी या विशाल सभेस संबोधित केले आणि प्रशासनासोबतच्या चर्चेत भाग घेतला त्यांत बलबीर सिंग राजेवाल, जोगिंदर सिंग उग्राहान, गुरनाम सिंग चडुनी, राकेश टिकैत, डॉ. अशोक ढवळे, जगजीत सिंग दलेवाल, युधवीर सिंग, इंदरजीत सिंग, सुरेंद्र सिंग, पी. कृष्ण प्रसाद, मेजर सिंग पुनेवाल, फूलसिंग शेवकंद, सुमीत यांचा समावेश होता, अशी माहिती अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे यांनी दिली आहे.