लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्या वाहन चालकांची उपासमार

भूषण सुतार    25-May-2021
Total Views |

  • हॉटेल-भोजनालय बंद; प्रात्यविधीसही गैरसोय

पाली/गोमाशी: लॉकडाऊन असला तरी अत्यावश्यक सेवा आणि मालवाहतूक सुरू आहे. पण हॉटेल व भोजनालये बंद आहेत. अशावेळी लांब पल्ल्याच्या वाहनचालकांना मुंबई-गोवा महामार्ग, मुंबई बैंगलोर महामार्ग व इतर राज्य महामार्गावर जेवण मिळणे दुरापास्त झाले आहे. त्यामुळे किमान लांब पल्ल्याच्या वाहन चालकांसाठी जिल्ह्यातून जाणाऱ्या महामार्गांवर शिवभोजन थाळी किंवा जेवणाची व्यवस्था करावी अशी मागणी प्रहार वाहन संघटनेचे जिल्हा प्रतिनिधी बल्लेश उदय सावंत यांनी केली आहे.
 
pali455_1  H x
 
लांब पल्ल्याच्या वाहनचालकांची खूप गैरसोय होत आहे. खायला साधे चणे सुद्धा भेटत नाही आहे. पाण्यासाठी सुद्धा वणवण करावी लागते. शिवाय प्रात्यविधी व आंघोळीसाठी देखील गैरसोय होत आहे. असे कर्नाटक विजापूर येथील ट्रक ड्रायव्हर सुनील लमाणी यांनी सांगितले. तर प्रहार जनशक्ती पक्षाचे रायगड जिल्हा सरचिटणीस ऍड. काशीनाथ ठाकूर यांनी सांगितले की हॉटेल बंद असल्याने की लांब पल्ल्याच्या वाहन चालकांची खूप गैरसोय होते. वाटेत त्यांना काहीतरी खाण्याची व्यवस्था करावी किंवा शिवभोजन थाळी देण्यात यावी. यासाठी मंत्रालयात मागणी करणार आहे.
रात्रीचा प्रवास करतांना तर खूप गैरसोय होते. चहा सुद्धा मिळत नाही. तोंडावर पाणी मारण्यासाठी रस्त्याच्या कडेला साठलेले पावसाचे पाणी मारले होते. किमान लांब पल्ल्याच्या वाहनचालकांना शासन किंवा समाजसेवी संघटनांनी खाण्यापिण्याची व्यवस्था करावी.
- बल्लेश उदय सावंत, प्रहार वाहन संघटना, रायगड जिल्हा प्रतिनिधी