जि.प.अध्यक्षपदी पुष्पा बोहाडे पाटील?

जनदूत टिम    23-May-2021
Total Views |

शुक्रवारी निवडणूक :सुषमा लोणे यांनी राजीनामा दिल्याने पद होते रिक्त

ठाणे : ठाणे जिल्हा परिषदेच्या १५ दिवसांपासून रिक्त असलेल्या अध्यक्षपदाची निवडणूक शुक्रवार, २८ मे रोजी घेण्याची घोषणा कोकण विभागीय आयुक्तांनी केली आहे. सुषमा लोणे यांनी राजीनामा दिल्याने अध्यक्षपद रिक्त झाले होते. आता निवडणूक होणार असल्याने शिवसेनेतील इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. अंबरनाथच्या चरणाव गटाचे नेतृत्व करणाऱ्या पुष्पा बोहाडे पाटील यांचे पारडे जड असून त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.
 
लोणे यांनी राजीनामा दिल्याने उपाध्यक्ष सुभाष पवार हे प्रभारी अध्यक्ष म्हणून कारभार पाहत आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे लागू केलेली संचारबंदी विचारात घेऊन जि. प. अध्यक्षपदाची निवड लांबणीवर टाकली होती. मात्र २८ मे रोजी या पदाची निवड घोषित केली आहे. अध्यक्षपदाचा दीड वर्षांचा कार्यकाळ अजून बाकी आहे.
 
दहा महिन्यांनंतर शिवसेनेच्या पक्षश्रेष्ठींनी राजीनामा देण्याचे फर्मान काढताच लोणे यांनी कोकण विभागीय आयुक्तांकडे राजीनामा दिला. दुसऱ्या टर्मकरिता हे पद ओबीसी महिला प्रवर्गाकरिता आरक्षित आहे. पक्षनिष्ठ महिला सदस्याची चाचपणी करण्यात येत आहे. दोन ते तीन इच्छुकांचा समावेश असल्याचे सुतोवाच प्रभारी अध्यक्ष पवार यांनी केले. नगरविकासमंत्री व पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतर उमेदवाराची घोषणा होईल.