कल्याण तालुक्यात पंचनामे वेगाने सुरू

जनदूत टिम    20-May-2021
Total Views |
कल्याण : रविवार झालेल्या तौक्क्ते चक्रीवादळाचा तडाखा कल्याण तालुक्यातील ग्रामीण भागाला अधिक बसला असून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी वेगाने नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण महसूल विभाग अधिक गतिमान झाला आहे. आतापर्यंत तालुक्यात ३९२ च्या आसपास पंचनामे करण्याचे काम पूर्ण झाली असून सर्वाधिक पंचनामे हे म्हारळ (कल्याण) सर्कल मधील वाहोली तलाठी सजेत झाले आहेत तर एकही पंचनामा चौरे तलाठी सजेत झाला नसल्याची माहिती मिळते.
 
vadal_1  H x W:
 
कोरोना चे महासंकट असतानाच अचानक तौत्के चक्रीवादळाचे अजून एक संकट कोसळले. यामध्ये कोकण किनारपट्टीला सर्वाधिक फटका बसला असला तरी ठाणे, पालघर जिल्ह्यातील गावेदेखील मोठ्याप्रमाणात बाधित झाली. कल्याण तालुक्यातील गोवेली, ठाकूरपाडा, आपटी बा-हे, आपटी चोण, मांजर्ली, बांधण्याचा पाडा, फळेगाव, उशीद,पठारपाडा, आदी गावांमध्ये घराचे पत्रे, लाईटपोल, झाडे, आदीचे मोठे नुकसान झाले. गोवेली ठाकूरपाडा येथील गणपत हिंदोळे, सुरेश हिंदोळे, जीवनदीप विद्यालय, आपटी मध्ये महेंद्र म्हसकर, शत्रू शिसवे, राजेश शिसवे, प्रभाकर शिसवे, शंकर म्हसकर, तसेच आपटी कातकरी वाडी येथील श्रीमती भिमाबाई वाघे, वैजयंती जाधव व गोटीराम जाधव या ३ ते ४ कातकरी समाजातील लोकांचे पूर्ण घरांचे मोठे नुकसान झाले आहे.
 
तौक्क्ते चक्रीवादळाचा तडाखा बसलेल्या नागरिकांना तात्काळ नुकसान भरपाई मिळावी म्हणून या नुकसानीचे पंचनामे वेगाने करण्याचे आदेश मुख्यमंत्री यांनी महसूल विभागाला दिले होते. त्यानुसार ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण तहसीलदार दिपक आकडे यांच्या सूचनेनुसार मंडल अधिकारी अप्पर कल्याण, ठाकुर्ली, नडगाव आणि टिटवाळा आणि म्हारळ, तलाठी सजा २८ सह वेगाने कामाला लागले. यामध्ये सजा कल्याण, चिकणघर, शहाड, आंबिवली, सापाड, मांडा, काटेमानिवली, नेतिवली, हेदूटणे, निळजे, दावडी, डोंबिवली, आयरे, ठाकुर्ली, भोपर, चोळे, टिटवाळा, बापसई, रायते, कुंदे, चवरे,वाहोली, वसतशेलवली, खडवली, कोसले, नडगाव, फळेगाव आणि वासुर्दी यांचा उल्लेख आहे.
 
प्रत्येक सजेचे तलाठी सकाळ पासून गाव अन गाव पिंजून काढत आहेत. अप्पर कल्याण मंडल अधिकारी मध्ये जवळपास ११० पंचनामे झाले आहेत. नव्यानेच निर्माण झालेल्या म्हारळ मंडल सर्कल मध्ये सर्वाधिक म्हणजे २१८ च्या आसपास नुकसान पंचनामे झाले असल्याची माहिती मंडल अधिकारी पवार यांनी दिली. तर सर्कल ठाकुर्ली, नडगाव आणि टिटवाळा यांची माहिती मिळू शकली नाही. तलाठी सजा फळेगाव मध्ये एक पंचनामा, रायते ८,वाहोली सर्वात जास्त म्हणजे सुमारे १०० च्या आसपास, तर चवरे तलाठी सजेत एकही नुकसान पंचनामे झाले नाहीत. या ठिकाणी सुदैवाने येथे वादळाचा फटका बसला नाही.
 
सर्वाधिक नुकसान झालेल्या वाहोली तलाठी सजेत वाहोली, आपटी बा-हे, आपटी चोण, मांजर्ली आणि बांधणेचा पाडा अशी गावे आहेत. येथील तलाठी कुलदीप कांबळे हे सकाळ पासून घरोघरी फिरून पंचनामे करत होते. कोणीही नुकसान भरपाई पासून वंचित राहू नये हा उद्देश त्यांचा होता. साधारणपणे तालुक्यात ३१२च्या आसपास पंचनामे होतील असा अंदाज नायब तहसीलदार सुषमा बांगर यांनी व्यक्त केला. तर अजूनही आमचे कर्मचारी पंचनामे करीत आहेत. सर्व पंचनामे झाल्यानंतर निश्चित नुकसानीचा आकडा सांगता येईल, असे तहसीलदार दिपक आकडे यांनी सांगितले.
 
कोरोनाच्या भंयकर संकटातही अनेक कर्मचारी कोरोनामुळे मृत्यू पावले असताना, याची तमा न बाळगता तहसीलदार दिपक आकडे,यांचे सूचनेनुसार नायब तहसीलदार संजय भालेराव, सुषमा बांगर, सर्व मंडल अधिकारी, तलाठी व कर्मचारी घरोघरी जाऊन पंचनामे केल्याने त्यांचे कौतूक होत आहे.