दोन कोटी लसी जमिनीतून उगवल्या का?

जनदूत टिम    20-May-2021
Total Views |
मुंबई : कालच राज्याने दोन कोटी लसींचा टप्पा पूर्ण केल्याचं जाहीर केलं. या लसी कुठून आल्या?जमिनीतून उगवल्या का? असा सवाल उपस्थित करत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर टीका केली आहे. एबीपी माझाच्या एका मुलाखतीदरम्यान बोलताना त्यांनी वेगवेगळ्या विषयांवर भाष्य केलं आहे.
 
Devendra-Fadanvis-1_1&nbs
 
राज्य करोनाची परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरल्याचं सांगत त्यांनी राज्य सरकारवर टीका केली. हे सरकार फक्त मुंबईचं सरकार असल्याची टीकाही त्यांनी केली. ते म्हणाले की, ह्या सरकारला मुंबईच्या बाहेरचा महाराष्ट्र दिसत नाही. नागपूरमध्ये तर सरकारचं एकही कोविड सेंटर नाही, जे आहेत ते महापालिकेचेच आहेत. करोनाकाळात सरकारने मुंबईच्या बाहेर बघितलंच नाही.
लसींच्या बाबतीत बोलताना फडणवीस म्हणाले, “महाराष्ट्रापेक्षा दुप्पट लोकसंख्या असलेल्या उत्तर प्रदेशला दीड कोटी लसी आत्तापर्यंत मिळाल्या आहेत. तर महाराष्ट्राला दोन कोटी लसी मिळाल्या. या लसी कुठून आल्या? जमिनीतून उगवल्या का? केंद्रानेच दिल्या ना..तरीही सरकार कांगावा करत आहे. काही नेत्यांची स्क्रिप्ट ठरलेली असते. केंद्राने दिलं नाही, केंद्राने करायला पाहिजे. याच गोष्टी हे नेते रोज सकाळी उठून जे घडेल त्याबद्दल बोलत असतात.”
 
राज्याला सर्वाधिक ऑक्सिजन मिळाल्याचंही फडणवीसांनी यावेळी सांगितलं. ते म्हणाले, “महाराष्ट्राला सर्वाधिक ऑक्सिजन पुरवण्यात आला आहे. यावरुन दिल्लीच्या कोर्टात सुनावणीही सुरु आहे की, महाराष्ट्राला सर्वात जास्त ऑक्सिजन का? तरीही सरकार केंद्राच्या नावाने कांगावा करत आहे. सरकारला वाटत आहे की त्यामुळे गोंधळ निर्माण होईल. पण हा गोंधळ तात्पुरत्या स्वरुपाचा आहे. तो ओसरल्यावर नागरिकांना सगळं काही खरं कळतंच.” महाडमध्ये ते एबीपी माझा या वृत्त वाहिनीशी बोलत होते. त्यांनी तौते चक्रीवादळामुळे कोकण किनारपट्टी भागातल्या नुकसानीची पाहणीही केली.