विजेचा खेळखंडोबा थांबवा अन्यथा तीव्र आंदोलन छेडणार - धर्मेंद्र मोरे

जनदूत टिम    19-May-2021
Total Views |
कर्जत : चक्रीवादळाने रायगड जिल्ह्यात कहर माजवला. यामध्ये विविध ठिकाणी विद्यूत पुरवठा खंडित झाला आहे. मात्र वादळाची पूर्वसूचना हवामान विभागाकडून असतानाही महावितरण जागरूक न राहिल्याने कर्जत परिसरात विद्युत पुरवठा बंद झाला आहे. यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याने वंचित बहुजन आघाडीकडून संताप व्यक्त करण्यात आला आहे. विजेचा खेळखंडोबा थांबवा अन्यथा तीव्र आंदोलन छेडणार असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे कर्जत तालुकाध्यक्ष धर्मेंद्र मोरे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
 
dha77_1  H x W:
 
हवामान खात्याने चक्रीवादळ येणेबाबतचा अंदाज अगोदर वर्तविला होता. त्यानुसार सरकारने महावितरणला तयारीत राहण्यास सांगितले होते. परंतु एमएस्ईबी अधिकारी यांनी कुठल्याही प्रकारची दक्षता घेतली नाही. त्यामुळे कर्जत तालुका दोन दिवस पुर्ण अंधारात राहीला. एकीकडे कोरोनाचे वाढते रुग्ण, उष्णता, विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन परिक्षा, घरुन काम करणारे आदी सर्वावर खुप परिणाम होऊन नागरीकांना खुप मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. तर दुसरीकडे लाॅकडाऊनमध्ये महावितरणने विजबिले माफ केली नाहीत. उलट ज्यांनी बिलं भरली नाहीत त्यांचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला. असं असताना त्या पद्धतीने सेवा महावितरण देत नाही. हा एक प्रकारे नागरिकांवर अन्याय आहे. तालुक्यातील नागरिकांनी वारंवार तक्रारी करुन सुद्धा पडायला आलेले पोल, तसेच अडचणीतले कनेक्शन यासंदर्भात महावितरणचे अधिकारी व कर्मचारी वेळीचं लक्ष देत नाहीत. त्यामुळे आता सारखी गंभीर परिस्थिती तयार होते.
 
काही दिवसात पाऊस सुरू होईल तसेच अशा प्रकारचे वादळे येत राहतील. तरी महावितरणने पुन्हा अशी परिस्थिती येणेची वाट पाहण्यापेक्षा आतापासूनच तालुक्यातील सर्व गंजलेले पोल, नादुरुस्त पोल, तसेच इतर कनेक्शन अशी सर्व कामे त्वरीत पुर्ण करावीत. पुन्हा जर नागरीकांना अंधारात रहावं लागले, कुठल्या रुग्णाचा जीव गेला, विद्यार्थी, कामगार, शेतकरी, व्यापारी यांच्या नुकसानास महावितरण जबाबदार असेल. तेव्हा वंचित बहुजन आघाडीकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा असलेले निवेदन महावितरणचे कर्जत येथील उपअभियंता प्रकाश देवके यांना देण्यात आले आहे.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष धर्मेंद्र मोरे, शहर अध्यक्ष लोकेश यादव, विद्यार्थी संघटनेचे अमित गायकवाड आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.