‘ओएनजीसी’चं जहाज बुडालं

जनदूत टिम    18-May-2021
Total Views |

  • २६० पैकी १४७ जणांना वाचवण्यात यश

मुंबई: अरबी समुद्रात निर्माण झालेलं तौते चक्रीवादळ सोमवारी मुंबईपासून गुजरातच्या दिशेनं गेलं. रौद्रवतार धारण केलेल्या या चक्रीवादळामुळे कोकण किनारपट्टी, मुंबईसह इतर शहरांना फटका बसला. चक्रीवादळाच्या तडाख्यात सापडल्याने ‘बॉम्बे हायजवळच्या परिसरात ओएनजीसी’चं पी ३०५ (पापा-३०५) मोठं जहाज बुडाल्याची घटना घडली. रविवारी सायंकाळी जहाजावरून एसओपी संदेश मिळाल्यानंतर नौदलाने मदत व बचावकार्य हाती घेतलं होतं. जहाजावर २६० लोक होते, त्यापैकी १४७ जणांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आलं असून, इतरांचा शोध घेतला जात आहे. नौदल आणि ओएनजीसीच्या प्रवक्त्यांनी ही माहिती दिली.

ONGC-barge-capsized-off_1
 
मुंबईजवळच्या अरबी समुद्रात ‘बॉम्बे हाय’ असून, तेथे तेल उत्खनन होते. याच परिसरात हिरा ऑईल क्षेत्र असून, याठिकाणी ‘ओएनजीसी’चं जहाज पी ३०५ उभं होतं. दरम्यान, कोकण किनारपट्टी ओलांडून तौते चक्रीवादळ मुंबईच्या दिशेनं सरकले. त्यानंतर जहाज अपघातग्रस्त झालं. चक्रीवादळाबरोबरच प्रचंड मोठ्या लाटा येत असल्याने जहाजाचा नांगर दूर गेला आणि जहाज भरकटायला लागलं. त्यानंतर जहाजावरून नौदलाला एसओपी (जहाज संकटात वा बुडत असल्यास जो संदेश पाठवला जातो, त्याला संक्षिप्त स्वरूपात एसओपी म्हटलं जातं) संदेश पाठवण्यात आला. या जहाजांच्या मदतीला INS कोच्ची, INS कोलकाता या दोन मोठ्या युद्धनौका पाठवण्यात आलं होतं, असं ओएनजीसीच्या प्रवक्त्यांनी सांगितलं.
आयएनएस कोच्ची आणि आयएनएस कोलकाता या युद्ध नौकांबरोबरच मदतीलाओएनजीसीची समुद्र किनाऱ्यालगत असलेली ओएसव्ही आणि तटरक्षक दलाचं आयसीजी समर्थ या दोन नौकाही मदत कार्यासाठी पाठवण्यात आल्या होत्या. ओएनजीसीच्या पी ३०५ जहाजाने जलसमाधी घेतली असून, असलेल्या २६० जणांपैकी १४७ जणांना सुखरूप वाचवण्यात नौदलाला यश आलं आहे. सकाळपासून इतरांचा शोध घेतला जात आहे. नौदलाचे पी ८१ हे जहाज समुद्रात इतरांचा शोध घेत आहे. या शोध मोहिमेत किनारलगत तैनात असणाऱ्या एनर्जी स्टार आणि अहल्या या दोन नौकाही उतरवण्यात आल्या असल्याचं नौदलाच्या वतीने सांगण्यात आलं आहे.
अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीमध्ये रात्रभर शोध मोहीम सुरू ठेवण्यात आली. मंगळवारी सकाळपर्यंत पी३०५ वरून १४६ लोकांना वाचवण्यात आलं आहे. आयएनएस कोच्ची आणि आयएनएस कोलकाता या युद्धनौकांनी १११ लोकांना वाचवलं आहे. तर ओएसव्ही आणि ग्रेटशिप अहिल्या या दोन्ही नौकांनी १७ लोकांना वाचवले. ओएसव्ही ओशन एनर्जी या नौकेने १८ जणांना सुखरूप बाहेर काढलं, असं नौदलाकडून सांगण्यात आलं आहे.
वारा प्रभा जहाजही चक्रीवादळाच्या तडाख्या सापडलं. जहाज भरकटल असून, आयएनएस कोच्ची या युद्धनौकेनं जहाजावरील दोघांना सुखरूप बाहेर काढलं आहे.
चक्रीवादळामुळे गल कन्स्ट्रक्शन जहाज कुलाबा पॉईंटच्या उत्तरेस ४८ ‘सागरी मैल दूर गेलं. त्यावर १३७ लोक होते. आपतकालीन मदत करणाऱ्या वॉटल लिली आणि इतर दोन जहाजांना मदतीसाठी पाठवण्यात आलं आहे. त्याचबरोबर आयएनएस तलवार ही युद्धनौकाही अन्य तेल उत्खनन होत असलेल्या क्षेत्रात मदतीसाठी पाठवण्यात आली आहे. सागर भूषण आणि एनएस ३ या जहाजांच्या मदतीसाठी ही युद्धनौका पाठवण्यात आली असून, दोन्ही जहाज पीपावाव बंदरापासून दक्षिण पूर्वेस जवळपास ५० सागरी मैल दूर आहेत, अशी माहिती नौदलाकडून देण्यात आली आहे.