दैव देत कर्म नेत अशी अश्वपालकांची अवस्था

दिपक पाटील     13-May-2021
Total Views |

  • घोड्यांच्या चारा वाटपावरून माथेरान मधील दोन संघटनेत वाद...
  • समाज भेदभाव करीत असल्याचा आरोप

माथेरान : राज्यात कोरोनामुळे गतवर्षीप्रमाणे यंदा देखील माथेरान या थंड हवेच्या ठिकाणी पर्यटन व्यवसाय ठप्प झाला आहे. त्यामुळे येथील अश्वचालकांवर बिकट परिस्थिती ओढावली असून त्यांच्या मुक्या प्राण्यांच्या म्हणजे घोड्यांच्या चाऱ्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. तेव्हा माथेरान आणि येथील अश्वचालकांवर प्रेम करणाऱ्या अनेक दानशूर व्यक्ती समोर येऊन घोड्यांच्या चारा देण्यासाठी मदतीचा ओघ सुरु झाला. पण येणाऱ्या मुबलक मदतीमुळे येथील दोन संघटनांमध्ये वाद निर्माण झाला आहे. चारा वाटपात घोळ होत असल्याचा आरोप होऊन हा वाद विकोपाला गेला. दरम्यान दैव देत कर्म नेत अशी गत येथील संघटनांची झाली असून यात गरजू अश्वपालक मात्र भरडले जात आहेत. तर पर्यटन बंद असताना अशा प्रकारचा वाद होणे ही दुर्दैवी घटना असल्याचा सूर ऐकावयास मिळत आहे.
 
mathera113_1  H
 
जगप्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण असलेले माथेरान हे पूर्णपणे प्रदूषण मुक्त आहे. माथेरानमध्ये प्रदूषणमुक्त वातावरणाचा आनंद घेण्यासाठी दरवर्षी लाखो पर्यटक भेट देत असतात. येथील स्थायिक कुटुंबांचा आर्थिक गाडा हा पूर्ण पर्यटन व्यवसायावरच अवलंबून आहे. पर्यावरण संवेदनशील क्षेत्र असल्याने माथेरान पूर्णपणे वाहन मुक्त आहे. येथे येणाऱ्या पर्यटकांवर येथील घोडेवाले, हातरिक्षावाले, हॉटेल चालक, यासह येथे छोटेमोठे उद्योग करणारे सर्वेच आपले कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. उन्हाळी सुट्टी, पावसाळा, दिवाळी, ख्रिसमस, नवीन वर्ष हे येथील पर्यटन हंगाम. यापैकी उन्हाळी सुट्टी व नवीन वर्ष हे येथील मुख्य पर्यटन हंगाम आहे.
 
या पर्यटन हंगामावरच येथील कुटुंबांचे वर्षभराचे अर्थाजन अवलंबून असते. मात्र मागील वर्षी भारतात दाखल झालेल्या कोरोना या विषाणूला थोपवण्यासाठी शासनाकडून लॉकडाऊन करण्यात आले. त्यामुळे येथील आर्थिक घडी पूर्णपणे विस्कटली गेली. मिशन बिगिन सुरु झाले त्यानंतर माथेरान जुने सगळे विसरून पुन्हा कामाला लागले. मात्र मागील काही दिवसात कोरोनाची दुसऱ्या लाटेत पुन्हा एकदा कोरोना डोके वर काढू लागला कर्जत तालुक्यात आणि माथेरानमध्येही कोरोना संक्रमित रुग्ण संख्या वाढू लागली. त्यासह आता संपूर्ण लॉकडाऊन जाहीर झाले आहे. त्यामुळे पर्यटकांनी माथेरानकडे पूर्णतः पाठ फिरवली. तेव्हा येथील पर्यटनावर अवलंबून असलेल्या अश्व व अश्वपालकांना देखील मोठा फटका बसला आहे. माथेरानमध्ये पर्यटनात पर्यटकांसाठी घोडा हा प्रवासाचे मुख्य साधन आहे.त्यात फक्त घोडेस्वारीसाठी माथेरानमध्ये अनेक गर्भश्रीमंत आणि हौशी पर्यटक नियमित येत असतात. त्यातील अनेकांचे स्थानिक अश्वचालकांसोबत घरोप्याचे संबंध निर्माण झाले आहेत. यात अनेक सिनेकलावंतही आहेत. त्यामुळे ज्या ज्या वेळेला अश्वचालकांना मदतीची गरज भासते, तेव्हा हे अश्वप्रेमी मदतीसाठी स्वतःहून पुढे येत असतात. माथेरानचे पर्यटन बंद झाल्याने येथील घोड्यांना चारा व खाद्याची गरज आहे, असे आवाहन येथील स्थानिक अश्वपाल संघटनेने करताच येथे मदतीचा ओघ सुरु झाला.
 
मात्र त्याचवेळेस माथेरानचे प्रवेशद्वार असलेल्या दस्तुरी नाका येथे व्यवसाय करीत असलेल्या मूळवासीय अश्वपाल संघटनेनेही असेच आवाहन केले. दोन्ही संघटनांना वेगवेगळ्या दानशूर व्यक्तींकडून मदतीचा ओघ सुरू आहे. या संघटना आपापल्या सभासदांना भुसा व चारा वाटप करीत आलेल्या होत्या. त्यातच वाटपासाठी गोणी भुशावरुन दोन्ही संघटनांमध्ये संघर्ष निर्माण झाला आहे. दोन्ही संघटनांनी एकमेकांवर भुसा वाटपामध्ये घोळ केला जात असल्याचे आरोप केले आहेत. त्यातील मूळवासीय अश्वपालक संघटनेने स्थानिक अश्वपाल संघटनेवर धनगर समाजातील अश्वचालकांना डावलून आपल्या मर्जीतील लोकांना भुसा वाटप करीत असल्याचा आरोप केला आहे. तर दुसरीकडे माथेरान मधील स्थानिक अश्वपाल संघटना ही कोणताही जातीभेद न करता सर्व सभासदांना समान भुसा वाटप कसे करता येईल याकडे लक्ष देत नसल्याचा आरोप केला जात आहे.
माथेरानमध्ये 460 घोड्यांचा भुसा येत आहे. परंतु अश्वपाल संघटनेच्या अध्यक्षांनी तो परस्पर वाटला आहे. त्यातून स्थानिक धनगर समाजातील सदस्यांनाच स्थानिक डावलले जात आहे. जवळजवळ तीन पिढ्या या सदस्यांच्या या धंद्यामध्ये जाऊनही यांना डावलले जात आहे. यापुढे सर्व प्राणीमात्रांना नम्र विनंती आहे की, ज्यांना भुसा वाटप करायचा असेल त्यांनी स्वतः येऊन भुसा वाटप करावा. जेणेकरुन सर्वांना भुसा मिळेल अन्यथा भुसा नाही दिला तरी चालेल.
- राकेश कोकळे -अध्यक्ष, स्थानिक धनगर समाज
आजवर मला फक्त माझ्या घोड्यासाठी दोनच गोणी भुसा मिळाला आहे. मी स्वतः काबाडकष्ट करून मिळवलेल्या पैशातून माझ्या अश्वाचा सांभाळ करत आहे.
- मंगेश विष्णू ढेबे, स्थानिक अश्वपालक
माथेरान अश्वपाल संघटना ही एक कुटुंब असून त्यामध्ये सर्वधर्मीय सभासद आलेल्या मदतीचा लाभ घेत असतात. स्थानिक अश्वचालक इमानेइतबारे व्यवसाय करीत असल्याने अनेकजण स्थानिकांना मदत करण्यास नेहमीच तत्पर असतात. जी सर्व सभासदांमध्ये समान वाटणी केली जाते; पण मूळवासीय संघटना यांच्याकडे आलेली मदत फक्त स्वतःच्या संघटनेतच वाटप करीत असल्याने त्यांना आमच्याकडे मदत मागण्याचा अधिकार नाही.
- आशाताई कदम- अध्यक्षा, अश्वपाल संघटना