अघोषित लॉकडाऊनवर फेरविचार करा : देवेंद्र फडणवीस

जनदूत टिम    08-Apr-2021
Total Views |

  • व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाची भेट

मुंबई : विविध व्यापारी संघटनांनी आज माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना आपले निवेदन सादर केले. कोरोना रोखण्यासाठी लावण्यात आलेल्या निर्बंधांमुळे एकूणच अर्थकारणाला, यातून केवळ व्यापार नाही, तर श्रमिकांच्याही अर्थकारणाला बसलेली मोठी खीळ बसली आहे. त्यामुळे तातडीने या निर्बंधांबाबत फेरविचार करण्यात यावा, अशी मागणी यावेळी या संघटनांनी केली.
 
Devendra-Fadanvis-1_1&nbs
 
यात फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ महाराष्ट्र, हिंदुस्तान चेंबर ऑफ कॉमर्स, मेटल अँड स्टेनलेस स्टील मर्चंट्स असोसिएशन, फॅब्रिक मर्चंटस असोसिएशन, भारत मर्चंट चेंबर्स, कन्फिडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स, वैश्य महासंमेलन, नॅसकॉम आणि इतरही संस्थांचा समावेश होता. या व्यापारी बांधवांनी यावेळी आपल्या व्यथा व्यक्त केल्या. गेल्यावर्षी लॉकडाऊन लागला, त्यावेळी आम्ही सहकार्य केले. पण, आता पुन्हा इतके कठोर निर्बंध हे आत्महत्येसारखेच पाऊल ठरेल, असे संघटनांनी सांगितले.
 
अशाप्रकारचे निर्णय घ्यायचेच असतील, तर सर्व व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधींना एकदा तरी बोलावून ऐकून घ्यायला हवे होते, अशाप्रकारच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या. या सर्व व्यापार्‍यांनी श्रमिकांच्या भोजनाची, प्रवासाच्या खर्चाची व्यवस्था केली. पण, सरकारकडून कोणतीही मदत मिळालेली नाही. कोरोना काळात सुद्धा सामाजिक जाणीवेतून निधी गोळा करून गरजूंना मदत करण्याचे काम या संघटनांनी केले. मात्र, आज एप्रिल महिनाभर त्यांचा व्यापार पूर्णपणे बंद करून टाकण्यात आला आहे. हॉटेल व्यवसायिकांच्या समस्या फारच मोठ्या आहेत. आज मुंबई किंवा अनेक मोठ्या शहरांमध्ये अनेक लोक हे रात्रीच्या जेवणासाठी टेकहोम वर विसंबून असतात.
 
31 मार्च रोजी विविध कर जमा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात दबाव आणून पैसे भरायला लावले. गेले वर्षभर प्रत्येकच जण आर्थिक तणावात आहे. मात्र, उधारी घेऊन हे विविध कर जमा करायला सांगून आता पूर्णच व्यापार बंद करण्यात आला आहे, अशा व्यथा त्यांनी व्यक्त केल्या. एवढेच नाही तर जे व्यवहार केवळ फोनवरून ऑर्डर घेतल्या जातात आणि वितरण केले जाते, असेही व्यवसाय पूर्णपणे ठप्प करण्यात आल्याच्या तक्रारी त्यांनी केल्या आहेत.
 
ही सर्व निवेदने देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना आणखी एक पत्र लिहून पाठविली आहेत. या स्थितीचा फेरआढावा घ्यावा आणि तत्काळ सर्वांना दिलासा द्यावा, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे.