मुख्यमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत मंजूर असलेली कामे सुरू करा

संजय गायकवाड    05-Apr-2021
Total Views |

  • राजिप उपाध्यक्ष सुधाकर घारे यांची मागणी

कर्जत : कर्जत तालुक्यातील सन २०१९- २०च्या आराखड्यात कर्जत तालुक्यातील मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत मंजूर झालेली कामे सुरू करावीत अशी मागणी रायगड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुधाकर घारे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे, तसेच मुख्यमंत्री ग्रामसडक योजना अंतर्गत मंजूर कामे प्रलंबित आहे त्याबाबत आपले सरकार पोर्टल वर तक्रार सुद्धा दाखल केली आहे.
 
Sudhakar Ghare_1 &nb
 
रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील ग्रामीण भागातील गावे जोडणाऱ्या कामांना मुख्यमंत्री ग्राम सडक योजना सन २०१९-२० या वित्तीय वर्षात बॅच-२ अंतर्गत रायगड जिल्ह्यातील रस्त्यांची पुनर्बांधणी करण्यासाठी दि. ११ जून २०१९ मध्ये शासन निर्णय क्रमांक मुग्रायो- २०१९/प्र क ४०६/ बांधकाम-४ प्रमाणे पॅकेज क्रमांक-ए डी बी, आर ए आय ०७ प्रमाणे तालुक्यातील एस एच १०३ ते बोरलजिथे कुंबे रस्ता रक्कम २३३.६० लक्ष, ओ डी आर २३ ते चिंचवली सासवड नसरापुर रस्ता रक्कम १८९.३३ लक्ष, खांडपे, तिवणे ते सांडशी रस्ता रक्कम २६२.३४ लक्ष, ठाणे जिल्हा हद्द ते बीड गाव रस्ता रक्कम ७१.३६ लक्ष, एस एच ७६ ते कोषाणे वावे रस्ता रक्कम ३४८.४२ लक्ष. या पाच कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.
 
सदर कामांची ई-निविदा दिनांक १३ नोव्हेंबर २०२० ते ४ डिसेंबर २०२० या कालावधी मध्ये प्रसिद्ध करण्यात आली सदर कामाचे टेक्निकल बिड दि. ७ डिसेंबर २०२० मध्ये ओपन करण्यात आले. कामाची ई निविदा मंजूर करून दि. ४ जानेवारी २०२१ रोजी सिद्धिविनायक कंट्रक्शन कंपनीस कार्यादेश देण्यात आले आहेत सदर कंपनींने १२ टक्के कमी दराने ठेका घेतला आहे. असे घारे यांनी पत्रात नमूद केले आहे.
 
कर्जत तालुक्यातील ग्रामीण भागातील गावे जोडणाऱ्या कामांना तालुक्यातील रस्त्यांचा दर्जा उन्नतीसाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजुरी देण्यात आली आहे, यासाठी रक्कम रुपये १०.१८ कोटीचा निधी नोव्हेंबर २०२० मध्ये मंजूर झाला आहे, सरकारने मंजूर केलेल्या रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे पावसाळा जवळ आला असून सदर रस्त्यांची कामे पावसाळ्यापूर्वी होणे अत्यंत गरजेचे आहे, नवी मुंबई येथील सिद्धिविनायक कंट्रक्शन कंपनीने १२ टक्के कमी दराने कर्जत तालुक्यातील पाच कामांचा ठेका मिळवला असून या कंपनीने कामाचे कार्यादेश मिळून अडीच महिन्याचा कालावधी लोटला आहे, मात्र आज पर्यंत काम सुरू केलेली नाहीत ठेकेदार कंपनीच्या मनमानी कारभारामुळे रस्त्यांच्या प्रतीक्षेत असलेल्या ग्रामस्थांना यावर्षी सुद्धा खड्ड्यातून मार्ग काढत जावे लागेल असे घारे यांनी यावेळी सांगितले.
 
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या प्रशासकीय यंत्रणेचे अधिकारी यांसकडून देखील मंजूर कामासाठी निधी उपलब्ध असून अधिका-यांनी पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे, अधिकारी यास विचारणा केली असल्यास कामाबद्दल कोणतीही माहिती नसल्याची उत्तरे दिली जात आहेत. अधिकारी कोणाच्या दडपणाखाली आहेत का?सिद्धिविनायक कंट्रक्शन कंपनीला या कामाचा ठेका देत असताना प्रशासकीय अधिकारी यांच्याकडून सिद्धिविनायक कंट्रक्शन कंपनीची कार्यक्षमता व काम करण्याची कॉलिटी तपासण्यात आली आहे का? अशी विचारणा सुधाकर घारे यांनी केली आहे.
 
४ जानेवारी २०२१ रोजी सिद्धिविनायक कंट्रक्शन कंपनीला कामाचे कार्यादेश देवून आजपर्यंत काम का चालू करण्यात आले नाही? याची सखोल चौकशी आपण आपल्या विभागामार्फत करावी तसेच अधिका-यांना काम तात्काळ चालू करण्यास सूचित करावे अशी नम्र विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्राव्दारे केली आहे. संबंधित ठेकेदाराने आठ दिवसाच्या आत काम चालू न केल्यास आम्ही उपोषणास बसणार आहे असा इशाराही सुधाकर घारे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात केला आहे.