महिला सबलीकरण व पर्यावरण जनजागृतीसाठी सायकलवरून एका तरुणीची महाराष्ट्रभर सफर

भूषण सुतार    26-Apr-2021
Total Views |

  • प्रणाली चिकटे तब्बल 8 हजार किमीचा प्रवास करून सुधागडातील उद्धर येथे दाखल

पाली/गोमाशी : यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील पुनवट या छोट्याशा गावातून प्रणाली विठ्ठल चिकटे ही साहसी व ध्येयवेडी तरुणी महाराष्ट्र भ्रमणासाठी निघाली आहे. महिला सशक्तीकरण व पर्यावरण संवर्धन जनजागृती, सायकलिंगचा प्रचार, स्थानिक परिस्थिती व मानसिकतेचा अभ्यास हे ध्येय उराशी बाळगून प्रणालीचा प्रवास सुरु आहे. शनिवारी (ता.24) सायंकाळी ती 7925 किमीचा प्रवास करत सुधागडातील उद्धर येथील पर्यावरणवादी अभ्यासक तुषार केळकर यांच्या शेतावर दाखल झाली आहे.
 
bhushan44_1  H
 
प्रणाली सोबत दै जनदुतने संवाद साधला. अवघ्या 21 वर्षीय प्रणालीने समाज कार्यातील पदवी मिळविली आहे. तिच्या घरची परिस्थिती बेताची आहे. आई व वडील शेती करतात. तर दोन बहिणी देखील आहेत. प्रणाली उद्धर येथे इकोफ्रेंडली घरे कशी बनवावी याबाबतचे प्रशिक्षण तुषार केळकर यांच्याकडून घेणार आहे. आणि तेथून पुढे रत्नागिरी आणि इतरत्र जाणार आहे.
सभोवतालचे वाढते प्रदूषण, तापमान वाढ, वातावरण व ऋतुचक्र बदल यातून निर्माण होणाऱ्या आरोग्याच्या आणि शेतीच्या समस्या या जाणिवेतून आणि कोरोना या महामारी कडून प्रत्यक्ष पर्यावरण ऱ्हास शिकवण या गोष्टींमुळे प्रणालीने सायकलवरून महाराष्ट्र भ्रमंती करण्याचा उपक्रम हाती घेतला.
 
ती प्रवासात नेमके काय करते? ते म्हणजे, सद्या सायकल ने प्रवास करत ती आदिवासी, ग्रामीण, शहरी भागातील लोकांना व तरुणांना भेटते त्यांच्याशी संवाद साधणे. स्थानिक संस्था, शाळा, आणि सरकारी यंत्रणामध्ये भेटी देऊन जनजागृती करणे व माहिती पोचविणे, शक्य तितके लोकांशी त्या त्या भागातील समस्या बाबत चर्चा करणे, आरोग्या बाबत जनजागृती आणि प्रदूषण कमी करण्यासाठी सायकल चालवा हा संदेश देते.
 
6 महिन्यांत 7925 किमीचा प्रवास
प्रणालीचा हा सायकल प्रवास 20 ऑक्टोबर 2020 ला सुरु झाला. आतापर्यंत तीने विदर्भ, यवतमाळ, चंद्रपूर, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, अमरावती, अकोला, वाशिम बुलढाणा करून खान्देश जळगाव, धुळे, नंदुरबार, उत्तर महाराष्ट्र नाशिक वरून शहापूर, पालघर, वसई, ठाणे, वरून रायगड जिल्ह्यात सुधागड तालुक्यातील उद्धर येथे आली आहे. पुढील प्रवास रत्नगिरी कडे असेल. आणि या 6 महिन्यात 7925 किमीचे अंतर गाठले आहे. कमीतकमी 50 ते जास्तीजास्त 125 किमीचा प्रवास ती दिवसाला करते.
 
सरावासाठी दारोदार पेपर टाकले
प्रणाली लहानपणापासून सायकलिंग करते. या मोठ्या प्रवासासाठी सराव करण्यासाठी तिने काही महिने सायकलवरून दारोदार पेपर टाकले आहेत. त्यातून सरावही झाला आणि दोन पैसे देखील मिळाले असल्याचे प्रणालीने सांगितले.
 
प्रवास जिकरीचा पण सुखद अनुभवांचा
प्रणालीचा सायकल प्रवास हा व्यक्तिगत असून, कुठल्या शासकीय किंवा संस्थेमार्फत ती निघाली नाही. हा प्रवास स्वजबादारीचा प्रवास आहे असे प्रणाली सांगते. मी सर्वसाधारण शेतकरी कुटुंबातील आहे. त्यामुळे घरून निघतांना पैसे वगैरे घेऊन निघाली नाही. स्वतः कमीत कमी गरजांमध्ये जगण्याचा प्रयत्न करायचा म्हणून, जे मिळेल ते लोकांकडे खायाचे, राहणे असते. सोबत आर्थिक व वस्तू रूपातील मदत सुद्धा लोकच करतात. या सहा महिन्यांत अनेक सुखद अनुभव आले आहेत. उपक्रमाचे कौतुक प्रतिसाद व सहकार्य खूप चांगले मिळत आहे. असे प्रणालीने दै जनदुतला सांगितले. या लॉकडाऊन च्या परिस्थितीत फक्त सध्या प्रवास थांबत सुरु आहे. कोविड ची परिस्थिती लक्षात घेता आवश्यकते नुसार काळजी घेत आहे. या प्रवासात कुठलीच अडचण आली नाही पोलीस सुद्धा व स्थानिक प्रशासन देखील सहकार्य करत आहे. असे प्रणालीने सांगितले.
 
जल जंगल व जमीन यासाठी काम
प्रणाली आपल्या प्रवासात व थांब्यामध्ये स्थानिक पर्यावरण बाबत महत्वाच्या गोष्टींचा अभ्यास करते. स्थानिक परिस्थिती समजून घेणे. आणि तळागाळात जाऊन जल जंगल व जमीन या विषयाला घेऊन काम करणाऱ्या व्यक्तीकडून त्यांची काम करण्याची भूमिका जाणून घेणे व याबाबत चर्चा करत असते.
 
6 संकल्प करण्याचे आवाहन
प्रणालीने सर्वांना सहा संकल्प करण्याचे आवाहन केले आहे.
यामध्ये
1. वायू ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी शक्य ती कामे सायकलने करूया.
2. प्लास्टिक बाटल्यांचा वापर टाळूयात. घराबाहेर पडताना कापडी पिशवी व पाण्याची बॉटल सोबत ठेवू या.
3. परिसरात झाडे लावूया व जगवूया. अत्यंत आवश्यक वस्तूंचा वापर करूया.
4. आपला परिसर आपणच स्वच्छ ठेवूयात.
5. पाणी बचत व पाणी जिरवा या कामात सहभाग घेऊया.
6. या सर्व प्रयत्नांमध्ये जास्तीत जास्त व्यक्तींना सहभागी करूया.