घरी उपचार घेणाऱ्या कोरोना बधितांवर लक्ष ठेवा, पंधरा दिवस जास्त मेहनत घ्या कोरोना नियंत्रणात येईल - श्रीरंग बारणे

संजय गायकवाड    23-Apr-2021
Total Views |
कर्जत  : ‘कोरोनाची दुसरी लाट महाभयंकर आहे. आपण सर्वच कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्नशील आहोत. तरीही आपण सतर्क राहून पंधरा दिवस मेहनत घेतली तर कोरोना नक्कीच नियंत्रणात येईल. खरे तर घरी उपचार घेणाऱ्या कोरोना बाधितांवर विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. कारण ते स्वतः व त्यांचे कुटुंबीय बिनधास्तपणे फिरतात त्यामुळे कोरोनाचा फैलाव वेगात होतो. कोविडचे रुग्ण कमालीचे वाढत असल्यामुळे खाजगी दवाखान्यांना कोविड सेंटरची परवानगी देताना तेथील सुविधा पाहणे गरजेचे आहे.’ असे स्पष्ट प्रतिपादन खासदार श्रीरंग बारणे यांनी येथे केले.
 
sriranga44410_1 &nbs
 
कर्जत तहसील कार्यालयात कर्जत तालुक्यातील कोरोनाची परिस्थिती काय आहे? या बद्दल कर्जत व खालापूर तालुक्यातील अधिकारी वर्गाच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी आमदार महेंद्र थोरवे, नगराध्यक्ष सुवर्णा जोशी, उपविभागीय अधिकारी वैशाली- ठाकूर, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल घेरडीकर, कर्जतचे तहसीलदार विक्रम देशमुख, खालापूरचे तहसीलदार इरेश चपलवार उपस्थित होते.
 
खासदार बारणे यांनी, ‘रायगड हॉस्पिटल मध्ये खाजगी डॉक्टर काम करू इच्छित असतील तर त्यांची आमदारांच्या उपस्थितीत एक - दोन दिवसात बैठक लावावी. आता 1 मे पासून 18 वर्षांवरील नागरिकांना लसीकरण सुरू होणार आहे. त्यावेळी तरुण वर्गाची मोठी गर्दी होईल. त्यासाठी व्यवस्था करणे गरजेचे आहे. अन्यथा त्यांचा रोष लोकप्रतिनिधी आणि सरकारवर होईल.’ असे स्पष्ट केले.
आमदार थोरवे यांनी ‘कर्जत तालुक्यातील कोरोना बाधित रुग्णांना उपचाराची सुविधा मिळावी म्हणून रायगड हॉस्पिटलला कोविड रुग्णालयाचा दर्जा देऊन ते सुरू सुद्धा केले परंतु तेथे योग्य उपचार होतात की नाही? हे पाहणे गरजेचे आहे. हे हॉस्पिटल शासनाने अधिग्रहित केले तर तालुक्यातील जनतेला अधिक चांगली व मोफत सेवा तेथे उपलब्ध होऊ शकते. कर्जत उप जिल्हा रुग्णालयात सुद्धा अधिक सुविधा व वैद्यकीय अधिकारी नियुक्त करणे आवश्यक आहे. तरच आपण येणाऱ्या आपट्टीवर मत करू शकू.
 
तसेच उप जिल्हा रुग्णालयाच्या परिसरात असलेल्या जुन्या इमारतीत सुद्धा कोविड रुग्णांसाठी व्यवस्था करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.’ असे सूचित करून प्रशासनाच्या कामावर नाराजी व्यक्त केली. नगराध्यक्ष जोशी यांनी, ‘लसीकरण केंद्र सुरू करण्यासाठी अनेक संस्था पुढे येत आहेत त्याचा विचार करावा. अशी सूचना मांडली. उप जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनोज बनसोडे यांनी ‘रुग्णालयात तीन वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. वीज पुरवठा खंडित होतो त्यावेळी उपकरणे बंद होतात त्यामुळे उपचार घेणाऱ्या कोरोना बाधित रुग्णांना धोका होऊ शकतो. पंधरा वर्षांपूर्वी बसविलेला जनरेटर नादुरुस्त आहे. तेथे मोठ्या क्षमतेच्या जनरेटरची आवश्यकता आहे.
 
तसेच लस उपलब्ध होत नसल्याने नागरिकांची गैरसोय होते.’ असे सांगितले. तहसीलदार विक्रम देशमुख यांनी तालुक्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा सादर केला. तहसीलदार चपलवार यांनी खालापूर तालुक्यातील कोरोनाची परिस्थिती कथन केली. खोपोलीचे मुख्याधिकारी गणेश शेट्ये यांनी ‘खोपोली शहराच्या लोकसंख्ये प्रमाणे लस उपलब्ध होत नाही.’ हे लक्षात आणून दिले. उप विभागीय अधिकारी वैशाली परदेशी - ठाकूर यांनी ‘आजच्या बैठकीत करण्यात आलेल्या सूचनांचे पालन करू.’ असा शब्द दिला.
या बैठकीला पोलीस निरीक्षक अरुण भोर, नगरसेवक विवेक दांडेकर, संकेत भासे, माजी नगरसेवक संतोष पाटील, गट विकास अधिकारी बालाजी पुरी, मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील, नायब तहसीलदार सुधाकर राठोड आदींसह दोन्ही तालुक्यातील अधिकारी वर्ग उपस्थित होता.