नाशिकमध्ये ऑक्सिजन गळतीमुळे २२ रुग्णांचा मृत्यू

जनदूत टिम    21-Apr-2021
Total Views |
मुंबई : राज्यात एकीकडे ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत असून गंभीर परिस्थिती असतानाच नाशिकमध्ये ऑक्सिजन गळती झाल्याचा प्रकार समोर आला आहे. झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन टाकीतून गळती झाल्याने २२ रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी ही माहिती दिली आहे.
 
Nashik-Oxygen_1 &nbs
 
दरम्यान या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करुन दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल अशी माहिती मनपा आयुक्तांनी दिली आहे. दरम्यान अजून काही रुग्ण गमावण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. रुग्णालयातील काही रुग्णांना इतर रुग्णालयांमध्ये हलवण्यात आलं आहे. नाशिक महापालिकेच्या झाकीर हुसेन हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन टाकीतून गळती झाली होती. ऑक्सिजन टँकरमधून टाकीत भरला जात असताना ही गळती सुरु झाली. टाकीमधील गळती रोखण्यासाठी तसंच दुरुस्तीसाठी रेस्क्यू पथक घटनास्थळी दाखल झालं होतं. दरम्यान रुग्णालयात व्हेंटिलेटरवर असणाऱ्या २३ पैकी २२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
 
“ऑक्सिजनचं प्रेशर कमी झाल्यामुळे २२ रुग्णांचा मृत्यू झाल्याची आत्तापर्यंतची आकडेवारी हाती आली आहे. याविषयी महापालिका आयुक्त आणि पालिकेच्या इतर अधिकाऱ्यांशी चर्चा करून सविस्तर माहिती उपलब्ध होऊ शकेल. यासंदर्भात सरकारला देखील माहिती कळवण्यात आली आहे,” अशी माहिती नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली आहे.
 
महाराष्ट्र शोकमग्न आहे!

cm25600003_1  H 
 
“कोरोनाच्या संकटामुळे देश दुर्दैवाच्या दुष्टचक्रात सापडला आहे. एकंदरीत कोरोनाशी विषम प्रकारची लढाईच सुरू आहे. कुठे प्राणवायू नाही, कुठे औषधे नाहीत, कुठे बेडस् नाहीत. त्याअभावी रुग्णांचे हाल व मृत्यू होत आहेत. अशात नाशिक महानगरपालिका रुग्णालयातील ऑक्सिजन गळतीच्या दुर्घटनेची बातमी धक्कादायक आहे, मन हेलावणारी आहे. ऑक्सिजन टाकीच्या गळतीने २२ रुग्णांना प्राण गमवावे लागले. हे दुःख व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. एकाएका कोरोना रुग्णास सावरण्यासाठी महाराष्ट्र शासन शर्थ करीत असताना असा अपघात आघात करतो. राज्याची संपूर्ण यंत्रणाच या युद्धात स्वतःला वाहून घेत आहे. मृतांच्या नातेवाईकांचे सांत्वन कसे करू? त्यांचे अश्रू कसे पुसू? अपघात असला तरी मृतांच्या नातेवाईकांचे दुःख मोठे आहे. या अपघाताची खोलात जाऊन चौकशी होईलच.
या दुर्घटनेस जबाबदार असेल तर त्याची गय केली जाणार नाही, पण या दुर्दैवी घटनेचे राजकारणही कुणी करू नये. संपूर्ण महाराष्ट्रावर हा आघात आहे. नाशिकच्या दुर्घटनेने संपूर्ण महाराष्ट्र शोकमग्न आहे!” अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
 
नाशिक वायुगळतीमुळे झालेल्या प्राणहानीबद्दल राज्यपालांना दुःख

rajyapal,a22141_1 &n 
 
नाशिक येथे ऑक्सिजन टाकीतून प्राणवायू गळती होऊन झालेल्या दुर्घटनेत करोना रुग्णांच्या झालेल्या जीवितहानी बद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दुःख व्यक्त केले आहे. नाशिक येथील डॉ. झाकीर हुसेन रुग्णालय येथे ऑक्सिजन टाकीतून गळती होऊन काही निरपराध करोना रुग्ण दगावल्याचे समजून तीव्र दुःख झाले. या दुर्दैवी घटनेत प्राण गमावलेल्या रुग्णांच्या कुटुंबियांना आपल्या शोक संवेदना कळवतो व बाधित व्यक्तींना लवकर बरे वाटावे यासाठी प्रार्थना करतो, असे राज्यपालांनी आपल्या शोक संदेशामध्ये म्हटले आहे.
 
 
मृतांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाख रुपये मदत जाहीर
या संपूर्ण घटनेत उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश मी दिले आहेत असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे. मृतांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाख रुपये देण्याचे देखील त्यांनी जाहीर केले आहे. नाशिकची ही घटना सर्वांसाठी केवळ धक्कादायक नाही तर प्रशासनाला या संपूर्ण लढ्यात आपल्याला अतिशय काळजी घेऊन जावे लागणार आहे हे शिकविणारी आहे. आज गेल्या वर्षभरापासून आपण कोविडच्या लाटेला सामोरे जात आहोत. उपलब्ध डॉक्टर्स, वैद्यकीय कर्मचारी हे रात्रंदिवस रुग्णांचे जीव वाचविण्यासाठी झटताहेत, अशा परिस्थितीत अशा निष्काळजीपणाने जीव जाणे मनाला अतिशय बोचणारे आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणतात की, केवळ शोक सांत्वना करून चालणार नाही. अशा घटना भविष्यात घडू नये आरोग्य यंत्रणांचे मनोबल ज्यामुळे खच्ची होईल अशी कोणतीही घटना घडू नये यासाठी प्रशासनाने अतिशय काळजीपूर्वक आणि डोळ्यात तेल घालून काम केले पाहिजे.
 
कोरोनाच्या या लाटेत ऑक्सिजनचे किती महत्व आहे हे सांगण्याची गरज नाही. प्राणवायूच्या प्रत्येक कणासाठी आपण दिवसरात्र प्रयत्न करतोय. ऑक्सिजनची गळती कोणत्याही परिस्थितीत होऊ नये म्हणून आपण प्रत्येक बैठकांत सुचना दिल्या आहेत असे असताना हे कसे घडले ते तातडीने तपासून जबाबदारी निश्चित करावी असे आपण मुख्य सचिवांना निर्देश दिले आहेत असेही मुख्यमंत्री म्हणतात. यापुढे प्रत्येक रुग्णालयांच्या ठिकाणी प्राणवायूच्या साठ्याची काळजी घेऊन त्याच्या सुयोग्य उपयोग व्हावा तसेच रुग्णांना प्राणवायू मिळण्यातल्या अडचणी तत्काळ दूर झाल्याच पाहिजेत असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
राजेश टोपेंनी काय सांगितलं
“ऑक्सिजन टाकीचा व्हॉल्व लिकेज झाला होता. ऑक्सिजन टाकीला लिकेज झाले आणि त्यामुळे ऑक्सिजन प्रेशर कमी होऊन व्हेंटिलेटर्सवर असलेल्या रुग्णांचा मृत्यू झाला आहे,” अशी माहिती स्थानिक प्रशानसनाने दिली असल्याचं राजेश टोपे यांनी सांगितलं. मनपा आयुक्तांनीही ११ रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली होती. रुग्णालयात १५० रुग्ण होते, यापैकी २३ रुग्ण व्हेंटिलेटर आणि इतर रुग्ण ऑक्सिजनवर आहेत असं त्यांनी सांगितलं होतं. यावेळी त्यांनी सर्व प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करुन जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करु असं सांगितलं आहे. दरम्यान विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मनपा आयुक्तच यासाठी जबाबदार असून मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
 
दरम्यान दुर्घटनेची माहिती मिळाल्यानंतर रुग्णालयात मोठी गर्दी होत असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. करोनाच्या नियमांचं उल्लंघन होऊ नये यासाठी पोलीस गर्दी कमी करत आहेत. याशिवाय संपूर्ण घटनेची माहिती घेत आहेत. तसंच नातेवाईकांच्या भावनांचा उद्रेक होऊन परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. पोलीस आयुक्त स्वत: घटनास्थळी उपस्थित आहेत.