शहापूर तालुक्यात कोरोना पेशेंटची झपाट्याने वाढ

जनदूत टिम    18-Apr-2021
Total Views |

  • बेड, रेमडेसिवीर, ऑक्सिजनच्या कमतरतेने; ठाण्यातील कोवीड रुग्णालयात जाण्याची वेळ

शहापूर : शहापूर तालुक्यातील कोविड पॉझिटीव्ह रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. हायरिस्क रुग्णांना अतिदक्षता विभागात बेड, रेमडेसिवीर औषधं मिळत नसल्यामुळे रुग्णांसह नातेवाईकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. तर ऑक्सिजनच्या पुरवठ्यात झालेली घट देखील चिंतेचे कारण बनले आहे.
 
Corona Virous01_1 &n
 
तालुक्यातील कोविड सेंटरमध्ये तात्पुरत्या स्वरूपाची उपाययोजना केली जात असताना रुग्णांची ऑक्सिजन पातळी खालावली तर त्याला ठाणे येथे जिल्हा कोविड रुग्णालयात पाठविण्यात येते. परंतुतेथेअतिदक्षता विभागात बेडउपलब्धहोत नसल्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना इतर खासगी रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला जातो.ज्यांची आर्थिक परिस्थिती हलकीची आहे. अशा कित्येक रुग्णांना वेळेवर उपचार न मिळाल्याने प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे जीव गमवावा लागला आहे.
 
आठवड्यापुर्वी गोठेघर येथे शासकीय कोविड रुग्णालय सुरु करण्यात आले. नोडल अधिकारी डॉ. तरुलता धानके यांनी रुग्णांची गैरसोय होऊ नये, यासाठी त्वरित लोकसहभागातून वेगवेगळ्या उपाययोजना कोविड सेंटरमध्ये राबविल्या आहेत. परंतु अपुऱ्या सुविधांमुळे रुग्णांना सेवा पुरविताना कोविड सेंटरमधील डॉक्टरांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
 
कोविड सेंटर साठी कोणताही शासकीय निधी उपलब्ध झालेला नाही. आरोग्य विभागामार्फत जमेल त्या पद्धतीने रुग्णांना सेवा देण्याचे काम सुरु आहे.
- डॉ. तरुलता धानके, नोडल अधिकारी
 
 
राजकीय पक्ष कुरघोडीत व्यस्त
कोरोना उपचार केंद्रात रुग्णांना गरम पाणी, इतर दैनंदिन वस्तु मिळत नसल्याची ओरड होत आहे. परंतु नवीन कोविड सेंटरसाठी अजुनही शासकीय निधीची कमतरता असल्याने सोशल मीडियावर शिवसेना, भाजप, राष्ट्रवादीच्या कार्यकत्यामध्ये चांगलेच शाब्दिक वादंग होताना दिसून येत आहेत. तर आपत्ती व्यवस्थापनासाठी आमदार निधीतून मिळालेल्या ४५ लाख रुपयांचे काय झाले? असा सवालही आता उपस्थित होत आहे.
 
बाधित रुग्णांचा कंपनीत, गोडाऊनमध्ये वावर
भिवंडी, पडघे, वासिंद, आसनगाव, आठगाव जवळील गोडाऊन आणि खासगी कंपन्यांमध्ये कामगारांना कोविड टेस्ट करण्यास सांगितल्याने कित्येक जण गोठेघर कोविड सेंटर मध्ये स्वॅब टेस्टसाठी येतात. तसेच काही जण खासगी लॅबमध्ये जातात. बहुतेक जण सॅम्पल दिल्यानंतर दोन दिवस रिपोर्टची वाट न पाहता कामावर निघुन जातात. दोन दिवसांनी त्यांचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्यानंतर ते कंपनीमध्ये काम करत असल्याचे आढळुन आले आहे. काही नागरिक बाजारपेठेत फिरताना मास्कचा वापर करत नसल्याचे दिसून येत आहे. तर काहीजण विनाकारण बाजारात गर्दी करून सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडवत आहेत.
 
तालुक्यात रुग्णवाहिकांची कमतरता
तालुक्यात रुग्णवाहिकांची कमतरता भासत असुन खासगी रुग्णवाहिका कल्याण, ठाण्याला जाण्यासाठी पाच ते सहा हजारांचे भाडे आकारत असल्याचे दिसून येते. त्यात जिजाऊ संस्थेकडून कोविड सेंटरसाठी एक तर शिवसेनेकडून देखील एक रुग्णवाहिका सध्या उपलब्ध आहे. तर तालुक्यातील १०८ रुग्णवाहिका सेवा फक्त शासकीय रुग्णालयांतील रुग्णांसाठी उपलब्ध असल्याने घरातून कोविड सेंटरमध्ये येण्यासाठी पॉझिटीव्ह रुग्णांना कित्येक तास ताटकळत रहावे लागत आहे.