राज्यात लोकशाही नव्हे ‘लॉक’शाही : देवेंद्र फडणवीस

जनदूत टिम    13-Apr-2021
Total Views |
पंढरपूर : राज्यात सध्या लोकशाही नव्हे तर ‘लॉक’शाही आहे, अशी टीका माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. पंढरपूर विधानसभा मतदारसंघातील भाजपा महायुतीचे उमेदवार समाधान आवताडे यांच्या प्रचारार्थ आयोजित विविध जाहीर सभांमधून ते बोलत होते.
 
devendra-fadnavis_1582009
 
देवेंद्र फडणवीस यांनी आज एकूण ६ सभांना संबोधित केले. बोराळे, नंदेश्वर, मंगळवेढा, कासेगाव, गादेगाव आणि पंढरपूर येथे त्यांच्या सभा झाल्या. लॉक-अनलॉकची प्रक्रिया कधीकधी आवश्यक असतेच. पण, गरिबांना आणि शेतकर्‍यांना वार्‍यावर सोडून देण्यात आले आहे. स्वत: पोलिसांकडून हप्ते गोळा करायचे, लोकांची वीज कापून सरकारी वसुली करायची आणि जनतेला मात्र वार्‍यावर सोडून द्यायचे, असा यांचा कारभार आहे. राज्यातील नागरिकांना कोणतेही पॅकेज न देणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य ठरले आहे, असा घणाघात त्यांनी केला. या सभांना खा. रणजित नाईक निंबाळकर, आ. प्रशांत परिचारक, खा. जयसिद्धेश्वर महास्वामी, माजी मंत्री सुभाषराव देशमुख, विजयराव देशमुख, हर्षवर्धन पाटील, गोपीचंद पडाळकर, राम सातपुते, जयकुमार गोरे, सदाभाऊ खोत, संजय भेगडे, लक्ष्मणराव ढोबळे आणि इतरही नेते उपस्थित होते.
 
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मंगळवेढ्याच्या भूमिपुत्राला आपण मैदानात उतरविले आहे. विकासाची नवीन वाट मंगळवेढा, पंढरपूरला दाखविण्यासाठी आपण त्यांना आशीर्वाद देणार हे नक्की आहे. लबाडाचे आमंत्रण जेवल्याशिवाय खरे होत नाही. त्यामुळे १५ वर्ष जे सत्तेत होते, त्यांच्यावर विश्वास ठेऊ नका. वीज बिलांना स्थगिती दिली, तेव्हा वाटले राजा उदार झाला. पण, अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री म्हणाले आता वसुली पुन्हा सुरू. कोरोनामुळे सर्वाधिक प्रभावित कोण, तर मुंबईच्या बिल्डरांना ५००० कोटींची मदत या सरकारने दिली. गरिब, शेतकरी यांना मात्र मदत करायला पैसा नाही, असे हे सरकार सांगते. पूर्वी हे सरकार होते महाविकास आघाडी, नंतर झाले महाविनाश आघाडी आणि आता झाले महावसुली आघाडी. आज दुर्दैव म्हणजे खुद्द पोलिसांनाच हप्तेवसुलीचे टार्गेट दिले जात आहे. राजकारणाचे गुन्हेगारीकरण पाहिले होते. पण, पोलिसांना टार्गेट देणारे नेते पहिल्यांदाच पाहिले. यात आमचे जगातील सर्वोत्कृष्ट पोलिस दल बदनाम करून टाकले.
 
हे सरकारमध्ये आले, तेव्हा बांधावर जाऊन सांगायचे, ५० हजार देऊ, दीड लाख देऊ. पण, प्रत्यक्षात आज २००० रूपये कुणाला मिळाले नाही. हे म्हणाले कर्जमुक्ती देऊ. पण, आज जनतेला या सरकारपासून मुक्ती मागण्याची वेळ आली आहे. उस उत्पादकांना सर्वाधिक मदत करण्याची भूमिका मा. नरेंद्र मोदीजी यांच्या सरकारने घेतली. साखर आणि साखर उद्योगाला वाचविण्याचे काम आपल्या पंतप्रधानांनी केले. आमच्या सरकारच्या ५ वर्षांत काळात सिंचनासाठी मोठी कामे प्रारंभ
करण्यात आली.
दुष्काळी भागापर्यंत पाणी पोहोचविण्याचे काम केले. 35 गावांमध्ये पाण्यासाठी प्रत्येकवेळी आश्वासन दिले जाते. पण, होत काही नाही. जो निधी लागेल, तो थेट दिल्लीहून आणू. आज राज्यात सरकार आहे की नाही, अशी स्थिती आहे. सारे मंत्री आत्ममग्न, अख्ख सरकार आत्ममग्न! कोरोनात सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात, सर्वाधिक रूग्ण महाराष्ट्रात. ऑक्सिजन नाही, रेमडेसिवीर नाही, बेड नाही, अशी अवस्था झाली आहे, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
लोकशाहीत मताचा अधिकार हा महत्त्वाचा अधिकार असतो. या जुलमी सरकारविरूद्ध मतदानाचा पहिला अधिकार पंढरपूर विधानसभा क्षेत्राला प्राप्त झाला आहे. पंढरपूरमध्ये विठुमाऊलीच्या मंदिराबाहेर फुलं, गुलाल, बुक्का विकणार्‍याला एक रूपयाची मदत नाही आणि दारू विकणार्‍याला लायसन्समध्ये सवलती दिल्या. हे सरकार सर्वसामान्यांचे नाही. गरिब, दीन-दलितांशी यांना काहीच देणेघेणे नाही. मराठा आरक्षण या सरकारने टिकू दिले नाही. सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसी आरक्षणाला सुद्धा धक्का लागला. सध्या कोरोनामुळे निवडणुका होत नाहीत. पण, पुन्हा निवडणुका होतील, तेव्हा ओबीसींसाठी एकही जागा असणार नाही, अशी अवस्था या सरकारने आणली आहे, अशीही टीका त्यांनी केली.