सनराईज रुग्णालय इमारतीस मुख्यमंत्र्यांची भेट

जनदूत टिम    26-Mar-2021
Total Views |

  • हलगर्जीपणा करणाऱ्यांवर तत्काळ कारवाईचे निर्देश
  • मृतांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाख रुपये जाहीर
  • राज्यात इतर इमारतींमध्ये असलेल्या कोविड रुग्णालयांची अग्निसुरक्षा तपासा - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : भांडुप येथील ड्रीम मॉलमध्ये लागलेल्या आगीमुळे सनराईज रुग्णालयातील रुग्णांच्या झालेल्या मृत्यूंची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गंभीर दखल घेतली असून प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन त्यांनी पाहणीही केली. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी मृतांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाखांची मदत जाहीर केली त्याचप्रमाणे अशारीतीने राज्यभरात ज्या मॉल्स किंवा इतर वास्तूंमध्ये कोविड रुग्णांच्या उपचारासाठी रुग्णालये सुरु आहेत त्या ठिकाणच्या अग्नीसुरक्षेची तपासणी तात्काळ करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
 
cm00213_1  H x
 
ही घटना दुर्दैवी असल्याचे सांगून ते म्हणाले की, यासंदर्भात ज्यांनी दुर्लक्ष व दिरंगाई केली अशा सर्व जबाबदार लोकांवर कठोर कारवाई करण्यात येईल.
 
यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, वाढत्या कोविड संसर्गामुळे विविध इमारती किंवा वास्तूंमध्ये तात्पुरत्या स्वरूपात अशा प्रकारच्या फिल्ड रुग्णालयांना परवानग्या देण्यात आल्या आहेत. आजच्या आगग्रस्त रुग्णालयास देखील तात्पुरती परवानगी देण्यात आली आहे. यापूर्वीच मी भंडारा येथे जिल्हा रुग्णालय आगीनंतर राज्यातील सर्व रुग्णालयांच्या अग्नी सुरक्षेची तपासणी करून घेण्याचे निर्देश दिले होते. त्याचप्रमाणे कोविड उपचारासाठी उभारण्यात आलेल्या राज्यातील सर्व फिल्ड रुग्णालये व इमारतींमधील रुग्णालयांच्या अग्नी सुरक्षेची खातरजमा करून घेण्यात यावी असे निर्देश मी देत आहे. मुख्यमंत्र्यानी पालिका आयुक्त व महापौर यांच्याशी देखील ही दुर्घटना कळताच चर्चा केली. जखमी तसेच इतर कोविड रुग्णांना इतरत्र व्यवस्थित उपचार मिळतील हे पाहण्यास सांगितले.