पुन्हा धारावीत संसर्गवाढ

जनदूत टिम    19-Mar-2021
Total Views |
मुंबई : पुन्हा धारावी, माहीम परिसरातील करोनाचे प्रमाण पुन्हा हळुहळू वाढत आहे. धारावीमध्ये ३० रुग्णसंख्येची गुरुवारी नोंद झाल्यानंतर एकूण रुग्णांची संख्या ४,३२८ इतकी झाली आहे.
 
dharavi456_1  H
 
१७ मार्च रोजी धारावीमध्ये उपचाराधीन रुग्ण १९ तर एकू रुग्णसंख्या ४,२९८ इतकी होती. १६ मार्च रोजी पॉझिटिव्ह रुग्णांचे प्रमाण ४,२७९ इतके तर नव्या रुग्णांची संख्या २१ इतकी होती. ६ मार्च रोजी उपचाराधीन रुग्ण अवघे पाच इतके होते. पहिल्या आठवड्यात उपचाराधीन रुग्णसंख्येत घट दिसून आली. मात्र एकूण रुग्णसंख्या पाच हजार होती. गुरुवारी दादर, माहीम आणि धारावी येथील उपचाराधीन रुग्ण १०२ असून एकूण रुग्णसंख्या ही १४ हजार, ९५० इतकी
वाढलेली आहे.
 
अधिकाधिक रुग्णांच्या चाचण्या करण्याच्या उद्देशाने विभागातील विविध परिसरांतील चाचणी केंद्रांची संख्या वाढवण्यात आल्याचे सहआयुक्त किरण दिघावकर यांनी सांगितले. धारावीमध्ये करोना रुग्णांचे प्रमाण कमी झाल्यानंतर येथे करोनाच्या दृष्टीने जी काळजी घेणे आवश्यक आहे ती योग्य प्रमाणात घेतली जात नसल्याच्या अनेक तक्रारी पुढे येत आहे. झोपडपट्टीचा भाग असल्यामुळे येथे सामूहिक रोगप्रतिकारशक्ती निर्माण झाली आहे. त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही, असाही एक गैरसमज सर्वसामान्यांमध्ये होता. त्यामुळे वैद्यकीय चाचण्या उशिरा करणे, वैद्यकीय निकषांचे पालन न करणे यामुळेही रुग्णसंख्येमध्ये हळूहळू वाढ होत गेली. ऑक्टोबरनंतर धारावीमधील रुग्णसंख्येत झालेली वाढ अधिक असल्याचे उपलब्ध आकडेवारीवरून दिसते.