ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणूक: महाविकास आघाडीचे उमेदवार जाहीर

जनदूत टिम    14-Mar-2021
Total Views |
ठाणे :  ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक महाविकास आघाडीने एकत्रित लढविण्याचे ठरविले आहे. या निवडणुकीत सहा उमेदवार बिनविरोध निवडून आले असून 15 जागांसाठी महाविकास आघाडीने आपल्या उमेदवारांची नावे रविवारी जाहीर केली.

Thane bank_1  H
 
मार्च महिन्याच्या अखेरीस होऊ घातलेली ठाणे मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक महाविकास आघाडी एकत्रित लढविणार असल्याची माहिती शिवसेना नेते, नगरविकास मंत्री तथा ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी दिली होती. त्यानुसार ना. शिंदे आणि ना. आव्हाड यांनी आज अधिकृत उमेदवारांची नावे जाहीर केली.
 
Eknath Shinde_1 &nbs
 
या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे बाबाजी पाटील आणि बाबूराव दिघा; तर शिवसेनेचे अमित घोडा हे बिनविरोध निवडून आले आहेत. तर उर्वरित पंधरा जागांसाठी महाविकास आघाडीकडून पंडीत पाटील (भिवंडी), सुधीर पाटील (कल्याण) , सुभाष पवार (मुरबाड), मधुकर पाटील ( पालघर), प्रकाश वरकुटे (शहापूर) , सुनील पाटील (विक्रमगड), किरण सावंत (वाडा) , लाडक्या खरपडे (तलासरी) , काँग्रेस (हौसिंग मजुर संस्था) , हणमंत जगदाळे (पतसंस्था), निलेश सांबरे (ओबीसी) , अनिल शिंदे (अ.जा/ज), विशाखा खताळ (व्हीजेएनटी ) , प्राजक्ता पानसरे आणि शोभा म्हात्रे (महिला प्रतिनिधी दोन जागा) यांना अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
 
bunty4545_1  H
 
दरम्यान, ठाणे मध्यवर्ती सहकारी बँकेसाठी येत्या 30 मार्च रोजी मतदान घेण्यात येणार आहे. त्यासाठी 26 ते 4 मार्च दरम्यान अर्ज वाटप आणि अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. 5 मार्च रोजी अर्जांची छाननी होणार असून 21 मार्च ही अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख आहे. तर, 30 मार्च रोजी मतदान आणि 31 मार्च रोजी मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीमध्ये कृषी-पतसंस्थांमधून 14, पगारदार पतसंस्थांमधून 1, खरेदी-विक्री संघातून 1, महिला राखीव 2, अनु.जाती-जमातींसाठी 1 आणि ओबीसींसाठी 1 जागा राखीव आहे. 3 हजार 68 मतदार या निवडणुकीमध्ये मतदानाचा अधिकार बजावणार आहेत.