‘विकेल ते पिकेल’ अंतर्गत विविध पिकांच्या मुल्यसाखळी विकसित करण्यावर भर द्यावा - कृषीमंत्री दादाजी भुसे यांचे निर्देश

जनदूत टिम    03-Feb-2021
Total Views |
मुंबई : ‘विकेल ते पिकेल’ योजनेंतर्गत उत्पादकता वाढीबरोबरच बाजारात मागणी असलेला माल उत्पादीत करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षण देवून शेतकऱ्यांना थेट ग्राहकापर्यंत पेाहोचण्यासाठी आवश्यक ती मदत करावी. या कामी विविध पिकांच्या मुल्यसाखळी विकसित करण्यावर भर देण्याचे निर्देश कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी दिले.
 
bhuse0587_1  H
 
राज्यातील कृषि विभागाचे सर्व संचालक, विभागीय कृषि सहसंचालक व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांची आढावा बैठक मंत्रालयात झाली. यावेळी कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले, पोकराचे प्रकल्प संचालक विकासचंद्र रस्तोगी, कृषी आयुक्त धिरजकुमार उपस्थित होते. कृषीमंत्री भुसे म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेवर आधारीत ‘विकेल ते पिकेल’ योजना राबविण्यात येत आहे. त्यासाठी कृषि विभागाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी. राज्यातील प्रत्येक गावातील ग्रामपंचायत कार्यालयामध्ये जमिन सुपिकता निर्देशांकाचे फलक लावून शेतकऱ्यांमध्ये रासायनिक खतांचा संतुलित वापराबाबत गाव बैठका घेवून मार्गदर्शन करावे.
 
येत्या खरीप हंगामास शिल्लक राहीलेला कालावधी व राज्यातील सोयाबिन पिकाखाली असलेले क्षेत्र लक्षात घेवून शेतकऱ्यांना स्वत:कडील गुणवत्तापुर्ण व चांगली उगवणक्षमता असलेले सोयाबिन बियाणे वापराबाबत मार्गदर्शन करावे व या कामी उन्हाळी सोयाबिन उत्पादनाबाबत व वेळोवेळी उगवण क्षमता चाचणी बाबत शेतकऱ्यांना तपशीलवार मार्गदर्शन करण्यात यावे. शेतमजुरांच्या कौशल्य आधारीत प्रशिक्षण कार्यक्रमाअंतर्गत लाभ घेतलेल्या मजुरांच्या याद्या मोबाईल क्रमांकासह तयार करून त्याचा डाटाबेस तयार करावा, जेणेकरून परीसरातील शेतकऱ्यांना शेतीकामात याबाबतची माहीती उपलब्ध करून देता येईल. कृषी विभागाच्या प्रत्येक कार्यालयात शेतकरी सन्मान कक्षाची स्थापना करण्यात आली असून त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी योग्य मार्गदर्शन, कृषी विभागाच्या सर्व योजनांची माहीती देण्यात येवून जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत कृषि विभागाच्या योजनांचा लाभ द्यावा, असे निर्देशही भुसे यांनी दिले.