पालघरमध्ये विमानतळ शक्य!

जनदूत टिम    08-Nov-2021
Total Views |
वसई : पालघर जिल्ह्या हा दळवणळणाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. पालघर जिल्ह्यातील विस्तीर्ण समुद्रकिनारे, ऐतिहासिक वास्तूंचा ठेवा, पारंपरिक संस्कृती, आदिवासी बांधवांची परंपरा, कला यांसह हिरवागार परिसर हा नेहमीच पर्यटकांना आकर्षित करत असतो. त्यातच राज्याचे पर्यटन आणि पर्यावरण मंत्री यांनी पालघरमध्ये तिसरे विमानतळ होणार, अशी घोषणा करून जिल्ह्याचे महत्त्व वाढण्याची नांदीच दिली आहे. या विमानतळाच्या जागेबाबत गोपनीयता असली तरी हा प्रकल्प प्रत्यक्षात उतरल्यानंतर पालघरच्या विकासाला एकप्रकारे गतीचा बूस्टर मिळणार आहे.
 
airplane_1  H x
 
पालघर हा आदिवासीबहुल जिल्हा म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात औद्योगिक क्षेत्र आहे. विकासापासून दूर असला तरी मुंबईला लागून हा जिल्हा असल्याने आता हळूहळू शैक्षणिक, सामाजिक, व्यावसायिक विकासाच्या दृष्टीने हा जिल्हा वेग घेत आहे. जिल्ह्याला विस्तीर्ण समुद्र किनारा लाभल्याने मुंबईप्रमाणेच राज्य आणि इतर राज्यांतील नागरिकही येथे पर्यटनासाठी येत असतात; परंतु जिल्ह्याच्या पर्यटन क्षेत्राचा हवा तितका विकास अद्याप झालेला नाही. त्यामुळे विमानतळ झाल्यास येथील विकासाला चालना मिळणार आहे.
 
पालघर जिल्ह्यातून आधीच बुलेट ट्रेन, विरार-अलिबाग कॉरिडॉर प्रकल्प, बड़ोदरा महामार्गासह अन्य प्रकल्पजात आहेत. त्यातच विमानतळ झाल्यास येथील नागरिकांना अन्य राज्यात किंवा देशात जाण्यासाठी व पर्यटकांना पालघर जिल्ह्यात येणे सोयीस्कर होणार आहे. तसेच बाजारपेठांना उभारी, स्थानिक नागरिकांना रोजगार, व्यवसायाची नवी संधी प्राप्त होणार आहे. या प्रकल्पाला जिल्ह्यातून कसा प्रतिसाद मिळणार, हे धोरण समोर आल्यावरच स्पष्ट होणार आहे.
दापचरी येथे सरकारची ६ हजार एकर इतकी जमीन आहे. तर सफाळे येथे ५०० एकर व वसई-नालासोपारा शहराच्या मध्यभागीदेखील जमीन उपलब्ध आहे. तिसरे विमानतळ जर उभारायचे असेल तर या तीन जागांना सरकारकडून पसंती दिली जाण्याची शक्यता आहे.

विमानतळ झाल्यास पालघर जिल्ह्यातील
व्यापारी वर्गाला फायदा होणार आहे. पालघरमध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटन क्षेत्र आहे. त्यामुळे विकासाला नक्कीच चालना मिळू शकते. तसेच येथे परदेशी नागरिकांची ये-जाही वाढेल.
- राजेंद्र गावित,खासदार, पालघर

दापचरी या ठिकाणी ६हजार एकर इतकी
सरकारी जमीन आहे.ही जागा केंद्रबिंदू ठरू शकते.दापचरी येथून बुलेट ट्रेन जाणार आहे व बोईसर हे स्थानक आहे. त्यामुळे या ठिकाणी उतरून विमानतळ गाठणे शक्य होईल.
- श्रीनिवास वणगा, आमदार, पालघर