दीपस्तंभ प्रतिष्ठान शहापूर यांच्या वतीने शिरगांव शाळेतील इयत्ता पाचवीमध्ये शिष्यवृत्ती धारक ठरलेल्या सहा विद्यार्थ्यांचा तालुक्याचे सन्मा. गटशिक्षणाधिकारी यांच्या हस्ते झाला सन्मान

जनदूत टिम    14-Jan-2021
Total Views |
शहापूर : कालचा शुक्रवार, थुईथुई नाचणारा पाऊस असूनही शिरगांव शाळेच्या दृष्टीने खूपच आनंददायी व प्रेरणादायी ठरला. सकाळी ठिक १०-३० वाजता दीपस्तंभ प्रतिष्ठान शहापूरच्या वतीने इयत्ता पाचवीमध्ये शिष्यवृत्ती धारक ठरलेल्या जि.प.शाळा शिरगांवच्या सहा विद्यार्थ्यांचा पंचायत समिती शहापूरचे गटशिक्षणाधिकारी सन्मा.हिराजी वेखंडे साहेब यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना सन्मानपत्र, भेट व शाळेतील शिक्षकांना गौरवपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
 
shsapur88999655241_1 
 
मान्यवरांच्या हस्ते सरस्वती प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्ज्वलन करुन कार्यक्रमास सुरुवात झाली.शाळेच्या वतीने सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ व गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक केशव शेलवले सरांनी केले.आपल्या प्रास्ताविकात त्यांनी दीपस्तंभ प्रतिष्ठान शालेय विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेबद्दल घेत असलेल्या परिश्रमाबद्दल व राबवत असलेल्या उपक्रमाबद्दल गौरवोद्गार काढून जि.प.शाळा शिरगांव साठी मदतरुप झालेल्या संस्थांचा व व्यक्तींचाही नामोल्लेख करुन त्यांच्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.तसेच आपल्या सहकारी शिक्षकांचे विशेष कौतुक केले. या छोटेखानी गौरव सोहळ्यात दीपस्तंभ प्रतिष्ठानचे अध्यक्ष मा.योगेश रोठे व उपाध्यक्ष मा. राजकुमार शेलवले यांनीही शुभेच्छा देऊन आपली मनोगते व्यक्त केली.ग्रामपंचायत शिरगांवचे उपसरपंच मा.रविंद्र मडके यांनीही आपल्या मनोगतात गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन आणि कौतुक करुन शाळेसाठी सर्वतोपरी मदत करण्याचे अभिवचन दिले.तदनंतर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सन्मा.गटशिक्षणाधिकारी हिराजी वेखंडे साहेब यांनी सर्वांना संबोधित केले.
 
या चांगल्या उपक्रमाबद्दल दीपस्तंभ प्रतिष्ठानचे तसेच त्यांच्या उमद्या सर्व अकरा शिलेदारांचे त्यांनी तोंड भरुन कौतुक केले.शिरगांव शाळा राबवत असलेल्या विविध उपक्रमाबद्दल आणि शालेय गुणवत्तेबद्दल पाचवीचे वर्गशिक्षक महेश धिर्डे सरांचे , शाळेच्या मुख्याध्यापकांचे व सहकारी शिक्षकांचे अभिनंदन करुन ग्रामस्थांच्या सहकार्याबद्दल अभिमान व्यक्त केला.तसेच शाळेच्या गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे अभिनंदन करुन उद्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
 
या गोड कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा मा.अस्मिता उबाळे, उपाध्यक्ष मा.नंदकुमार मडके, शाळा व्य.स.सदस्या विजयाताई आवटे, प्रतिष्ठान चे शिलेदार सचिव प्रविण वेखंडे, सुधीर पाटोळे,पी.डी.जाधव, नारायण मोहपे, योगेश ठाकरे , तुषार सापळे,महेश धिर्डे ,ग्रामस्थ नारायणदादा मडके,महादूबाबा मडके ,माधव उबाळे ,महिला प्रतिनिधी अगिवले ताई,मडके ताई गुणवत्ताधारक विद्यार्थी सोशल डिस्टेसिंग पाळून उपस्थित होते.
 
या कार्यक्रमाचे ओघवते आणि लाघवी सूत्रसंचलन अरुण कराळे सरांनी केले तर लक्षवेधी असे आभार गुरुनाथ मडके सरांनी मानून कार्यक्रमाची सांगता केली.