पुस्तकांवर जीवापाड प्रेम करणारा अनोखा शिक्षक; शेकडो पुस्तके हजारो पाने काढली वाचून

भूषण सुतार    14-Jan-2021
Total Views |

पाली/गोमाशी : काही लोकांची पुस्तके आणि वाचन यांच्याशी अनोखी गट्टी जमलेली असते. सुधागड तालुक्यातील गाठेमाळ आदिवासी वाडीवरील शिक्षक सागर शिंदे यांचे पुस्तकप्रेम देखील असेच अनोखे आहे. त्यांनी सलग तीन वर्षांपासून तब्बल पावणे तीनशेहून अधिक पुस्तके आणि हजारो पाने वाचून काढली आहेत. विविध लेखकांच्या बहुमूल्य पुस्तकांचा ठेवा त्यांच्याकडे आहे. त्यांनी पुस्तकांचा ब्लॉग देखील काढला आहे. वाचलेल्या पुस्तकांचा अभिप्राय व अनुभव त्यामध्ये ते लिहितात. शिवाय समाजमाध्यमांद्वारे वाचन संस्कृती रुजवीत आहेत.

 
Pustak02548_1  
 
सागर शिंदे यांच्याकडून सकाळने त्यांचे पुस्तकप्रेम व इतर छंदांबद्दल जाणून घेतले. साधारण चार पाच वर्षांपूर्वी सायकल घेऊन फिरायला जात होतो. ३ वर्ष भरपूर सायकलिंग केली. आयुष्यात असा मूर्खपणा (Insane) करता आला पाहिजे. असे मिश्कीलपणे शिंदे म्हणाले. नंतर २०१८ मध्ये असाच मूर्खपणा करावासा वाटला, आणि स्वतःच एक चॅलेंज घेतले! २०१८ मध्ये किमान १०० पुस्तके वाचायची. पण तो संकल्प तडीस गेला नाही , त्यावर्षी ८२ पुस्तके वाचली आणि १८ पुस्तकं कमी पडली. २०१९ उजाडलं तेव्हा ठरवून टाकले आता या वर्षी १०० चा आकडा गाठायचा. आणि तसा तो गाठलाही. २०१९ मध्ये १०६ पुस्तकं वाचून काढली. २०१९ संपले. आता २०२० येणार होते. तेव्हा पुन्हा एकदा असाच वेडेपणा करून बघू, म्हणून हे पण चॅलेंज स्वीकारले. वर्षाच्या सुरुवातीला पहिलं पुस्तक हे नेल्सन मंडेला यांचे वाचायला घेतले. पुढे एक एक करत वाचत गेलो. मध्येच लॉक डाउन लागले. संधी की संकट या पेचात जग सापडले असताना, मला यात संधी दिसली. मग पुस्तकं भराभरा वाचत गेलो. मे महिन्याच्या १० तारखेलाच ५० पुस्तकांचा टप्पा गाठला. त्यानंतर पुस्तक वाचनाचा वेग मंदावला.
 
पण पुन्हा पुस्तकं उपलब्ध झाल्यावर तो वाढला. जी 101 पुस्तकं वाचली त्यातली किमान ३५ पुस्तकं वाचायला एकाच व्यक्तीने दिली होती. जेव्हा इतक्या साऱ्या पुस्तकांचा खजिना मी त्याच्याकडे पाहिला त्याक्षणी मला तो कुबेर आणि मी फकीर वाटलो. पुस्तकं वाचत होतो त्याची माहिती सतत बुक्स कट्टा ग्रुप वर देत होतो. फेसबुकवरही लिहीत राहिलो. पुस्तकाचा ब्लॉग याच वर्षी सुरू केला, त्या ब्लॉग ला वर्षभरात ७ हजार च्या आसपास लोकांनी भेट दिली. त्यावरचे लेख लोकांनी वाचले. हल्ली कुणाला वेळ आहे, सगळं जीवनच धावपळीचे तरी त्यांनी वेळात वेळ काढून ब्लॉग वाचला. उलट मीच कमी पडलो. अजून बरेच लेख लिहता आले असते. या वर्षी ते जमतंय का बघुयात असे सागर शिंदे म्हणाले.
 
आवड असेल तर अनेकांना प्रश्न पडतो , पुस्तक वाचायला वेळ काढायचा तरी कसा? त्याच्यावर एकच उत्तर आहे , आवड असेल तर सवड मिळेल. इथे शेवट करतो, सर्वांनी पुस्तकं वाचावीत कुणी किती वाचावीत हे ज्याने त्याने ठरवावे. पण जास्तीतजास्त पुस्तकं वाचण्याचा प्रयत्न करावा. असे सांगून सागर शिंदे यांनी पुस्तकरुपी धनासह नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.
 
नव्या पुस्तकांच्या वासाला तोड नाही
लॉकडाऊनच्या काळात किंडलचा वापर केला. काही पुस्तकं ऐकली. पण प्रत्यक्ष पुस्तकं वाचण्यात जी मजा येते किंवा जे सुख मिळते. ते किंडल किंवा ऑडिओ बुक्स मध्ये नाही मिळत. ते फीलच होत नाही . नव्या कोऱ्या पुस्तकाचा येणारा सुवास हा जगातील सर्वात सुंदर असा वास असतो. तो घेण्यात जी मजा असते ती किंडल किंवा ऑडिओ बुक्स मध्ये येत नाही. पण तिकडे ही मुशाफिरी करून पाहिली असे सागर शिंदे यांनी सांगितले.
 
यावर्षी नेल्सन मंडेला पासून सुरुवात झाल्यानंतर गांधी का मरत नाही , या पुस्तकाने वर्षाची सांगता झाली. गेल्या २ वर्षात पुस्तकामुळे जग नव्याने कळले, पुस्तकातील व्यक्ती या खऱ्याखुऱ्या आयुष्यातील व्यक्ती पेक्षा वेगळ्या असतात. आणि खरं सांगायचं तर सच्च्या असतात .
- सागर शिंदे, पुस्तकप्रेमी शिक्षक