जिल्ह्याचे पालक सचिव डॉ. संजय चहांदे यांनी घेतला जिल्ह्यातील विकास कामांचा आढावा

पारस सहाणे    12-Jan-2021
Total Views |
जव्हार : महाराष्ट्राच्या पाणीपुरवठा व स्वछता विभागाचे अपर मुख्य सचिव तसेच पालघर जिल्ह्याचे पालक सचिव डॉ. संजय चहांदे यांनी पालघरला भेट देऊन जिल्ह्याच्या विकास कामांचा आढावा घेतला. जिल्हाधिकारी कार्यालय नियोजन भवन येथे हा आढावा घेण्यात आला.
 
Palghar025555_1 &nbs
 
विविध विभागांच्या माध्यमातून जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करणे आवश्यक असल्याचे मत आढावा बैठकीत चहांदे यांनी व्यक्त केले. जिल्ह्यात झालेल्या काही विकास कामांबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. तर प्रत्येक विभागाचा आढावा घेत असताना विभागाला असलेल्या अडीअडचणी जाणून घेण्याचा प्रयत्न त्यांनी केला. जिल्हा मुख्यालय उभारत असलेल्या सिडको प्रशासनाकडून त्यांनी अनेक बाबी समजून घेतल्या. आढावा बैठकीच्या सुरुवातीला जिल्ह्यातील करोना स्थितीची माहिती पालक सचिव चहांदे यांनी प्रशासनाकडून घेतली. जिल्ह्यात कोरोना मुळे आता पर्यंत झालेले मृत्यू, सद्यस्थितीत दाखल रुग्ण, आता पर्यंत बरे झालेले रुग्ण याचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
 
त्यानंतर जिल्ह्यातील महसूल, कृषी, भूसंपादन, क्रीडा, नगररचना, वनहक्क आदी विभागांचा आढावा त्यांनी विभागप्रमुख यांच्याकडून घेतला. आता पर्यंत जिल्ह्यात वाटप झालेल्या पिक विम्या बद्दल पालक सचिव यांनी समाधान व्यक्त केले. सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात पार पडलेल्या बैठकीनंतर पालक सचिव यांनी जिल्हा परिषदेच्या संकुल सभागृहात जिल्हा परिषदेच्या सर्व विभागांचा आढावा घेतला.
 
यावेळी त्यांनी प्राधान्याने जिल्ह्यातील अंगणवाड्यांची माहिती घेतली. त्यानंतर ग्रामपंचायत विभाग, ग्रामीण विकास यंत्रणा, आरोग्य, पाणी पुरवठा, जलजीवन मिशन अशा विभागाच्या कामकाजाचा व विकासात्मक दृष्टीने होत असलेले काम याचा आढावा घेतला. यावेळी डॉ. संजय चहांदे यांनी प्रत्येक विभागाच्या रिक्त पदांबद्दल माहिती जाणून घेतली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ, वसई -विरार महापालिका आयुक्त डी. गंगाधरन, मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धाराम सालीमठ, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. किरण महाजन इतर अधिकारी, सर्व विभागप्रमुख, कर्मचारी आढावा बैठकीस उपस्थित होते.