कृषि विभागाच्या योजना ग्रामीण भागातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणार

जनदूत टिम    11-Jan-2021
Total Views |

कृषि, पशुसंवर्धन व दुग्धशाळा समिती सभापती संजय निमसे यांनी कल्याण, मुरबाड, शहापूर, तालुक्यातील लाभार्थी शेतकऱ्यांशी साधला संवाद

ठाणे : जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना कृषि विभागाच्या माध्यमातून विविध योजनांचा लाभ देण्यात आला आहे. या योजनांची झालेली फलश्रुती पाहण्यासाठी आज जिल्हा परिषदेचे कृषि, पशुसंवर्धन व दुग्धशाळा समिती सभापती संजय निमसे यांनी कल्याण, मुरबाड व शहापूर तालुक्यातील लाभार्थी शेतकऱ्यांची भेट घेऊन संवाद साधला. यावेळी कृषि विभागाच्या विविध योजनांचा लाभ जिल्ह्यातल्या गरजू शेतकऱ्यांना मिळायला हवा.यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे ते म्हणाले.

Thane69_1  H x  
 
या दौऱ्याच्या निमित्ताने त्यांनी राष्ट्रीय बायोगॅस विकास कार्यक्रम अंतर्गत शिवाजी गोंधळी व रामचंद्र वाघेरे यांना लाभ देण्यात आलेल्या बायोगॅस सयंत्राची पाहणी केली. तसेच जिल्हा परिषद सेस फंडा अंतर्गत कटोर स्प्रे पंप, कडबा कुटी व इतर अवजारे यंत्राची पाहणी केली. त्याच बरोबर शहापूर तालुक्यातील वसंत परटोळे व इतर शेतकऱ्यांना चाळीस एकर ओलिताखाली क्षेत्रात पाईप लाईन व पंप संचाचा लाभ देण्यात आला होता. त्यांच्या शेतावर जाऊन या साहित्याची पाहणी केलीं. त्यानंतर शहापूर येथील अंबरजे गावातील लाभार्थी राजूबाई वाघे यांनी सन २०१७-१८ मध्ये बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना अंतर्गत नवीन सिंचन विहीर तसेच जिल्हा परिषद सेस फंड योजना अंतर्गत मोगरा, सोनचाफा लागवड केली आहे.व मनरेगा अंतर्गत आंबा लागवड केली आहे. त्याची पाहणी केली. त्यानंतर शेडनेट हाऊस, भाजीपाला लागवड प्लॉटला भेट दिली.
 
त्यानंतर मुरबाड तालुक्यातील मौजे शिरगाव येथील काशीनाथ डोहळे या शेतकऱ्यांना जिल्हा परिषद सेस फंडातून देण्यात आलेल्या रोटाव्हेटर अवजाराची पाहणी केली. तसेच प्रगती ग्रामसंस्था या महिला बचतगटाला देण्यात आलेल्या पावरटिलर व ट्रॉली सुधारित अवजारांची पाहणी केली. तसेच किशोर गावातील कुलस्वामिनी महिला बचतगटाला जिल्हा परिषद सेस योजना सन २०१९-२० अंतर्गत वाटप करण्यात आलेल्या पावरटिलर, ट्रॉली, भातकापणी यंत्र, ताडपत्री, मोटार, पी.व्ही।सी.पाईप, बॅटरी ऑपरेटेट स्प्रे पंप,इ अवजारे बँकेची पाहणी केली. काशिनाथ गायकर या शेतकर्यांना लाभ मिळालेल्या अवजारेची पाहणी करून या सर्व लाभार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला. या कामाची पाहणी केल्यानंतर श्री.निमसे यांनी कृषि विभागाच्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले. या दौऱ्या दरम्यान निमसे यांच्या अध्यक्षतेखाली किसन इको फार्म येथे कृषि विभागाची मासिक बैठक संपन्न झाली.
 
या बैठकीला मुरबाड पंचायत समिती सभापती तथा कृषि समिती सदस्य श्रीकांत धुमाळ, तसेच जिल्हा परिषद सदस्य कैलास जाधव, राजेंद्र विशे, देवराम भगत, किसन गिरा, कांचन बांगर, मोहन जाधव , तसेच शहापूर गट विकास अधिकारी अशोक भवारी, कृषि विकास अधिकारी श्रीधर काळे, जिल्हा कृषि अधिकारी सारिका शेलार, व डी. बी.घुले, पंचायत समिती कृषि अधिकारी विलास झुंझारराव , विलास घुले, सचिन गंगावणे, आर आर जाधव, सुनील संत , दिनेश घोलप, श्रीमती गवळी, संदेश म्हस्के व इतर तालुक्यातील कृषि विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. यावेळी किसन चौधरी यांना जिल्हा परिषद सेस फंड योजने अंतर्गत गटोर स्प्रे पंप या अवजाराचा मान्यवरांच्या उपस्थितीत लाभ देण्यात आला.