हिंदुस्थानमधील शिवप्रेमींनी छ. शिवरायांचे सुवर्ण सिंहासन पुनर्स्थापित करण्यासाठी पुढे यावे

जनदूत टिम    11-Jan-2021
Total Views |

संभाजीराव भिडे गुरूजींनी घातली शिवप्रेमींना साद

नगर : हिंदवी स्वराज्याचे स्फुल्लिंग ठरलेल्या किल्ले रायगडावर ३२ मण वजनाचे सुवर्ण सिंहासन जसे होते तसेच पुर्नस्थापन करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेले ३२ मण सुवर्ण सिंहासन हिंदु तरूण पिढीला स्फूर्ती देण्याकरिता पुर्नस्थापित करणे काळाची गरज आहे. या सुवर्ण सिंहासनाच्या निर्मितीसाठी महाराष्ट्रासह संपूर्ण हिंदुस्थानमधील शिवप्रेमींनी योगदान देण्यास स्वयंस्फूर्तीने पुढे येणे राष्ट्रहिताचे ठरणार आहे, असे श्रीशिवप्रतिष्ठान हिन्दुस्थानचे संस्थापक संभाजीराव भिडे गुरूजी यांनी सांगितले.
 
sambhaji025_1  
 
येथील टिळक रोडवरील पटेल मंगल कार्यालयात धारकरी युवकांशी संवाद साधताना ते बोलत होते. नगर जिल्ह्यातील धारकरी युवकांचा संभाजीराव भिडे गुरूजींच्या सहवासातील उत्साह वाखाणण्याजोगा होता. डाॅ. एकनाथ मुंढे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. धर्मासाठी झुंजावे...हा प्रेरणा मंत्र सामुहिकपणे म्हटल्यानंतर भिडे गुरूजींनी मार्गदर्शन करण्यास सुरूवात केली.
 
भिडे गुरूजी पुढे म्हणाले, भगिरथ प्रयत्नांनी शिवरायांनी स्वराज्य निर्माण करण्याचा इतिहास घडवला. हा इतिहास जपण्याचे व त्यापासून प्रेरणा घेण्याचे आपणा सर्वांचेच प्रथम कर्तव्य आहे. हिंदवी स्वराज्य हे शिवरायांचे स्वप्न होते. ते त्यांनी साकार केले. हिंदूंना सतत प्रेरणा देत राहिल, अशा स्वराज्याची हिमतीने स्थापना केली. किल्ले रायगडावर ३२ मण वजनाचे सुवर्ण सिंहासन स्थापना करून केलेला शानदार राज्याभिषेक सोहळा हिंदवी स्वराज्याच्या भगव्याचे तेज दाखवून देणारा ठरला. हिंदूंना सतत प्रेरणा व स्फूर्ती देत रहाणारे सुवर्ण सिंहासन किल्ले रायगडावर असणे अत्यावश्यक आहे. त्यामुळेच हे सिंहासन पुनर्स्थापित करण्याचा विडा आपल्या सर्वांच्या बळावर उचलला आहे. शिवभक्तांनी सुवर्ण सिंहासनाची उभारणी हेच जीवनाचे लक्ष्य ठेवले तर अल्पावधीत किल्ले रायगडावर ३२ मण वजनाचे सुवर्ण सिंहासन विराजमान झालेले दिसेल. ते पहाण्याचे भाग्य आपल्या पिढीला लाभेल.
 
गड-कोटांच्या पायी दर्शनाची मोहिम ही शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमधून धर्मासाठी प्रेरणा घेण्याकरिताच आखली जाते. यावर्षी दि.२८ ते दि.३१ जानेवारी २०२१ दरम्यान विशाळगड व पन्हाळगडचे जवळून दर्शन घेण्यासाठी ही मोहिम होणार आहे. मोहिमेचे नियोजन जोमात सुरू आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी निजामशाहीचे उच्चाटन करण्यासाठी अथक कष्ट घेतले या इतिहासाची आठवण ठेवत नगर जिल्ह्यातील सर्व तालुक्यामधून अधिकाधिक शिवप्रेमींनी या किल्ले मोहिमेत सहभागी व्हावे. गड-कोट मोहिम ज्ञानाचा प्रकाश लाभण्यासाठी आणि हिंदवी स्वराज्य योग आचरण्यास प्रेरणा मिळण्यासाठीच आखली जाते. या मोहिमेत सहभागी झालेला प्रत्येक हिंदू धारकरी देव - देश अन् धर्म हे जीवन ध्येय समोर ठेवून वाटचाल करत रहातो, असे भिडे गुरूजींनी मोठ्या अभिमानाने सांगितले. श्रीशिवप्रतिष्ठान हिन्दुस्थान नगर जिल्हातर्फे यावर्षी प्रथमच अत्यंत आकर्षकरित्या तयार केलेल्या वार्षिक दिनदर्शिकेचे भिडे गुरूजींनी कौतुक केले.
 
या आढावा बैठकीस श्रीशिवप्रतिष्ठान हिन्दुस्थानचे नगर जिल्हा प्रमुख बापू ठाणगे तसेच विनोद काशीद, संदिप खामकर,अक्षय सुकटकर, अंकुश तरवडे, अमोल हुम्बे, साई भोरे, आशिष क्षीरसागर, महेश जाधव यांच्यासह नगर जिल्ह्यातील धारकरी
उपस्थित होते.