राज्यात कोविड संदर्भात २ लाख ७० हजार गुन्हे, २८ कोटी ४० लाख रुपयांची दंड आकारणी - गृहमंत्री देशमुख

जनदूत टिम    28-Sep-2020
Total Views |
१०० नंबरवर १ लाख १३ हजार फोन
मुंबई : लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत ‘कोविड’ संदर्भात कलम १८८ नुसार २ लाख ७० हजार गुन्हे, तसेच १३४७ वाहनांवर अवैध वाहतूकीचे गुन्हे दाखल तर २८ कोटी ४० लाख रुपयांची दंड आकारणी करण्यात आली, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.
 
anil-deshmukh_1 &nbs
 
राज्यात दि. २२ मार्च ते २६ सप्टेंबर पर्यंत कलम १८८ नुसार २,७०,५७१ गुन्हे नोंद झाले असून ३७,०४२ व्यक्तींना अटक करण्यात आली असून ९६,४३० वाहने जप्त केली आहेत. यातील विविध गुन्ह्यांसाठी २८ कोटी ४० लाख ६० हजार २६४ रुपये दंड आकारण्यात आला आहे.
 
कोविड योद्ध्यांवर हल्ले करणारांवर कडक कारवाई
कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी पोलीस दल, आरोग्य विभाग, डॉक्टर्स, परिचारिका आदी काविड योद्धे अहोरात्र मेहनत घेत आहेत. परंतु काही दुष्ट प्रवृत्ती त्यांच्यावर हल्ला करीत आहेत. अशा हल्लेखोरांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे आदेश पोलीस विभागाला देण्यात आलेले आहेत. या दरम्यान पोलिसांवर हल्ला होण्याच्या ३६४ घटना घडल्या. त्यात ८९५ व्यक्तींना ताब्यात घेतले असून पुढील कारवाई सुरू आहे.
 
१०० नंबर वर १ लाखाहून अधिक कॉल्स
पोलीस विभागाचा १०० नंबर हा सर्व जिल्ह्यात २४ तास कार्यरत असतो. लॉकडाऊनच्या काळात या दूरध्वनीवर १,१३,२९३ वेळा संपर्क (कॉल्स) करण्यात आला. त्या सर्वांची योग्य ती दखल घेण्यात आली. या काळात अवैध वाहतूक करणाऱ्या १३४७ वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आले; तर ९६,४३० वाहने जप्त करण्यात आली.
 
पोलिस कोरोना कक्ष
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नात दुर्देवाने राज्यातील २१७ पोलीस व २४ अधिकारी अशा एकूण २४१ पोलिस कर्मचारी-अधिकारी बांधवांचा मृत्यू झाला. पोलिसांना जर कोरोना संदर्भातील काही लक्षणे दिसून आली तर त्यांच्यावर तातडीने उपचार व्हावेत, याकरिता राज्यात सर्वत्र नियंत्रण कक्ष स्थापन केले आहेत.
 
कोरोनाविरुद्ध लढ्यात नागरिकाचा सहभाग
कोरोना विरुद्धच्या लढाईत राज्यातील प्रत्येक नागरिकाचा सहभाग हा अपेक्षित आहे. तसेच योग्य सामाजिक अंतर (सोशल डिस्टन्सिंग) पाळण्याची मोठी जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. सर्वांनी नियम पाळून सहकार्य करावे, असे आवाहन गृहमंत्र्यांनी केले आहे.