कोविड - १९ मध्ये कार्यरत शिक्षकांना ५० लाखाचे सुरक्षा कवच द्या – आ. विनोद निकोले

जनदूत टिम    17-Sep-2020
Total Views |
डहाणू : कोरोना कामी ड्यटीवरील शिक्षकांना ५० लाखाचे सुरक्षा कवच द्यावे अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे मार्क्सवादी कम्युनिट पक्षाचे डहाणू विधानसभा आमदार कॉम्रेड विनोद निकोले यांनी महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री, शालेय शिक्षण मंत्री आणि सार्वजनिक आरोग्य मंत्री यांच्याकडे ई-मेल द्वारे केली आहे.
 
mla nikole_1  H
 
यावेळी आ. निकोले म्हणाले की, वाढत्या कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी शासनाने ' माझे कुटुंब, माझी जबाबदारी ' ही मोहीम हाती घेतली आहे. या मोहीमेत कुटुंबातील प्रत्येक सदस्याची ऑक्सिजन व तापमान तपासणी केली जाणार आहे. या कामी शिक्षकांचीही नेमणूक केली असल्याचे समजते. याच कामी शासनाने इतर कर्मचारी वर्गाला ५० लाखाचे सुरक्षा कवच घोषित केले आहे, पण ही सुविधा शिक्षकांना देण्यात आली नाही.
 
याच कामात इतर कर्मचारी व शिक्षकांमध्ये असणारा दुजाभाव दूर व्हावा यासाठी या कामी नेमणूक असणाऱ्या सर्व शिक्षकांना ५० लाखाचे सुरक्षा कवच मिळणे आवश्यक आहे. तसेच कोविड - १९ नियंत्रणासाठी तसेच मृत्यू दर कमी करण्यासाठी माझे कुटुंब - माझी जबाबदारी " कोविड मुक्त महाराष्ट्र ही मोहीम राबविण्यात येत आहे त्याबद्दल प्रशासनाचे धन्यवाद. त्याच बरोबर कोरोना कोविड - १९ विषाणू शी लढण्यासाठी आपण सर्वजण कसोशीने प्रयत्न करत आहोत. त्यात "माझे कुटुंब - माझी जबाबदारी" या मोहिमेत शिक्षकांचा समावेश करून त्यांच्या माध्यमातून सदरहू मोहीम राबविण्यात येत आहे. पण, शिक्षकांना कोणत्याही प्रकारचे सुरक्षा कवच देण्यात आलेले नाही अशी प्राथमिक माहिती आहे. शिक्षक हे प्रत्येक घरोघरी जाऊन घरातील प्रत्येक सदस्यांचे थर्मल मीटर / ऑक्सिजन तपासणी करणार आहेत त्यात प्रत्यक्ष -अप्रत्यक्ष संबंध हा नागरिकांशी येणार आहे. त्यामुळे शिक्षकांना कोरोना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
 
या अनुषंगाने ज्या प्रमाणे आशा वर्कर, नर्स, डॉक्टर, अर्थात आरोग्य कर्मचारी, पोलीस, शासकीय - निमशासकीय कर्मचारी यांना ज्या प्रमाणे ५० लाखांचे सुरक्षा कवच देण्यात आले आहे, त्याचप्रमाणे कोविड - १९ मध्ये कार्यरत शिक्षक यांना सुद्धा ५० लाखाचे सुरक्षा कवच देणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने तात्काळ कोविड – १९ मध्ये कार्यरत शिक्षकांना तात्पुरते अत्यावश्यक सेवेत समावेश करून त्यांना सुद्धा ५० लाखाचे सुरक्षा कवच देण्यात यावे अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिट पक्षाचे डहाणू विधानसभा आमदार कॉम्रेड विनोद निकोले यांनी केली आहे. यावेळी माकप जिल्हा कमिटी सदस्य कॉ. चंद्रकांत गोरखना, डॉ. आदित्य अहिरे आदी उपस्थित होते.