मुरबाडमध्ये कोरोनाच्या नावाने क्रूर काळा बाजार!

जनदूत टिम    01-Sep-2020
Total Views |

- मुरबाड ग्रामीण रुग्णालयाच्या डॉक्टर नरहरी फड यांच्या आर्थिक गैरव्यवहाराचा मुरबाड मनसेने केला पर्दाफाश!
- मुरबाडच्या आरोग्य प्रशासनाच्या नावाला एका डॉक्टरने फासला काळिमा!

 
मुरबाड : आर्थिक गैरव्यवहाराने माजलेले गेंड्याच्या कातडीचे अनेक प्रशासकीय अधिकारी सध्या मुरबाडमध्ये कोणाचाही धाक नसल्याने भ्रष्टाचाराचा नंगानाच करताना दिसत आहेत. पण आता ही भ्रष्टाचाराची लिंक जास्त दिवस शाबूत राहणार नाही, कारण अशा काळ्या बुरख्याच्या मस्तवाल अधिकाऱ्यांचा पर्दाफाश करण्याचं काम मुरबाड महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आता हाती घेतले आहे . त्याचा शुभारंभ नुकताच मुरबाडच्या ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर नरहरी फड यांच्या रूपाने झाला आहे.
 
Dr. Bhoir_1  H
 
स्वतःची बदली थांबविण्यामागची सगळी कारस्थानं उघडी पाडण्याचे काम मुरबाडच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केले आहे. डॉक्टर फड यांनी कोरोनाच्या नावाने १० हजार रुपयांची रक्कम उकळवून केलेल्या गैरव्यवहाराचा नुकताच मुरबाड मनसेने पत्रकार परिषद घेऊन हा हा काळा प्रकार उघडकीस आणला आहे. याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, महाराष्ट्र नवनिर्माण सेना मुरबाड तालुका अध्यक्ष कैलास चौधरी, मुरबाड शहर अध्यक्ष नरेश देसले व शहर उपाध्यक्ष विलास हुमणे यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार १९ ऑगस्ट रोजी वनिता केशव भोईर ,राहणार - गेगाव, तालुका- शहापूर , वय- ५६ या सरळगाव येथील डॉक्टर भोईर यांच्या खाजगी दवाखान्यात गेल्या असता त्यांना दम लागत असल्याने डॉक्टर भोईर यांनी त्यांना पुढील उपचारासाठी मुरबाडच्या ग्रामीण रुग्णालयात जाण्यास सांगितले. ग्रामीण रुग्णालयात मात्र कहरच झाला.
 
येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर फड यांनी रुग्णाला तपासून त्याला १२ हजार रुपयांची इंजेक्शन द्यावी लागतील असे सुचविले. सदर रुग्णाच्या नातेवाईकांनी तात्काळ याबाबत मुरबाड मनसे शहर उपाध्यक्ष विलास हुमणे यांना ही माहिती दिली . त्यानंतर हुमणे यांनी डॉक्टर फड यांना फोन करून याबाबत विचारणा केली. तेव्हा डॉक्टर फड यांनी हुमणे यांना सांगितले की तुम्ही फक्त दोन हजार रुपयांचे एक इंजेक्शन आणा , बाकीचे मी बघतो, व त्यातल्या त्यात कोणतीही टेस्ट न करता सदर रुग्णाला कोरोना असल्याचे डॉक्टर फड यांनी सांगितले.  
 
पुढील उपचारासाठी मुरबाडमधील डॉक्टर कोळी किंवा उल्हासनगर येथील शासकीय रुग्णालयात रुग्णाला भरती करण्यास सांगितले. पुन्हा सकाळी २० ऑगस्ट रोजी हुमणे यांनी डॉक्टर फड यांना फोन केला असता रुग्णाची ऑक्सिजन लेव्हल शून्य झाल्याचे डॉक्टर फड यांनी हुमणे याना सांगितले. व आता रुग्ण फक्त दोनच तास जिवंत राहू शकतो असेही सांगितले. त्यानंतर डॉक्टर फड यांनी सदर रुग्णाच्या नातेवाईकांना सांगितले की, मला १० हजार रुपये द्या, मी या रुग्णाची जबाबदारी घेतो. तात्काळ घाबरलेल्या रुग्णाच्या नातेवाईकांनी त्याच दिवशी दुपारी १.०० वाजता डॉक्टर फड यांना १० हजार रुपये दिले. परंतु त्याच दिवशी दुपारी २.०० वाजता सदर रुग्णाची प्रकृती खालावल्याने डॉक्टर फड यांनी या रुग्णाला घरी नेण्यास सांगितले.
 
हा घटनाक्रम घडत असताना रुग्णाला डॉक्टर फड यांनी सलग १६ तास संशयित कोरोना रुग्णास उपचारासाठी अपघात विभागात ठेवले होते. यामुळे विविध नातेवाईक सदर रुग्णाला भेटायला येत होते. डॉक्टर फड यांच्या पैशाच्या हव्यासापोटी त्यांनी तालुक्यातील जनतेचा जीव बऱ्याच वेळा धोक्यात घातल्याच्या तक्रारी मुरबाड मनसेकडे येत होत्या. कोरोनाच्या नावाने गेले अनेक दिवसांचा काळाबाजार अखेर मुरबाड मनसेने उघडकीस आणण्याची कामगिरी केली आहे. या काळ्या घटनेनंतर सदर रुग्णाचा २२ ऑगस्ट रोजी कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असून २३ ऑगस्ट रोजी या रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. या अगोदरही डॉक्टर फड यांच्या या आर्थिक मनमानीच्या अनेक तक्रारी मुरबाड मनसे कडे येत होत्या त्या सर्वांची पापाची गोळाबेरीज अखेर मनसेने डॉक्टर फड यांच्या पैशाच्या हव्यासातून उघडकीस आली आहे.
 
या आर्थिक गैरव्यवहारात अनेक शासकीय कर्मचाऱ्यांची साखळी असल्याचे वारंवार निदर्शनास आले आहे. तालुक्यातील अनेक रुग्णांवर शासकीय कोविड हॉस्पिटलमध्ये उपचार न करता त्यांना खाजगी रुग्णालयात पाठविले जाते. व या प्रकारामुळे खाजगी हॉस्पिटलमध्ये रुग्णांची आर्थिक पिळवणूक होते. डॉक्टर फड यांनी केलेल्या या गैर काळ्या कृत्याची सखोल चौकशी व्हावी व डॉक्टर फड यांना तात्काळ निलंबित करावे अशी मागणी मुरबाड महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी पत्रकार परिषदेत केली. जर डॉक्टर फडसारख्या गैरव्यवहार करणाऱ्या गेंड्याच्या कातडीच्या वैद्यकीय अधिकाऱ्याला निलंबित केले नाही तर मुरबाड महाराष्ट्र नवनिर्माण सेना लवकरच जनआंदोलन उभे केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा यावेळी केटीव्ही न्युजशी बोलताना तालुका अध्यक्ष कैलास चौधरी यांनी दिला .
 
डॉक्टर फड यांनी रुग्णाच्या नातेवाईकांकडून रोख रक्कम दहा हजार घेतल्याची कबुली दिल्याची मोबाईलमधील संभाषण ध्वनिफीत केटीव्ही न्युजच्या हाती सापडली आहे. या काळ्या प्रकारची मुरबाड मनसेने मुंबई महामंडळ ठाणे उपसंचालक, जिल्हाधिकारी ठाणे, जिल्हा शल्य चिकित्सक ठाणे, जिल्हा आरोग्य अधिकारी ठाणे, मुरबाडचे तहसीलदार, मुरबाडचे गटविकास अधिकारी, तालुका अरोग्य अधिकारी , ग्रामीण रुग्णालयाच्या अधीक्षक याना निवेदन देऊन तक्रार केली आहे. या मनसे ने केलेल्या पर्दाफासामुळे लवकरच तालुक्यातील बोगस डॉक्टर, बोगस व लोकांना लुटणारे मेडिकलवाले, लोकांना लुटणारे डॉक्टर, रॉयल्टी खाणारे अधिकारी, भ्रष्टाचार करणारे अधिकारी, कामे न करता ती कागदावर दाखविणारे अधिकारी , मुरबाडमध्ये कोरोना किती निधी हडप झाला व तो कोणी केला याचीही आता चौकशी होण्याची शक्यता आहे. तहसीलदार कार्यालय, पंचायत समिती, व इतर प्रशासकीय अधिकाऱ्यांचे काळे धंदे आता लवकरच उघडकीस येणार आहेत.व त्यांचे दिवस आता मुरबाड मनसेमूळे भरत आल्याची चर्चा आता जनमानसात होत आहे.