निसर्ग चक्रीवादळग्रस्त शाळा-महाविद्यालयांचा शैक्षणिक सुविधांसह दर्जा सुधारण्यास प्रयत्नशील : पालकमंत्री आदिती तटकरे

जनदूत टिम    09-Aug-2020
Total Views |
माणगांव : रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील काही भाग निसर्ग चक्रीवादळामुळे क्षतीग्रस्त झाला. यात काही शाळा-महाविद्यालयांच्या इमारतीचे तसेच शैक्षणिक सोयीसुविधांचे अतोनात नुकसान झाले. नजिकच्या काळात चक्रीवादळग्रस्त शाळा-महाविद्यालयांचा शैक्षणिक सोयीसुविधांसह दर्जा सुधारण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न केले जातील, असे प्रतिपादन पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी आज येथे केले.
 
Aditi Tatkare_1 &nbs
 
माणगाव तालुक्यातील गोरेगाव येथे दोशी वकील आर्ट्स कॉलेज येथील सभागृहात राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टतर्फे निसर्ग चक्रीवादळग्रस्त महाविद्यालयांना संगणक व इतर शैक्षणिक साहित्य वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी त्या बोलत होत्या.
 
यावेळी खासदार सुप्रिया सुळे, खासदार सुनील तटकरे, आमदार अनिकेत तटकरे, माजी आमदार सुरेश लाड, माणगाव पंचायत समिती सभापती अलका जाधव, गोरेगाव सरपंच झुबेर अब्बासी, अशासकीय महाविद्यालय संघटनेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.शिवारे, मुंबई विद्यापीठाचे अधिसभा सदस्य संजय शेटे, प्रदीप सावंत, कोकण विभाग शिक्षण विभागाचे सहसंचालक प्रा.डॉ.संजय जगताप, एनएसएसचे राज्य समन्वयक डॉ.अतुल साळुंखे, साै.गीता पालरेचा, साै.अरुणा शेठ, शांतीलाल मेथास, श्री.दिलीप शेठ, प्रांताधिकारी प्रशाली जाधव-दिघावकर, तहसिलदार प्रियंका कांबळे-आयरे उपस्थित होते.
 
पालकमंत्री कु.आदिती तटकरे पुढे म्हणाल्या, रायगड जिल्ह्याचे सुरुवातीला करोना आणि नंतर निसर्ग चक्रीवादळाने खूप नुकसान केले. मात्र या संकट काळात खासदार शरद पवार यांच्यासह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, जयंत पाटील तसेच मंत्रिमंडळातील इतर सहकारी मंत्र्यांनी तत्परतेने केलेली मदत व मार्गदर्शन जिल्ह्यासाठी व संपूर्ण कोकणासाठी खूपच मोलाचे ठरले. या सर्वांप्रती ऋण व्यक्त करताना त्या म्हणाल्या की, ही सुरुवात आहे. नजिकच्या काळात नुकसानग्रस्त सर्वच अनुदानित, विनाअनुदानित शैक्षणिक संस्थांना आवश्यक ती सर्व प्रकारची मदत शासनाकडून केली जाईल.
 
खासदार सुनील तटकरे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना प्रथम खासदार शरद पवार यांचे मनःपूर्वक आभार मानले. खासदार शरद पवार यांनी या वयातही कराेनासारख्या संकटात चक्रीवादळानंतर लगेचच रायगड व रत्नागिरी जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाचा पाहणी दौरा केला. येथील परिस्थिती पाहून तातडीने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना येथील वस्तुस्थिती गंभीर असल्याचे व या भागासाठी मदतीचे निकष बदलून येथील जनतेला अधिकाधिक मदत देण्याविषयी अमूल्य असे मार्गदर्शन केले. त्यामुळेच येथील नुकसानग्रस्त नागरिकांना शासनाकडून जास्तीत जास्त मदत देण्याचा निर्णय तातडीने घेण्यात आला आणि राबविण्यात आला.
 
ते पुढे म्हणाले, पुढील काळात ऑनलाइन शिक्षण ही बाब महत्त्वाची ठरणार आहे, या गोष्टीचा दूरदृष्टीने विचार करून खासदार शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, जयंत पाटील यांनी चक्रीवादळातील नुकसान झालेल्या १६ महाविद्यालयांना संगणक, प्रिंटर, फळा यासारख्या शैक्षणिक साहित्यासह सॅनिटायजिंग मशीन, पंखे, खुर्च्या, एलईडी बल्ब, ट्यूबलाइट,वॉटर कुलर, सीसीटीव्ही, प्रोजेक्टर यासारखी उपयुक्त साधन सामग्रीही देण्याचा निर्णय घेतला.
 
शेवटी लवकरच लोककलावंतांना तसेच नाट्यक्षेत्रातील पडद्यामागील कलाकारांना, तंत्रज्ञानाही राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या माध्यमातून शक्य तेवढी मदत केली जाणार असल्याचे सांगून खासदार सुनील तटकरे यांनी खासदार शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, जयंत पाटील तसेच राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टचे मनःपूर्वक आभार मानले.
 
खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात म्हटले की, कोकणातील विद्यार्थ्यांनी शालांत व उच्च माध्यमिक शालांत परीक्षेत उल्लेखनीय बाजी मारली. त्यांच्या भविष्यातील शिक्षणाचा वेध घेत आजची ही मदत केली जात आहे.शेवटी गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देऊन नागरिकांनी सुरक्षितता बाळगून, काळजी घेऊन शासनाच्या सूचनांचे पालन करून गणेशोत्सव साजरा करण्याचे नागरिकांना आवाहन केले.
सदर कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने करण्यात आली. त्यानंतर प्रास्ताविक माजी आमदार सुरेश लाड यांनी केले, आभार डॉ.अतुल साळुंखे यांनी मानले तर सूत्रसंचालन डॉ. श्रीकांत चांदोरकर यांनी केले.
या कार्यक्रमास माणगाव तालुक्यातील अनेक मान्यवर, प्रशासकीय अधिकारी-कर्मचारी त्याचबरोबर निसर्ग चक्रीवादळग्रस्त महाविद्यालयातील शिक्षक, पालक उपस्थित होते.