भिवंडीतील निकृष्ठ रस्ते उखडले ; पावसाच्या पाण्याने केली मनपाच्या निकृष्ठ कामाची पोलखोल

नितिन पंडीत    05-Aug-2020
Total Views |
भिवंडी : बुधवारी रात्रीपासून शहर व ग्रामीण भागात पावसाने जोरदार हजेरी लावली होती. मुसळधार पावसाने शहरातील सखल भागात पाणी तुंबल्याने मनपाने केलेला नाले सफाईचा दावा फोल ठरला आहे. त्याचबरोबर पावसाळ्याची पूर्व तयारी म्हणून लॉकडाऊन आधी फेब्रुवारी महिन्यात शहरातील मुख्य व अंतर्गत रस्त्यांची मनपा प्रशासनाकडून दुरुस्ती करण्यात आली होती. मनपाच्या वतीने शहरातील खड्डेमय रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात आले .
 
road_1  H x W:
 
यासाठी मनपाप्रशासनाने कोट्यावधींचा खर्च देखील केला आहे. मात्र मुसळधार पावसात निकृष्ठ दर्जाचे डांबरी रस्ते बुधवारी उखडले व रस्त्यावर भले मोठे भगदाड पडल्याची घटना धामणकर नाका - कामतघर रस्त्यावर घडली आहे. विशेष म्हणजे फेब्रुवारी महिन्यात या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम सुरु असताना हे काम कसे निकृष्ठ आहे याची चित्रफीत एका दक्ष नागरिकाने सोशल मीडियावर प्रसारित केली होती. या व्हायरल व्हिडीओची दखल मनपा प्रशासनाने घेतली मात्र कंत्रातदारावर कोणतीही कारवाई न करता फक्त निकृष्ठ दर्जाचे काम केलेला भाग जेसीबीच्या साहाय्याने काढून टाकण्यात आला होता. मनपाच्या या अजब कारभाराची शहरातून प्रचंड खिल्ली उडवली गेली होती , मात्र गेंड्याची कातडी परिधान केलवल्या व ठेकेदारांकडून आर्थिक मलिदा खाणाऱ्या मनपाच्या अधिकाऱ्यांवर कोणताही परिमाण झाला नाही .
 
येत्या पावसाळ्यात हा रस्ता अजिबात टिकणार नसल्याचा दावा दक्ष नागरिक ऍड भागवत वाघमारे यकानी केला होता . मात्र त्याकडे मनपाने दुर्लक्ष केले. अखेर मनपाचा हा हलगर्जी पणा मुसळधार पावसात जनतेसमोर आला आहे. वऱ्हाळदेवी तलावाच्या बाजूला असलेल्या उतारावर भुयारी गटारांवर टाकलेले व रस्त्याचे केलेले डांबरीकरण अक्षरशः ढासळले व त्याठिकाणी मोठे भगदाड पडले आहे. सुदैवाने या घटनेत कुठलीही जिवीत हानी झाली नाही. मात्र रस्त्याचे अशा प्रकारे निकृष्ठ काम करणाऱ्या ठेकेदारांवर व मनपाच्या संबंधित बेजबाबदार अधिकाऱ्यांवर मनपा आयुक्त डॉ पंकज आशिया काय कारवाई करतात याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.