एकनाथ शिंदे यांची छत्तीसगढ सीमेनजीकच्या नक्षलग्रस्त संवेदनशील परिसराला भेट

जनदूत टिम    03-Aug-2020
Total Views |

- गडचिरोलीतील आदिवासी कुटुंबियांची केली आस्थेने विचारपूस

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी पुन्हा स्वीकारलेले एकनाथ शिंदे यांनी दोन दिवसांच्या गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यात रविवारी महाराष्ट्र-छत्तीसगढ सीमेनजीकच्या नक्षलग्रस्त संवेदनशील परिसराला भेट देऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेतला. प्रथमच सरकारचा कोणी मंत्री संवाद साधण्यासाठी या परिसरात आल्यामुळे येथील आदिवासी बांधवांनीही आनंद व्यक्त केला. विशेष म्हणजे नक्षलवाद्यांचा शहीद सप्ताह सुरू असतानाही एकनाथ शिंदे यांनी धोका पत्करून या संवेदनशील परिसराचा दौरा केला.
 
EKNATH_1  H x W
 
जिल्हा मुख्यालयापासून सुमारे ३०० किमी दूर असलेल्या छत्तीसगढच्या सीमेवरील पातागुडम या गावी एकनाथ शिंदे रविवारी पोहोचले. अवघ्या तीन महिन्यांपूर्वी या गावी वीज पोहोचली. सरकारचा मंत्री तर प्रथमच गावात आलेला. शिंदे यांनी गावातील काही आदिवासी कुटुंबियांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. ऐम कावाले (काय पाहिजे), मंचिगा उंदा (बरं आहे काय?) असे त्यांच्या भाषेत आस्थेने चौकशी करून त्यांच्याशी संवाद साधला. आदिवासी बांधवांनीही मोकळेपणाने श्री. शिंदे यांच्याकडे समस्या मांडल्या. एका मुलाने एसटीतील भरती निवड रखडल्याचा मुद्दा मांडला. शिंदे यांनी नक्षलपीडित दोन कुटुंबांना प्रत्येकी २५ हजार रुपयांची मदत केली. याप्रसंगी जिल्हाधिकारी दीपक सिंघला, पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद उपस्थित होते.
 
तत्पूर्वी शिंदे यांनी सिरोंचा तालुक्यातील इंद्रावती नदीवरील पुलाची पाहणी केली. तसेच, पातागुडम पोलिस स्टेशनला भेट देऊन तेथील पोलिस बांधव आणि एसआरपीएफ व बीएसएफ जवानांच्या वसतिगृहाची आणि कॅन्टीनची पाहणी करून या जवानांशी संवाद साधला आणि त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. नक्षलग्रस्त दुर्गम भागांमध्ये दळणवळणाचा प्रश्न मोठा असून रस्ते व पुल उभारणीत अनेक अडथळे आहेत. त्यामुळे येथील जनतेला रोजगाराबरोबरच आरोग्यविषयक समस्यांनाही सामोरे जावे लागते. त्यामुळे रस्त्यांची कामे मार्गी लावण्यासाठी काय करता येईल, याबाबत विचार सुरू असल्याचे शिंदे यांनी सांगितले. रोजगार निर्मितीला चालना मिळून येथील जनतेला न्याय मिळाल्यास नक्षलवादाचा प्रभाव कमी होईल आणि जिल्ह्याच्या विकासाला अधिक चालना मिळेल, असेही शिंदे म्हणाले.
 
तत्पूर्वी, शिंदे यांनी शनिवारी गडचिरोली जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयातील कोव्हीड केअर सेंटरला भेट दिली आणि पीपीई किट घालून रुग्णालयात जाऊन तेथील रुग्णांची आस्थेने विचारपूस केली. याठिकाणी प्रामुख्याने सीआरपीएफ, एसआरपीएफ, बीएसएफ आणि गडचिरोली पोलीस दलातील जवान आणि कर्मचारी उपचार घेत असून त्यांच्याशी संवाद साधून शिंदे यांनी त्यांचे मनोबल उंचावले. त्यांना फळांचे वाटप करण्यात आले असून दररोज अंडी, फळे आणि गरम पाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.