शेतकऱ्याचा शेतात गावची गटार गंगा

जनदूत टिम    02-Aug-2020
Total Views |

- शेकडो तक्रारी करून सुद्धा कल्याण पंचायत समिती प्रशासन सुस्त

कल्याण : ग्रामपंचायत गुरवलीने गावातील शेतकरी असलेल्या गजानन जयराम जाधव यांचे मागील १५ वर्ष त्यांच्या शेतात गटाराचे पाणी सोडून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आणून ठेवलेली आहे. याबाबत ग्रामपंचायत गुरवली, पंचायत समिती कल्याण, जिल्हा परिषद ठाणे, जिल्हाधिकारी ठाणे आणि थेट मंत्रालय पर्यंत तक्रार करून सुद्धा गरीब शेतकरी असलेल्या गजानन जयराम जाधव यांना अजूनही कोणतीही नुकसान भरपाई मिळालेली नाही. केलेल्या तक्रारींवर पंचायत समिती कल्याण हुन विस्तार अधिकारी विशाखा परटोळे आल्या असता त्यांनी चौकशी करण्याऐवजी फक्त पाहूनचार करून गेल्या आणि नेहमी प्रमाणे ग्रामपंचायत ची पाठराखण करायचे काम केलेले आहे, असे तक्रारदाराचे म्हणणे आहे.
 
Gutter Ganga_1  
 
त्यानंतर पंचायत समिती कल्याण मधून चौकशी अधिकारी तथा सनियंत्रण व मूल्यमापन अधिकारी श्री.एस. एस. संत आले होते. त्यांनी तक्रारी अर्जाच्या अनुषंगाने खालील बाबीनिदर्शनास आणून दिल्या आहेत.
१)गटाराचे सांडपाणी गजानन जाधव यांच्या शेतात मागील १५ वर्षांपासून जात आहे ही वस्तुस्थिती आहे
२) सदर गटारामध्ये शौचालयाचे सुद्धा पाणी सोडले आहे अशी तक्रार आहे.
३) गजानन जयराम जाधव यांच्या शेतातून गटाराचे पाणी वाहत आहे ही वस्तुस्थिती आहे.
४) अर्जदार हे सदर जागेत भाजीपाला पिके घेतात असे सांगितले.
५) ग्रामपंचायत यांनी गटाराच्या सांडपाणी नियोजनासाठी शोषखड्डा १०X१० चा बांधकाम करण्यासाठी ठराव क्र. १५ अन्वये ठराव घेतलेला आहे.
 
संत यांनी बनविलेल्या अभिप्रायमध्ये शेतकरी गजानन जयराम जाधव यांची कोणतीही बाजू न मांडता ग्रामपंचायत गुरवलीची पाठराखण करत अभिप्राय बनविला असून ग्रामपंचायतीस कुठलीही नुकसान भरपाई देण्याची तरतूद नसल्याने ग्रामपंचायती मार्फत नुकसान भरपाई देण्याचा प्रश्नच उदभवत नाही. तक्रारदार यांनी सनियंत्रण व मूल्यमापन अधिकारी पंचायत समिती कल्याण यांच्या मार्फत चौकशी करण्यात येऊ नये तसेच जिल्हा स्तरीय अधिकारी मार्फत चौकशी करण्याची विनंती केली असल्याने सदरची चौकशी जिल्हा स्तरीय अधिकारी यांचे मार्फतच करावी असे वाटते.
 
असा अहवाल एस. एस. संत यांनी बनवून गटविकास अधिकारी श्वेता पालवे यांना दिला. पण तक्रारदार याना पंचायत समिती कल्याणचे सनियंत्रण तथा विस्तार अधिकारी एस. एस. संत, विशाखा परटोळे आणि पी. बी. हरड यांच्या सोबत पंचायत समिती कल्याणच्या गटविकास अधिकारी श्वेता पालवे यांनी जाणूनबुजून ग्रामपंचायत गुरवलीची पाठराखण करण्यासाठी बनावट चौकशी केलेल्या आहेत. तक्रारदाराने चौकशी ही जिल्हा परिषद कडून व्हावे असे तक्रार अर्जात नमूद करूनसुद्धा बोगस/बनावट चौकशी चा सिलसिला चालूच ठेवून शेतकऱ्यावर अन्याय केलेला आहे.
 
गुरवली गावातील शेतकरी गजानन जयराम जाधव यांचे मागील १५ वर्ष नुकसान होत आहे हे पंचायत समिती कल्याण यांनी कबूल केलेलं आहे. त्यावर तक्रार निवारण अधिकारी तथा सहा. गट विकास अधिकारी (पंचायत) जिल्हा परिषद ठाणे यांनी १ वर्ष होऊनसुद्धा कोणतीही कारवाई केली नसल्यामुळे तक्रारदार शेतकऱ्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे.
ग्रामपंचायत गुरवली, पंचायत समिती कल्याण आणि जिल्हा परिषद ठाणे यांच्या भोंगळ कारभारामुळे गरीब शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे आणि आता तरी यावर योग्य चौकशी होऊन शेतकऱ्याला न्याय मिळून नुकसान भरपाई मिळेल का अशी चर्चा परिसरात चालू आहे.