भिवंडीत पोलिसावर जीवघेणा हल्ला ; भंडारी कंपाउंड येथील धक्कादायक घटना, आरोपींना आठ तासांमध्ये अटक

नितिन पंडीत    02-Aug-2020
Total Views |
भिवंडी : एकीकडे कोरोना संकट आणि दुसरीकडे राज्यासह देशभरात या महामारीत साजरे होणारे सण यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्यातच शनिवारी देशभरात बकरी ईद सण साजरा होत असतानाच भिवंडीतील भंडारी कंपाउंड चौक येथे तरुणांमध्ये झालेले भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या पोलिसावरच धारदार चाकूने हल्ला झाल्याची घटना शनिवारी रात्री घडली आहे. जखमी पोलिसाला उपचारासाठी शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
 
BHiwandi Police_1 &n
 
या गंभीर घटनेने भिवंडी पोलीस दलात एकच खळबळ उडाली होती. दरम्यान या गंभीर घटनेची दखल घेत भिवंडी पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांनी घटनास्थळी भेट देत आरोपींना तत्काळ अटक करण्याचे निर्देश दिले होते. भोईवाडा पोलिसांनी रात्रभर आरोपींचा शोध घेतला असता अखेर अवघ्या आठ तासांमध्ये पहाटे ठाणे येऊर येथून या दोन्ही हल्लेखोरांना अटक करण्यात आली आहे.
 
भोईवाडा पोलीस स्टेशन नेमणूकीतील पोलीस हवालदार प्रफुल्ल जाऊ दळवी, वय ५२ वर्ष यांना मुस्लिम बांधवांचा बकरी ईद सणानिमित्त भंडारी चौक येथे होमगार्ड सावंत यांच्यासोबत फिक्स पॉईंट ड्युटी नेमलेली असताना रात्री साडेसात ते आठ च्या सुमारास सुमारास येथील नझराणा मेडिकल जवळ असलेल्या किराणा दुकानाच्या बाजूला भंडारी चौक येथे दोन इसम हे एका इसमास मारहाण करीत असले बाबत माहिती मिळाल्याने पोलीस हवालदार दळवी हे सहकारी होमगार्ड सावंत यांच्यासोबत येथे गेले असता तरुणांमध्ये झालेले भांडण सोडवत होते. या दरम्यान मारहाण करणाऱ्या एका अनोळखी इसमांना पोलीस हवालदार दळवी यांना जोराचा धक्का दिला व दुसऱ्या इसमाने कोणत्यातरी शस्त्राने त्यांचे डाव्या हाताचे कोपऱ्यावर, डाव्या बाजूस खांद्यावर तसेच डाव्या कानावर वार करून गंभीर जखमी केले व दोघेही आरोपी तेथून पळून गेले.
येथील नागरिकांनी जखमी पोलीस हवलदार दळवी यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. दरम्यान या घटनेने पोलीस दलात खळबळ उडाली असून ऐन बकरी ईदच्या दिवशी पोलिसांवर झालेल्या हल्ल्यामुळे पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून आरोपींन तत्काळ अटक करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
 
या नंतर भोईवाडा पोलिसांनी घटनास्थळी चौकशी करून आरोपींचा मोबाईल नंबर प्राप्त केला व मोबाईल नंबरच्या आधारे या हल्ल्यातील आरोपी रवींद्र धनाजी भोसले ( वय २० वर्षे ) व लखन अंकुश जाधव (वय २० वर्षे) दोघेही रा. देवजी नगर,नारपोली. या दोघांनाही यांना मोठ्या शिताफीने पोलीस यांनी ८ तासांत आरोपीचा शोध घेऊन त्यांना येऊर ठाणे येथून अटक केली आहे. त्यांच्याकडे चौकशी केलीली असता त्यांनी एका इसमासोबत झालेल्या भांडणा दरम्यान भांडण सोडविण्यासाठी आलेल्या पोलीस हवलदार दळवी यांच्यावर कटर ने वार करून जखमी केले असल्याची कबुली दिली आहे.
 
आरोपींना अटक करण्यासाठी उप आयुक्त राजकुमार शिंदे यांचे सुचनेनुसार गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नरेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जे.पी.जाधव व तपास पथकाचे कर्मचारी पोलीस नाईक अरविंद गोरले, पोलीस काॅन्स्टेबल देवीदास वाघेरे, दिनकर सावंत, मनोज भवर, अतिष शिंगाडी यांनी विशेष परिश्रम घेतले.