तरुणांच्या आत्महत्या चिंताजनक

वैभव पालवे    18-Aug-2020
Total Views |
आसूड: फेसबुक लाईव्ह करत जव्हारमध्ये नवनाथ बोंगे नावाच्या तरुणाने आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने आत्महत्येची पूर्वतयारी फेसबुक लाईव्ह केली. तर काही दिवसांपूर्वी डहाणूतील गंगाराम चौधरी या कला शिक्षकानं स्वतःचं चित्र रेखाटलं. त्यावर मृत्यूची तारीख नोंदवून आत्महत्येपूर्वी ते चित्र समाजमाध्यावार टाकलं. या दोन्ही घटना धक्कादायक आणि चिंताजनक आहेत. या घटनांकडे समाज म्हणून गांभीर्यानं पाहण्याची गरज आहे. नवनाथ बोंगे हा तरुण अवघ्या बावीस वर्षांचा. वाडा तालुक्यातील विऱ्हे या अत्यंत दुर्गम खेड्यातला.
 
Facebook_1  H x
 
हॉटेलमध्ये काम करून उदरनिर्वाह करत होता. असं कोणतं संकट त्याला आयुष्य उध्वस्त करण्यापर्यंत घेऊन गेलं आणि ते फेसबुकवर लाईव्ह करण्याचं धाडस त्याने करावं. हे अधिक चिंताजनक आहे. तर कला शिक्षक असलेल्या गंगाराम चौधरी यांनी आत्महत्येपूर्वी सामाजमाध्यमाचा आधार घ्यावा. या दोन्ही घटना समाजमाध्यमाशी जोडल्या गेल्याने समाज माध्यमावर बनलेल्या आपल्या अभासी प्रतिमेतून व्यक्त होणं हे संवाद हरवल्याचंच लक्षण मानायला हवं. तंत्रज्ञानाने जग माणसाच्या जवळ आलंय मात्र त्याचवेळी भवतालापासून दुरावलंय. माणसं समाजमाध्यामांवर इतकी व्यस्त झालीत की घरातील माणसांशी बोलणंच थांबलंय. नात्यातला संवाद हरवलाय. आपल्या भावभावना व्यक्त करायला सातत्यानं समाजमाध्यमांचा आधार घ्यावा लागणं हे नात्याची वीण उसवू लागल्याचंच लक्षण आहे. याचा तरुणाईवर अधिक परिणाम झाल्याचं चित्र सध्या पहायला मिळत आहे. तरुणाई व्यक्तच होत नाही.
 
त्यामुळे समाजमाध्यमावरील आभासी प्रतिमेमुळे खऱ्या आयुष्यातील प्रश्नांना सामोरे जाताना आलेलं अपयश त्यांना आत्महत्येपर्यंत घेऊन जात आहे. आपल्या यश - अपयशाच्या कल्पना पुरेशा स्पष्ट नसल्याने परिक्षेच्या मार्कांतील स्पर्धेपासून सुरु होणारी स्पर्धा जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावरच्या स्पर्धेत यश मिळायलाच हवं अशी मानसिकता बनल्यानं आत्महत्येला कवटाळलं जात आहे. केवळ मनात विचार आला म्हणून कोणी आत्महत्या करत नाही. आत्महत्येला अनेक कारणं आहेत. मग ती जैविक, मानसिक आणि सामाजिक पातळीवरील असंख्य कारणं असू शकतात. आत्महत्येपर्यंत एखादा माणूस प्रवृत्त होणं हे नैराश्यापासून व्यसनाधिनतेपर्यंत अनेक कारणांचा परिणाम आहे. खरं तर हा मानसिक आजारच असल्याचं अनेक अभ्यासाअंती पुढे आलं आहे. त्यावर सामुपदेशन होण्यासाठी आपल्याकडे ग्रामीण भागात कोणतीही यंत्रणा नाही.
 
शहरांमध्ये मानोसोपचारतज्ज्ञ अथवा अन्य संस्था आहेत. ज्या मोफत सामुपदेशन करतात. मात्र पालघरसारख्या आदिवासी जिल्ह्यात अशी कोणती सोय नाही की जिथे अशा अवस्थेत मार्गदर्शन मिळेल. देशातील आत्महत्या संदर्भात ' रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडियाने' २०१२ साली केलेल्या अभ्यासात दरवर्षी सुमारे दोन लाख आत्महत्या होतात. त्यातील ४० टक्के पुरुष आणि ५९ टक्के महिला ह्या १५ ते २९ वयोगटातील असल्याचं आत्महत्यांबाबतीतलं धक्कादायक चित्र पुढे आलं आहे. म्हणजे धड आयुष्य जगलंही नसलेली तरुणाई आपलं जीवन संपवत आहे. एवढ्या मोठ्याप्रमाणावर तरुणांनी जीवन संपवणं हे समाज म्हणून अत्यंत धोकादायक आहे. याकडे समाजातील धुरीणांनी लक्ष द्यायला हवं.
 
आत्महत्यांचं लोण पालघरसारख्या आदिवासी जिल्ह्यात वाढणं अधिक चिंता वाढवणारं आहे. इथला आदिवासी, शेतकरी वर्ग कायम दारिद्र्यात आणि उभं आयुष्य कष्टात घालवणारा. जगण्याशी असणारा संघर्ष करताना निसर्गाशी असलेलं नातं त्याला संकटातही जगण्याची उमेद देणारं होतं. मात्र आता शहरीकरणाच्या, नागर संस्कृतीच्या बाजारु कल्पना विविध माध्यमांच्या सहाय्याने या समाजातही भिनू लागल्याने मुक्त आणि स्वच्छंदी जीवन जगणारा समाज आता त्याला बळी पडू लागलाय. त्याचा सर्वाधिक परिणाम नव्या पिढीवर होताना दिसतोय. आणि त्यातूनच आत्महत्यांचं सत्र या भागात वाढू लागलंय. आत्महत्या ही समस्या या भागात अधिक गंभीर बनलीय. दोन महिन्यांपूर्वी एका महिलेने आपल्या तीन वर्षाच्या चिमुकलीसह झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची विदारक घटना जव्हारमध्ये घडली. त्यामुळे या प्रश्नाकडे इथल्या लोकप्रतिनिधींनी जरा डोळसपणे पहायला हवं. आत्महत्येचे अंतिम टोक गाठण्यापूर्वी अशा विचारापर्यंत आलेल्या व्यक्तींना त्या विचारापासून परावृत्त होण्यासाठी मदत करणारी यंत्रणा उभी करता येईल का? याचाही विचार व्हायला हवा.
 
शाळा, महाविद्यालयांसह प्राथमिक आरोग्य केंद्राच्या स्तरावर सामुपदेशनाची सोय उपलब्ध होणं आवश्यक आहे. त्यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेत शासनाला यासंदर्भात निर्णय घ्यायला भाग पाडलं तर काही अंशी तरी या भागातील होणाऱ्या आत्महत्या रोखण्यात यश येईल. खरंच आत्महत्येपासून तरुणांचे जीव वाचवायचे असतील तर व्यापक प्रमाणात समाजात प्रबोधनाबरोबरच सामुपदेशन होणं गरजेचं आहे. त्यासाठी इथल्या लोकप्रतिनिधींनीच आता पुढाकार घ्यायला हवा. वैभव पालवे, संपादक, प्रजासंवाद