ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांचं कोरोनामुळे निधन

जनदूत टिम    18-Aug-2020
Total Views |
पंढरपूर : पुण्यातील सह्याद्री रुग्णालयात सोलापूर जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांचं कोरोनामुळे निधन झालं. सोमवारी (17 ऑगस्ट) रात्री 11 वाजून 35 मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 85 वर्षांचे होते. पुण्यातील वैकुंठभूमीत आज (18 ऑगस्ट) सकाळी त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. सुधाकरपंत परिचारक यांच्या निधनाने राज्याच्या राजकारणातील निस्पृह राजकारणी निर्वतला आहे.
 
Sudhakar Paricharak_1&nbs
 
कोरोनाचा फैलाव पंढरपूर परिसरात वाढल्यावर 5 ऑगस्ट रोजी त्यांना उपचारासाठी पुणे येथे हलवण्यात आलं होतं. मधुमेह आणि रक्तदाबाच्या त्रासामुळे उपचारादरम्यान त्यांची तब्येत खालावल्याने त्यांना कृत्रिम श्वसनावर ठेवण्यात आलं होतं. अखेर काल रात्री साडेअकराच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. सुधाकरपंत परिचारक अखेरपर्यंत जनतेच्या कार्यात मग्न होते. पंतांच्या जाण्याने पंढरपूर तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.
 
सुधाकरपंत परिचारक हे पाच वेळा पंढरपूरचे आमदार होते. एसटी महामंडळाचे ते माजी अध्यक्ष होते. शरद पवार यांचे निकटवर्तीय असलेल्या परिचारक यांची 'सहकाराचे डॉक्टर' म्हणून ओळख होती. अडचणीत असलेल्या अनेक सहकारी संस्थांना त्यांनी आपल्या मार्गदर्शनाने बाहेर काढलं. श्रीपूर इथल्या पांडुरंग सहकारी साखर कारखाना तसंच मोहोळ तालुक्याती भीमा सहकारी साखर कारखान्याचं अनेक वर्ष नेतृत्त्व केलं होतं.
 
सुधाकरपंत परिचारक गेले दोन दिवस व्हेंटिलेटरवर होते. काल रात्री साडेअकराच्या सुमारास त्यांचं कोरोनामुळे निधन झालं. कोरोनाच्या नियमावलीत पुण्यात सर्व अंत्यविधी पार पडतील, अशी माहिती नातू प्रितीश परिचारक यांनी फेसबुकवरुन दिली.
 
.