आश्रमशाळेची कोसळलेली संरक्षक भिंत दुरुस्तीच्या प्रतिक्षेत

जनदूत टिम    17-Aug-2020
Total Views |
पालघर : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय जव्हार अंतर्गत येत असलेल्या आश्रम शाळांच्या इमरतींवर विविध माध्यमातून दरवर्षी लाखो रुपये खर्च केला जातो, मात्र केलेल्या कामांचा दर्जा तपासणे तसेच त्याची देखभाल करणे अशी कामे वेळच्या वेळी होत नसल्याने या कामांवर खर्च केलेला आदिवासी विभागाचा लाखो रुपयांचा निधी पाण्यात जात आहे.
 
Ashramshala_1  
 
वाडा तालुक्यातील पाली येथे शासकीय आश्रम शाळेची संरक्षक भिंत वर्षभरातच कोसळल्याने या भिंतीसाठी केलेला लाखो रुपयांचा निधी पाण्यात गेला आहे. वर्षभरापासून ही भिंत त्याच अवस्थेत आहे. विशेष म्हणजे हे काम अधिका-यांची टक्केवारी व ठेकेदाराची मलई याचसाठी असल्याने कामाचा दर्जाही निकृष्ट ठेवल्या मुळेच ही भिंत पहिल्याच नदीच्या पुर पाण्यात कोसळली असल्याचे बोलले जात आहे.
 
पाली येथे पिंजाळी नदीच्या किनारी आदिवासी विद्यार्थ्यांसाठी शासकीय आश्रम शाळा आहे. या शाळेसाठी असलेल्या इमारतींचे नदीच्या पुर पाण्यापासुन संरक्षण करण्यासाठी नदी किनारी ४०० फुट लांबीची गतवर्षी संरक्षक भिंत बांधण्यात आली होती. ही भिंत पहिल्याच पावसाळ्यात (दि. ४ ऑगस्ट २०१९ रोजी) नदीला आलेल्या महापुरात कोसळुन पडली. भिंत कोसळून एक वर्ष झाले तरी संबंधित विभागाने या कोसळलेल्या भिंतीकडे ढुंकूनही बघितलेले नाही.
 
विशेष म्हणजे येथील आश्रम शाळेची ही इमारत नदीच्या पुर पाण्याच्या रेषेत येत असल्याने या इमारतीचा वास्तव्यासाठी उपयोग करु नये असे निर्देश दोन वर्षांपूर्वीच आदिवासी विकास विभागाने दिलेले आहेत. असे असतानाही ही भिंत फक्त ठेकेदार व अधिकारी यांच्या भल्यासाठीच बांधली गेल्याचे बोलले जात आहे.
 
नदीच्या पुर रेषेत येत असलेल्या पाली येथील आश्रम शाळेतील निवासी विद्यार्थींनी व विद्यार्थी असे एकुण ४५० विद्यार्थ्यांच्या निवासासाठी व शालेय वर्ग भरण्यासाठी दोन कोटी रुपये खर्च करून नदीच्या पुर रेषे बाहेर नवीन दोन भव्य इमारती बांधण्यात आलेल्या आहेत. या इमारतींमध्ये विद्यार्थ्यांचे वास्तव्य पण हालविण्यात आले आहे. (सद्या करोनामुळे शाळा बंद आहेत) असे असतानाही पुर रेषेत असलेल्या जुन्या इमारतीच्या संरक्षक भिंतीसाठी आदिवासी विकास विभागाने २५ लाख रुपये खर्च का केला, तसेच या कोसळलेल्या भिंतीकडे अजुनपर्यंत लक्ष का दिले गेले नाही, असा प्रश्न येथील नागरिक विचारत आहेत.
 
नदीच्या पुर पाण्याचा वेग पहाता या ठिकाणी भिंतीला आधार देण्यासाठी दहा फुटांच्या अंतरावर आर.सी.सी. खांब उभे करणे आवश्यक असताना एकही आरसीसी खाब बांधण्यात न आल्यानेच ही भिंत कोसळली असल्याचे बोलले जात आहे.