जिजाऊ संस्थेचा विस्तार : वाड्यातील शिवसेना हवालदिल

वैभव पालवे    29-Jul-2020
Total Views |
आसूड : सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या जिजाऊ सामाजिक व शैक्षणिक संस्थेने आपला पाया विस्तारायला लावल्यावर वाडा तालुक्यातील सर्वच पक्षांच्या पायाखालची वाळू सरकलीय. सगळ्याच प्रस्थापित राजकीय पक्षांशी जिजाऊ संस्थेने आजवर सोयीप्रमाणे घरोबा केल्याने आता ही संस्था अवघड जागेचे दुखणे बनल्याची स्थिती अनेक कार्यकर्त्यांची झालीय. जिजाऊ संस्थेचे सर्वेसर्वा नीलेश सांबरे यांचे सर्वपक्षीय असलेले संबंध आता येथील राजकीय पदाधिकाऱ्यांच्या 'गले की हड्डी' बनल्याने त्यांचा पोटशूळ उठला आहे.
 
Jijau Sanghatna_1 &n
 
जिजाऊ सामाजिक व शैक्षणिक संस्थेच्या शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रातील कामाने सर्वसामान्य जनता प्रभावित आहे. संस्थेच्या माध्यमातून गेल्या काही वर्षात सर्वसामान्य जनतेला सढळ हस्ते होणारी मदत सर्वश्रुत आहे. अभावग्रस्त समाजातील शेवटच्या माणसाला संकटात होणारी मदत त्यांचं जीवन- कुटुंब उभं राहायला सहाय्यभूत ठरतेय. त्यामुळे जिजाऊ संस्थेकडे तालुक्यातील तरुणाई आणि महिलावर्गाचा ओढा वाढू लागलाय. लोक मोठ्या संख्येने संस्थेशी जोडले जाताहेत. त्याचा परिणाम म्हणून वाडा तालुक्यातील चिंचघर, मेट, गुंज,घोणसई, बुधावली, मेनेपडा, विजयगड, मुसारणे, उसर, सापरोंडे, वडवली आणि कॅंप आदी १३ गावांमध्ये मागच्या आठवड्यात शाखा उघडण्यात आल्या. जिजाऊ संस्थेचे संस्थापक आणि पालघर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष नीलेश सांबरे यांच्या प्रमुख उपस्थितीत फलकांचे अनावरण करण्यात आले. या कार्यक्रमांमध्ये अनेक प्रमुख राजकीय पक्षांमध्ये सक्रीय असणाऱ्या तरुणाईचा पुढाकार हा राजकीय पक्षांची चिंता वाढविणारा ठरल्याने शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख सुनील पाटील आणि तालुकाप्रमुख उमेश पटारे यांनी तातडीने दुसऱ्याच दिवशी पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली. या बैठकीत जिजाऊ संस्थेने ज्या शाखा उघडण्याचा झपाटा लावलाय त्यावर चर्चा करण्यात आली. खरं तर हे शिवसेना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचंच अपयश मानायला हवंय. एका सामाजिक संघटनेच्या शाखांनी एवढं बिथरायला या पदाधिकाऱ्यांचीच कार्यशैली कारणीभूत ठरलीय. त्यामुळे आपलं अपयश झाकण्यासाठीच बैठकीचे सोपस्कार उपजिल्हाप्रमुख सुनील पाटील आणि तालुकाप्रमुख उमेश पटारेंनी उरकलेत. त्यापलीकडे अधिक काही नसल्याचे या बैठकीनंतर आता अनेक कार्यकर्ते उघडपणे बोलू लागलेत.
 
पालघर जिल्हा परिषदेच्या गेल्या जानेवारी महिन्यात झालेल्या निवडणुकीत जिजाऊ संस्था प्रत्यक्ष राजकारणात उतरली. राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत आघाडी करून जिजाऊ संस्थेचे अनेक उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढून विजयी झाले. त्यामुळे जिजाऊ संस्थेचे संस्थापक नीलेश सांबरे हे विक्रमगड तालुक्यातून अपक्ष म्हणून निवडून आले असले तरी राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत असल्याने थेट उपाध्यक्षपदाची माळ त्यांच्या गळ्यात पडली. राजकारणात त्यांचा वाढलेला प्रभाव हे प्रस्थापित राजकीय पक्षांसाठी आव्हान निर्माण झालेय. सध्याच्या राजकीय परिस्थितीत जिजाऊ संस्था राष्ट्रवादी कॉंग्रेस सोबत असल्याने जिजाऊ संस्थेची होणारी वाढ ही राष्ट्रवादीसाठी फायद्याची आहे. मात्र ज्या भागात जिजाऊ संस्थेने शाखा उघडल्या त्या भागावर शिवसेना आणि भाजप या पक्षांचा प्रभाव आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षांना आपला जनाधार गमावण्याची अधिक भीती आहे. या भीतीतूनच शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची तातडीने बैठक झाल्याची सूत्रांची माहिती आहे.
 
दरम्यान जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस सत्तेत एकत्र आहेत. असे असताना या सत्तेचा उपयोग पक्षासाठी होत नाही असा आरोप शिवसेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी या बैठकीत उघडपणे केला असल्याचे बोलले जात आहे. मात्र त्याचवेळी उपाध्यक्ष नीलेश सांबरे हे जिजाऊ संस्थेचा विस्तार करून शिवसेनेलाच खिंडार पाडत असल्याचे दिसत आहे.
 
शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचे विशेषत: उपजिल्हाप्रमुख सुनील पाटील आणि तालुकाप्रमुख उमेश पटारे यांचा सामान्य शिवसैनिकांशी संपर्कच नसल्याने आणि कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभे राहत नसल्याने अगोदरच शिवसैनिकांत नाराजी आहे. त्यातच आपापले गट सांभाळत एकमेकावर कुरघोडी करण्याचे या पदाधिकाऱ्यांचे राजकारण सुरु असल्याने या परिसरात प्रभावी असलेली शिवसेना आता मागे पडू लागली आहे. जिल्हाप्रमुख अथवा आमदार वाडा तालुक्यात येणार असतील तर ते कार्यकर्त्यांना साधं कळविण्याचं सौजन्यही दोन्ही पदाधिकारी दाखवित नाहीत. आणि मग स्वतःचा कंपू या नेत्यांसोबत ठेवून आपणच कसे पक्षात सक्रिय आहोत हे दाखवायचं. सुनील पाटील आणि उमेश पटारेंच्या या कार्यशैलीने तालुक्यातील असंख्य कार्यकर्ते दुखावलेत. त्याचा परिणाम पक्षसंघटनेवर झाल्याचं दिसत आहे.
 
जिजाऊ संस्थेचे सर्वेसर्वा नीलेश सांबरेंची सर्वच राजकीय पक्षातील नेत्यांशी जवळीक आहे. गेली अनेक वर्ष विविध नेत्यांसोबत असलेली त्यांची उठबस सर्वश्रुत आहे. सोयीप्रमाणे त्यांच्या ताकदीचा सर्वच पक्षांनी लाभ उठवलाय. त्यामुळे नीलेश सांबरे सत्तेच्या शिड्याही झपाट्याने चढू लागलेत. सांबरेंच्या राजकीय उत्कर्षात सर्वपक्षीय नेत्यांचा हातभार आहे हे राजकीय वास्तव आहे आणि ही खरी येथील पदाधिकाऱ्यांची पोटदुखी आहे. या बैठकीत शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी तर शिवसेनेचे नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे, जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, आमदार शांताराम मोरे यांच्याशी नीलेश सांबरेंच्या असलेल्या संबंधांवर आक्षेप घेतल्याचे बोलले जातेय. उपजिल्हाप्रमुख सुनील पाटील आणि तालुकाप्रमुख उमेश पटारे यांच्या उपस्थितीत पक्षाच्या नेत्यांवर कोणताही पदाधिकारी आक्षेप घेत असेल तर त्या पदाधिकाऱ्यांना रोखण्याची अथवा त्याला जाब विचारण्याची जबाबदारी या उपजिल्हाप्रमुख म्हणून सुनील पाटील आणि तालुकाप्रमुख म्हणून उमेश पटारेंची होती.
 
मात्र हे दोन्ही पदाधिकारी त्यावेळी मूग गिळून बसले. ज्या प्रकाश पाटलांच्या पुण्याईने सुनील पाटील आज उपजिल्हाप्रमुखपदी आहेत, त्यांची पाठराखण करण्याचं सौजन्य देखील ते दाखवू शकले नाहीत. अन्यथा सुनील पाटलांचं शिवसेनेत कोणतं असं कर्तृत्व होतं की त्यांची थेट उपजिल्हाप्रमुखपदी वर्णी लागावी? तसंच तालुकाप्रमुख उमेश पटारेंचंही. मोज सारख्या एका ग्रामपंचायतीच्या राजकारणापलिकडे फारसं कर्तृत्व नसलेल्या पटारेंच्यात सेनेच्या नेतृत्वाला असे कोणते राजकिय गुण दिसले? की त्यांची थेट तालुकाप्रमुखपदी नियुक्ती व्हावी हे शिवसेनेतल्या अनेक ज्येष्ठ कार्यकर्त्यांना अजूनही उमगलेलं नाही.
 
मुळात वाडा तालुक्यात शिवसेना मागे पडायला शिवसेनेचे नेते जबाबदार आहेत असं आता कार्यकर्तेच म्हणू लागलेत. ज्यांनी निष्ठापूर्वक शिवसेनेचं काम केलं - पक्ष संघटना बांधली अशांना पदं नाहीत. सुनील पाटील हे कुणबी सेनेतून आलेले तर उमेश पटारेंना आवाकाच नाही, मनसेतून आलेल्या गोविंद पाटलांना पक्षप्रवेशानंतर लागलीच पद दिलं गेलं, मात्र वर्षानुवर्षे पक्षासाठी झटलेल्यांची कायम उपेक्षा होत राहिल्याने शिवसेना संघटनात्मकदृष्ट्या कमकुवत बनलीय. ज्यांना संघटनेची माहितीच नाही त्यांच्यावर पक्षनेतृत्वाने जबाबदारी सोपविल्याने पक्षाचं नुकसान होणार नाही तर काय होणार? उगाच जिजाऊ संस्था अथवा नीलेश सांबरेंच्या नावानं शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी भूई धोपटण्यात अर्थ नाही!