धरणक्षेत्राकडे पावसाची पाठ

जनदूत टिम    23-Jul-2020
Total Views |
ठाणे : मान्सून दाखल होऊन महिना उलटला तरी ठाणे जिल्ह्यातील धरणक्षेत्रामध्ये पावसाची प्रतीक्षा कायम आहे. सर्वच धरणांमधील पाणीसाठा अद्याप निम्म्यापेक्षाही कमी आहे. बारवी धरणामध्ये ४६ टक्के, भातसा धरणात ४८ टक्के, मोडकसागर ३७ टक्के, तानसा २३ टक्के तर ठाण्यास पाणी सोडणाऱ्या आंध्रा धरणात जेमतेम ३३.१९ टक्के पाणीसाठा असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, गतवर्षी २१ जुलैरोजी हा पाणीसाठा यंदाच्या तुलनेत दुप्पट अधिक होता. पावसाची स्थिती अशीच कायम राहिल्यास जिल्ह्यात पाणीटंचाईचे संकट उद्भवण्याचा धोका आहे.
 
Dharan_1  H x W
 
'निसर्ग'वादळासोबत मान्सूनपूर्व पावसाने चांगली हजेरी लावल्यामुळे यंदा सरासरी पावसाची अपेक्षा केली जात होती. परंतु मान्सून दाखल झाल्याचे घोषित झाल्यापासून धरणक्षेत्रामध्ये पावसाने पाठ फिरवली आहे. जून महिन्याचा बराच काळ पावसाविना गेला. तर जुलैच्या सुरुवातीला काहीशी दमदार हजेरी लावल्यानंतर ठाणे जिल्ह्यात पावसाने दडी मारली आहे. मुंबई महानगर क्षेत्राला पाणीपुरवठा करणारी मोठी धरणे ठाणे जिल्ह्यात आहे. परंतु याच भागात पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा खूपच कमी असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पाणलोट क्षेत्रातील झरे आणि नद्यांचे पाणीही मर्यादित स्वरूपातच धरणांमध्ये दाखल झाले. गेल्या आठवडाभरापासून पाऊस थांबल्याने आता हे झरे, धबधबेही आटण्याची भीती व्यक्त होऊ लागली आहे. त्यामुळे जुलैमध्ये भरणारी धरणे भरण्यासाठी आता ऑगस्ट उजाडण्याची शक्यता आहे.
 
२१ जुलै रोजी जिल्ह्यातील मोठ्या प्रकल्पातील पाण्याची स्थिती निम्म्याहून कमी असल्याचे समोर आले आहे. भातसा धरणाची एकूण क्षमता ९४२ दलघमी इतकी असून आज त्यातील पाणीसाठा ४५५ दलघमी (४८.३८ टक्के) इतका आहे. तर बारवी धरणाची क्षमता ३३८ दलघमी असून मंगळवारी हा साठा १५५ दलघमी (४६ टक्के) आहे. मोडकसागरची क्षमता १२८ दलघमी असून त्यामध्ये अवघा ४७ दलघमी पाणीसाठा आहे. तर तानसा धरणाची क्षमता १४५ दलघमी असून त्यामध्ये मंगळवारी ३३ दलघमी पाणी असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
 
लॉकडाउनमुळे दिलासा
औद्योगिक क्षेत्रामध्ये पाण्याचा सर्वाधिक वापर केला जातो. त्यामुळे दरवर्षी एप्रिल, मे महिन्यात पाणी टंचाईचे सावट निर्माण होत असते. परंतु यंदा करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी घोषित करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे औद्योगिक क्षेत्रातील पाणीवापर घटला होता. त्यामुळे जिल्ह्यांतील अनेक धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा उपलब्ध होता. आता तुरळक पाऊस पडूनही पाणीसाठा चांगला आहे. परंतु, जुलै आणि ऑगस्ट महिन्यांत ही स्थिती सुधारण्याइतका पाऊस पडणे गरजेचे असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
 
शहापूर घाट परिसरात पडणारे पावसाच्या पाणी भातसाच्या पाणलोट क्षेत्रात येते. मान्सून सक्रिय झाल्यानंतर नाशिकमध्ये सुरू झालेल्या पावसामुळे भातसाच्या पाणलोट क्षेत्रात पाणी जमायला सुरुवात झाली. परंतु त्यानंतर पावसाने दडी मारली. अतिवृष्टीच्या इशाऱ्यादरम्यान मुंबई, ठाण्यात पाऊस सुरू असताना शहापूरमध्ये मात्र पाऊस पोहोचलाच नाही. त्यामुळे पावसाची प्रतीक्षाधरणक्षेत्रामध्ये कायम आहे. मुंबई महापालिकेस ५०टक्के पाणीपुरवठा तर ठाण्यात २०० एमएलडी पाणीपुरवठा भातसा धरणातून होतो.
- योगेश पाटील, कार्यकारी अभियंता, भातसा