जिगरबाज शिवसैनिक दीपक सोनाळकर यांची एकवीस दिवसांची झुंज संपली

जनदूत टिम    22-Jul-2020
Total Views |
शिवसेनेचे कल्याण विधानसभा संघटक आणि एक जिगरबाज शिवसैनिक दीपक दत्रात्रय सोनाळकर यांची गेले एकवीस दिवस मृत्यूशी सुरु असलेली झुंज अखेर संपली.डाॅक्टरांच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतरही एक दिलखुलास मित्र/जिगरबाज शिवसैनिक काळाच्या पडद्याआड झाला आहे.मृत्युसमयी त्यांचे वय ७२ वर्षे होते.
 
Deepak Sonalkar_1 &n
 
गेले एकवीस दिवस मिरा इस्पितळात दाखल असलेल्या दीपक सोनाळकर यांची तब्येत प्रारंभी गंभीर होती. नंतर तब्येतीत सुधारणा होत होती व लवकरच घरी येणार अशी बातमी असताना परवा शनिवारी रात्री अचानक माजी महापौर राजेंद्र देवळेकर व महापालिका क्षेत्र संघटक विजय साळवी यांच्याकडून सोनाळकर सिरीयस आहेत व त्यांना अतिदक्षता विभागात हलविल्याचे कळले. त्याच रात्री पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्होकार्टचे तज्ञ डाॅक्टर्स व मिरा इस्पितळातळाचे डाॅक्टर्समध्ये बोलणे घडवून पुढील ट्रीटमेंटची दिशा ठरविली. सकाळी थोडा पल्स रेट वाढलाही होता. रविवारी सायंकाळी रुग्णालयात आलेल्या नातवाला त्यांनी डोळे उघडून बघीतले होते.
 
अशीच सुधारणा होत गेली तर चांगला रिझल्ट मिळेल असे मिरा हाॅस्पिटलचे डाॅ. गौतम गणवीर सायंकाळी म्हणाले आणि रात्री साडेदहा पावणे अकरा वाजता सर्व काही संपल्याचा फोन आला. दीपक सोनाळकर यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली होती तरीही त्यांच्यात कोरानाची लक्षणे असल्याचे निदान डाॅक्टरांनी केले. कोरोना तपासणीसाठी लाळेची चाचणी घेतली जाते. प्राथमिक अवस्थेत असताना जंतू लाळेव्दारे सापडतात.पण एकदा फुफुस्सात शिरले की ते लाखो जंतू पैदा करतात मग उपचार कठीण होऊन बसतात.तसाच काहीसा प्रकार असल्याचे डाॅक्टरांनी सांगितले. आयटीआयमध्ये जाणारा ते सरवली एमआयडीसीतील केमो फार्मामध्ये काम करणारा दीपक आजही आठवतो.
 
बोलायला एकदम स्पष्ट, एक घाव दोन तुकडे, तेवढाच हवाहवासा वाटणारा. एखादी गोष्ट पटली नाही की तोंडावर सुनावणारा मग कोणीही असो.कार्यकर्ता वा नेता कोणीही असो. कोणालाही केव्हाही कोणत्याही मदतीसाठी कधीही धावणारा. विशेषतः पोलीस ठाण्यातील कामासाठी हक्काचा माणूस म्हणून दीपक सोनाळकर यांच्याकडे हक्काने अनेक मंडळी येत असत.पोलीस ठाण्यात दरारा असलेला एकमेव नेता.आज जे आहेत ते कालपर्यंत सोनाळकरांबरोबरच पोलीस ठाण्यात जात असत. अगदी साध्यातल्या साधी समस्या असो वा कितीही मोठी असो दीपक सोनाळकर हा मोठा आधार असे. कल्याण शहरातील शिवजयंती/दुर्गाडी नवरात्रोत्सव , मलंगगड आंदोलनासह शिवसेनेचे कोणतेही मोठे आंदोलन दीपक सोनाळकर यांच्याशिवाय अपुरे
आहे.
 
एकदा एखाद्याला शब्द दिला की त्यासाठी प्रसंगी आकाश पाताळ एक करणारा दीपक परिवहन समितीचा माजी सदस्य होता.शिवसेनेत विविध पदांवर काम करताना तालुका संघटक या पदावर काम करीत होता. शहराबरोबर ग्रामीण भागातील असंख्य कार्यकर्त्यांचा आधार होता. कल्याणात शिवाजी चौकात शिवसेनेचे मध्यवर्ती कार्यालय आहे ते दीपक सोनाळकर यांच्याच परिश्रमातून उभे राहीले आहे. माजी मंत्री साबीर शेख यांचा जवळचा सहकारी तसेच आनंद दिघेसह सर्वच नेत्यांचाही सहकारी म्हणून चांगले काम केले.कोणतीही अपेक्षा न ठेवता झोकून देऊन काम कसे करायचे याचे उदाहरण म्हणजे दीपक सोनाळकर. कल्याणच्या श्री संत राममारुती मंदिरासमोरच राहणा-या दीपक सोनाळकर यांची एक वेगळीच छाप होती.शिवसेनेचे दीपक सोनाळकर हीच त्यांची ओळख होती.
 
कल्याणच्या श्री संत राममारुती महाराज शताब्दी पुण्यतिथी महोत्सव समितीचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले.शिवाय शहरातील विविध संस्था संघटनांचे आधारस्तंभ म्हणून ओळख होती.जातपात न मानणारा दीपक सीकेपी संस्थेच्या कार्यक्रमासाठी मात्र आवर्जुन उपस्थित असायचा.कोणतीही मदत लागली तर हक्काने सांग अस सांगणारा दीपकचा फोन हमखास असे. लाॅकडाऊनमुळे दैनिक जनमतची पीडीएफ आवृत्ती अनेकांना पाठवली जाते.एखाद दिवशी पाठवायला उशीर झाला की, दीपकचा फोन ठरलेलाच असे. दीपकच्या जाण्याने कल्याण शिवसेनेचा एक मोठा बुरुजच ढासळला आहे.शहराच्या विविध भागातील शिवसैनिकांनी हक्काचा, आपला माणूस गेल्याची प्रतिक्रीया उस्फूर्तपणे व्यक्त केली आहे. त्यांच्या परिवारावर तर आभाळच कोसळले आहे.विशेष म्हणजे २४ जुलै हा दीपकचा वाढदिवस होता.
 
दीपक सोनाळकर यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा, विवाहित मुलगी, जावई, नातू असा परिवार आहे. कोरोनाचे संकट शिवसैनिकांवर कोरोना महामारीचे संकट शिवसैनिकांवर सर्वाधिक येऊ लागले आहे. अनेक चांगले कार्यकर्ते जात आहेत. जनतेसाठी स्वतःच्या जिवाची पर्वा न करता धावून जाणा-या या मंडळींना सावध रहायला हवे आहे.दीपक सोनाळकर यांची ओपन हार्ट सर्जरी झाली असतानाही शिंदे साहेबांकडून धान्य मागवून ते वाटण्यासाठी १५ एप्रिलपर्यंत जंग जंग पछाडणारे सोनाळकर १जूनपर्यत कर्णिक रोडला मुलीकडेच होते.लाॅकडाऊन उठल्यावर घरी आले होते.जून अखेरीस बरे वाटत नसल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले तब्येतीत चढउतार होत असतानाच अचानक या बहाद्दर शिवसैनिकाला मात्र आपली इहलोकीची यात्रा संपवावी लागली आहे.
 
कठोर असलेल्या नियतीने याची दखल घेतली पाहिजे.आजही माजी महापौर राजेंद्र देवळेकर व अनेक अनेक शिवसैनिक मदतीला तप्तर असतात.अशा सर्व मंडळींनी काळजी घेणे आवश्यक आहे.दीपक सोनाळकर हे मोठे उदाहरण आहे.या जिगरबाज शिवसैनिकाच्या स्मृत्यर्थ त्यांच्या स्मृतींना उजाळा देणारा व नव्या कार्यकर्त्याना प्रेरणा देणा-या स्मृती जतन करण्याची सर्वांची जबाबदारी आहे.दीपक सोनाळकर यांच्या आत्म्यास शांती लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना.-तुषार राजे