शहापुर-सापगाव रस्त्यावरील खड्डेमय प्रवास पावसाळ्यातही कायम

जनदूत टिम    02-Jul-2020
Total Views |
शेणवे : नेमेची येतो पावसाळा ही पंक्ती सर्वांनाच परिचीत आहे.परंतु जगाच्या पाठीवर 10 महिने पावसाळा ऋतू आजपर्यंत तरी पहावयास मिळालेला नाहीय.असे असले तरी बहुचर्चित शहापुर मुरबाड कर्जत महामार्गातील शहापुर-सापगाव रस्त्याने प्रवास करून गेले दोन वर्षे शहापुरकर जनतेचे कंबरडे मोडले असून ठेकेदाराने चक्क दहा महिने पावसाळा असल्याचे कारण बांधकाम विभागाला पत्राद्वारे कळवून काम रखडवल्याचा बुद्धीची कीव येणारा प्रकार बांधकाम विभागाने दिलेल्या माहितीतुन समोर आलाय. 
 
Shahapur Road_1 &nbs
 
समाजसेवेचे व्रत घेतलेले निलेश सांबरे यांनी या वर्षी शहापुर तालुक्यातील रुग्ण वैद्यकीय सुविधांअभावी दगावू नये म्हणून मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल च्या भूमीपूजनाचा नारळ शरद पवारांच्या उपस्थितीत फोडला.शहापुर- सापगाव रस्त्यावर रोजचा प्रवास करून लोकांना मणके,श्वसन,पाठदुखी सारखे आजार जडले असून शहापुर-सापगाव रस्त्यावर रोजच एक पेशंट तयार होतोय.ह्या पेशंटनेच जिजाऊ संस्थेचे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल भरणार असेल तर त्याचा शहापुरकरांना उपयोग तो काय.?आता पावसाळा तोंडावर येऊन ठेपल्याने हे काम आता पुढल्या वर्षीच होणार हे नक्की.मात्र पावसाळ्यात शहापुर-मुरबाड रस्त्यावरील काळू नदीवरील पूल,तसेच जिथेतीथे रस्त्यावर केलेले खोदकाम,नवीन मोऱ्यांचे बांधकाम यामुळे या रस्त्यावरील सर्व गावांचा शहापुर व मुरबाड शहराशी संपर्क तुटणार आहे,ही बाब अतिशय गंभीर आहे.तालुक्यातील लोकप्रतिनिधीना जनतेला होणाऱ्या या त्रासाशी काहीएक पडलेले नसून एकही चकार शब्द या प्रकरणी त्यांच्या मुखातून निघत नसल्याने त्यांच्या निष्क्रियतेचा गावबाजार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय.
 
पावसाळा सुरू झाला तरी COVID 19 मुले बिळात दडी मारून बसलेले सर्वपक्षीय पुढारी,लोकप्रतिनिधी जनतेच्या प्रश्नांसाठी पुढे येत नसल्याने आता जनतेलाच जिजाऊ कन्ट्रक्शन विरोधी आक्रमक व्हावे लागते आहे. या महामार्गाला 18 महिन्यांचा कालावधी ठेकेदारास दिला होता. परंतु हे काम मुदतीच्या बाहेर जाऊनही जैसे थे आहे.शहापुर-मुरबाड-कर्जत महामार्गातील शहापुर ते सापगाव रस्त्याची गेले दोन वर्ष अक्षरशः चाळण झाली असून दुचाकी असो की चारचाकी जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागतो आहे.मागील वर्षी साठगाव येथील विशाल भरत विशे या इंजिनिअर तरुणाचा शहापुर-सापगाव रस्त्यावरील भल्या मोठ्या खड्ड्यात बाईकचा अपघात होऊन मृत्यू झाला होता.आम्ही विशालच्या घरी जाऊन त्याच्या एकत्रित कुटुंबाला या घटनेबद्दल विचारले असता "आमच्या मुलाचा या रस्त्याने बळी घेतला असून ठेकेदारावर कोणत्याही प्रकारची कारवाई तर सोडाच सहानुभूती म्हणून आमची साधी विचारपूस देखील ठेकेदाराने केली नाही असे सांगितले.यावरून धनशक्ती समोर सामान्यांचा जीव हा कवडीमोल समजून हे प्रकरण वरचेवर दाबून बांधकाम विभागाला याची भनक ही लागू दिली नाही.असे रक्तबंबाळ करणारे कितीतरी अपघात शहापुर-सापगाव रस्त्यावर गेल्या दोन वर्षांत घडले गेले;पण या सर्व घटना हवेतच विरून गेल्या.पण दैनिक जनदूत हे सत्य दाखविल्याखेरीज शांत बसणार नाही.
 
हा रस्ता रखडण्याची कारणिमिमांसा शोधताना आम्ही थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचून त्यांचीही बाजू ऐकून घेतली.आमचा विरोध हा शहापुर-सापगाव रस्त्यात नव्याने हस्तांतरित होणाऱ्या जागेबद्दल आहे.आमच्या तालुक्यातून शहापुर-मुरबाड-कर्जत महामार्ग गेल्याने त्याचा फायदा इथल्याच स्थानिक लोकांना होणार असल्याने केवळ योग्य मोबदला मिळावा यासाठी आम्ही विरोध करत असून त्यामागे अन्य कोणताही हेतू नाहीय.त्यामुळे ठेकेदाराने सद्यस्थितीत असलेल्या रस्त्यावर डागडुजी करून लोकांसाठी तो रस्ता प्रवासासाठी सुरक्षित करून घ्यावा.तसेच ठेकेदाराने शेतकऱ्यांबद्दल कोणताही गैरसमज पसरवू नये अशी भावना शेतकऱ्यांनी जनदूतशी बोलताना दिली.
 
मुदतीबाहेर गेलेले काम,बांधकाम विभागाला दिलेले १० महिने पावसाळा असल्याचे बनावट उत्तर,शेतकऱ्यांचा नसलेला विरोध तालुक्यातील मीडियाला दाखवणे या सर्व कारणांनी ठेकेदाराचे पित्तळ उघडे पडले असून आता जिजाऊ कन्ट्रक्शन हटाव ची आक्रमक भूमिका तालुक्यातील जनता घेत असल्याचे चित्र सध्यातरी पहावयास मिळत आहे.जे होतंय ते उघड्या डोळ्यांनी पाहिले जाईल इतकी शहापुरची जनता षंढ नाहीय हे ठेकेदाराने लक्षात घेऊन आपल्या चूका सुधारल्या पाहिजेत. जनतेचा उद्रेक व्हायच्या आत ही कामे उरकल्यास समाजसेवेबरोबरच ठेकेदार म्हणून तूमचे बस्तान शहापुरात बसेल अन्यथा नाही.