जे का रंजले गांजले। त्यासी म्हणे जो आपुले।।

जनदूत टिम    02-Jul-2020
Total Views |
चंद्रभागेच्या वाळवंटी पांडुरंगांच्या उपासकांनी मांडलेला हा भक्तीचा खेळ आहे. यात विठ्ठलभक्त वैष्णव, वारकरी नामघोष करीत नाचतात. मग ते भजन, भारूड, कीर्तनातून विठ्ठलनामाचा घोष करत असोत की, नुसते मुखाने विठ्ठल-विठ्ठल नाम घेणारे असोत. या नामघोषात तल्लीन झालेला वारकरी पाहायचा असेल तर पंढरीची आषाढी वारी केल्याशिवाय समाधान मिळत नाही.
 
Vitthal_1  H x
 
असा हा सोहळा केवळ जगातच नव्हे, तर त्रिभुवनातही नाही आणि या सोहळ्यात मिळणारे सुखही पंढरीशिवाय त्रिभुवनात इतरत्र मिळत नाही. 'या सुखाची उपमा नाही त्रिभुवनी...' संत सेना महाराज यांनी अत्यंत चांगल्या प्रकारे आणि चांगल्या पद्धतीने सुखाचे वर्णन केले आहे. नरदेह जन्माला आल्यानंतर प्रत्येक जण सुखरूपी मृगजळामागे धावतो, मात्र, खरे सुख कुठे आहे, याचा बोध होत नसल्याने सुखाचा शोध त्याला लागत नाही. अगदी तसेच देवाचेही आहे. देव कुठे आहे, हे जर पाहायचे असेल तर संत परंपरेने दिलेल्या शिकवणीचा विचार करावा लागेल. संत तुकाराम महाराजांनी अगदी साध्या आणि सोप्या शब्दांत सांगितले आहे. 'जे का रंजले गांजले। त्यासी म्हणे जो आपुले।। तोचि साधू ओळखावा। देव तेथेंचि जाणावा ॥' अर्थात हे सांगताना 'तुका म्हणे सांगू किती। त्याचि भगवंताच्या मूर्ति॥' असे म्हणत देव रंजल्यागांजल्यांमध्ये आहे, असे ते निर्देशित करतात. याचा अर्थच असा की, देव सर्वव्यापी आहे. माणसांतच खरा देव आहे, ही सांगणारी ही शिकवण, हीच थोर परंपरा. त्यामुळे पंढरीचे वारकरी एकमेकांचे चरणरज आपल्या कपाळी लावतात. संत ज्ञानेश्वरांनी तर 'जे जे दिसे भूत, ते मानिजे भगवंत' असे म्हटले आहे.
 
अवघ्या विश्वरूप दर्शनाच्या दिशेने आलेली ही ज्ञानदेवांची शिकवण भागवत धर्मात मैलाचा दगड ठरली. 'जो आपल्या लाडक्या भक्तांसाठी धावून येतो, तो देव.' पंढरीत कानड्या विठ्ठलाचे येणेही असेच.. आई-वडिलांच्या सेवेत असलेल्या भक्त पुंडलिकासाठी देव पंढरीत आला आणि अठ्ठावीस युगे तो भक्तांसाठी विटेवर उभा आहे. 'संदर ते ध्यान उभा विटेवरी, कर कटेवरी ठेवूनिया' असे संत तुकारामांनी तर 'अठ्ठावीस युगे उभा विटेवरी, मुद्रा अगोचरी लावूनियां' असे संत नामदेवांनी वर्णन केले आहे. अशा या देवाची भक्ती, उपासना यातच खरे सुख आहे, अशी शिकवण देणारी संतांची ही परंपरा आषाढी वारीच्या रूपाने अव्याहतपणे वारकऱ्यांनी जपली आहे. म्हणूनच विठ्ठल हाच आपल्यासाठी सुखाचा सागर आहे, असे सांगताना संत नामदेव म्हणतात, 'नामा म्हणे केशवा सुखाच्या सागरा। तूं आम्हां सोईरा आदिअंतीं.'
 
एकंदर जीवनात सुखाचा शोध घेत असाल तर ते सुख पंढरीत पांडुरंगाच्या दर्शनात आहे. याच शिकवणीवर पंढरीची वारी चालते. गेल्या अनेक पिढ्यान्पिढ्या चालत आलेली पंढरीची वारी परंपरा महाराष्ट्रच नव्हे, तर जगाच्या पाठीवर असलेल्या वारकऱ्यांच्या घराघरांमध्ये जोपासली जाते. ऊन, वारा, पाऊस अंगावर झेलत, खांद्यावर पताका घेऊन पंढरीची वाट चालणारी पावले कधीच थकत नाहीत. अनाथांचा नाथ आणि दीनांचा दयाळ असलेल्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी येणाऱ्या वारकऱ्यांसाठी संत नामदेवांनी 'येऊनी जन्मासी पाहावी पंढरी। तेणें भवसागरी तरसील' हा बोध दिला आहे. अशा पांडुरंगाचा महिमा अपरंपार आहे. म्हणून संत सेना महाराजांनी 'जाता पंढरीसी सुख वाटे जीवा, आनंदे केशवा भेटतांसी' असे म्हटले आहे. त्रिभुवनातील तीर्थे शोधून पाहिली तरीही तेथे या सुखाची सर नाही, असे ते म्हणतात. कपाळी गोपीचंदन उटी लावून खांद्यावर पताका, हाती टाळ घेऊन विठ्ठलनामघोषण करीत पंढरीची वाट चालणारे लाखो वारकरी आपण वर्षानुवर्षे अनुभवतो. सध्या डिजिटल युगात अनेक कार्यक्रम होतात. सोहळे होतात. यात्रा व उत्सवही होतात.
 
अनेक तीर्थस्थळांवर भक्तांची गर्दी होते. मात्र, पंढरीत होणाऱ्या भक्तांच्या मांदियाळीची सर कुठेच येत नाही. इथं येण्यासाठी कुठलीही यात्रा कंपनी मार्केटिंग करीत नाही. कोणीही कुणालाही कसल्याही प्रकारचे निमंत्रण देत नाही. इथं कुणी मध्यस्थही नाही... तर इथं थेट संवाद आहे विठ्ठलाचा अन् त्याच्या लाडक्या भक्ताचा... इथं थेट व्यवहार आहे तो विठ्ठलाचा अन् त्याच्या वारकऱ्याचा. इथं थेट भेट आहे विठ्ठलाची अन् त्याच्या भक्ताची. इथं विठ्ठल आणि त्याचा भक्त किंवा वारकरी दोघेच आहेत... पण ते एकच आहे. संत चोखोबांच्या शब्दांत जर सांगायचे तर 'अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग। मी तूंपण गेले वायां, पाहता पंढरीच्या राया.' 'निर्मळ चित्ते झाली नवनीते' तुकारामांनी वर्णित केलेले भक्तिरसात न्हालेल्या वारकऱ्यांचे रूप खऱ्या अर्थाने 'अनुपम्य सुखसोहळा' आहे. म्हणून पंढरीच्या वारीत अर्थात आनंदाच्या डोहात सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांच्या मनात 'आनंदाचे अनंत तरंग' असतात. या तरंगातूनच अंतरंग खुलते, फुलते... ज्यातून सुख आणि सुखच मिळते. हेच सुख परमात्याशी एकरूप करते, तादाम्य पावते. अशी ही परमात्म्याशी एकरूप करणारी पंढरीची वारी यंदा कोरोनामुळे हुकली, याची हुरहुर अवघ्या वैष्णव जनांना कायमच राहील.