देर आए, दुरुस्त आए

उमेश मारुती भेरे    02-Jul-2020
Total Views |

- समन्वयाच्या अभावाने शहपूरात कोरोनाचा प्रादुर्भाव : माजी आमदार पांडुरंग बरोरा
- आपत्ती व्यवस्थापन प्रमुखांचा शहापूर पॅटर्न फेल : आमदार दौलत दरोडा

शहापूर : शहापूरात कोरोनाने अडीच शतकाला गवसणी घातली आहे, ही बाब शहापूर तालुक्यासाठी अतिशय चिंताजनक आहे. पूर्ण विश्व या महामारीने ग्रासले असल्याने आपलीही इतक्या सहजासहजी त्यातून सुटका होणे शक्य नाही ही बाब मान्य करावी लागेल. पण शेजारच्या मुरबाड तालुक्यात आपल्या आधी कोरोनाने एन्ट्री करून सुद्धा त्या ठिकाणी कोरोना आत्ता पन्नाशी गाठता गाठता आपण अडीच शतकी वाटचाल करीत आहोत, तरी आपण शहापूर पॅटर्नच्या नावाने हरभऱ्यांच्या झाडावर चढून ओरडत बसलो आहोत. या सगळ्या पार्श्वभूमीवर आमदार दौलत दरोडा यांच्या कार्यपद्धतीवर तालुक्यातील जनता काही प्रमाणात नक्कीच नाराज आहे. तर माजी आमदार पांडुरंग बरोरा यांच्या गेल्या पाच वर्षातील जनसंपर्क लक्षात घेता या काळात त्यांच्या कडून ही काही प्रमाणात निराशा झाली होती. पण ते पुन्हा सक्रिय झाल्याने विद्यमान आमदार दौलत दरोडा यांना सुद्धा आपोआप सक्रिय व्हावेच लागे. तालुक्यातील या पडत्या काळात लोकांना सावरायला राजकीय द्वंद्व रांगल्यास देर आए, दुरुस्त आए असच म्हणावं लागेल.
 
DARODA-BARORA_1 &nbs
 
अतीमहत्वाच्या समन्वय बैठकीला आमदार गैरहजर
पालकमंत्र्यांसोबत सर्वपक्षीय नेते आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांबरोबर एक ही समन्वय बैठक बोलावली गेली नसल्याने एक समन्वय बैठक होणे गरजेचे असतांना आपल्या सूचनेनुसार आपत्ती व्यवस्थापन प्रमुख नीलिमा सूर्यवंशी यांनी कालची समन्वय बैठक बोलावली होती असे माजी आमदार पांडुरंग बरोरा यांचे म्हणणे आहे. शहापूर पॅटर्न फेल जाण्यामागे आमदारही जबाबदार असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांना सूचना देऊन आमदारांनी नेत्रुत्व करणे गरजेचे होते. तसे झाले नाही म्हणून कोरोनाचा प्रादुर्भाव तालुक्यात वाढत आहे.
 
आपत्ती व्यवस्थापन प्रमुख अपयशी असल्याचे माजी आमदारांनी आधीच डोलखांब येथील बैठकीत म्हटले होते. वासिन्दला कोरोनाने कहर केला असून ७७ रुग्ण झाले. तरी ही रूग्णसंख्या झपाट्याने वाढतच आहे.लोकांची प्रतिकार शक्ती वाढावी म्हणून २५ हजार लोकांना जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील यांच्या मार्फत आर्सेनिक अल्बम ३० ह्या गोळ्या वाटप करून कोरोनाला रोखण्यासाठी प्रयत्न माजी आमदारांकडून सुरू आहे. शहापूर मधील चोवीस पैकी एक रुग्ण आक्टिव असला तरी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू शकतो म्हणून ४ जुलै पासून १४ दिवस तालुक्यात कडक लॉकडाऊन होणार आहे. म्हणजे आता उशिरा का होईना पण शहपूरात बरोरा पॅटर्न राबवला जाणार आहे.
 
आपत्ती व्यवस्थापन प्रमुखांचा शहापूर पॅटर्न फेल - आमदार दौलत दरोडा
काल झालेल्या समन्वय बैठकीला आमदार गैरहजर असल्याने विरोधकांनी त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे.पत्रकारांवर प्रशासनाकडून कायद्याचा धाक दाखवून दडपशाही करणे, एकाच पक्षाच्या जिल्हाध्यक्षाला बोलावून बाकी जिल्हाध्यक्षाना न बोलावणे, खासदारांना न बोलावणे, आपत्ती व्यवस्थापन फेल जाणे याच्या निषेधार्थ आपण कालच्या बैठकीला गैरहजर राहिल्याचे स्पष्टीकरण आमदारांनी दिले आहे. शहापूरच्या आपत्ती व्यवस्थापन प्रमुखांचा शहापूर पॅटर्न फेल झाल्याने पुन्हा जर लॉकडाऊनचा निर्णय झाल्यास तो काटेकोर पाळला जावा यासाठी आपण लक्ष देणार आहोत असे त्यानी म्हटले आहे. आधीच्या पंधरा दिवसांचा लॉकडाऊन काटेकोर न पाळल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव झाला आणि हे आपत्ती व्यवस्थापनाचे अपयश असल्याचा आरोप आमदारांनी केला आहे.
 
शासकीय मीटिंग ला आजी - माजी आमदार बोलवावेत पण एकाच पक्षाचे जिल्हाप्रमुख का का बोलावले असा सवालही त्यांनी केला आहे. शिवसेनेचे ग्रामीणचे ठाणे जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते , मग त्यांना निमंत्रित केले असतांना राष्ट्रवादी - भाजपा - कॉंग्रेसच्या जिल्हा अध्यक्षांना का निमंत्रण दिले नाही तसेच शासकीय मीटिंग मध्ये आपत्ती व्यवस्थापन प्रमुख असा दूजाभाव कसे करू शकतात असा प्रश्न आमदारांनी केला आहे .त्याच्या निषेधार्थ या सभेला आपण उपस्थित राहिलो नाही असे आमदारांनी स्पष्टीकरण दिले आहे.
 
आजी - माजी आमदारांमध्ये कोरोनाच्या तीन महिन्यांनंतर राजकीय द्वंद्व रंगू लागल्याने मात्र कोरोना रोखण्यासाठी चढाओढ पाहायला मिळावी अशी सर्व नागरिकांची अपेक्षा राहील. तालुक्याचे आपत्ती व्यवस्थापन कोरोना रोखण्यात अपयशी झाल्याचे मत आजी - माजी आमदार सुरात सूर मिळवून व्यक्त करीत असूनही प्रशासनावर कोणत्याही लोकप्रतिनिधीला अजूनपर्यंत अंकुश मिळवता आला नाही ही संपूर्ण तालुक्याची खंत आहे.