साठे यांची आठवण गावाकडं राहिली...

जनदूत टिम    18-Jul-2020
Total Views |
सध्या साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरु आहे. सुरु आहे म्हणजे सरकारने तशी घोषणा केलेली होती. प्रत्यक्षात सगळ्या शोषित समाजाला एकदिशा देणारे साहित्य ज्यांच्या लेखणीतून क्रांतीच्या ठिणग्या घेऊन उतरले, त्या अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दीची सरकारी पातळीवर कसलीही लगबग दिसत नाही. सरकारने अण्णाभाऊ साठे महामंडळाला जन्मशताब्दीनिमित्त एक कोटी रुपये मंजूर केले होते. पण कोरोना आडवा आला.
 
anna_bhau_sathe_1 &n
 
अण्णाभाऊंच्या साहित्याला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली. सरकारने अण्णाभाऊंच्या साहित्य संपदेचे खंडरूपाने खंड क्र.१ व खंड क्र. २ चे प्रकाशनही तीन वर्षांपूर्वी १ मे २०१७ रोजी महाराष्ट्र दिनी मुंबईत राजभवनवर केले होते. दुर्दैव हे की, अण्णाभाऊंच्या जन्मशताब्दी वर्षातही अण्णाभाऊंच्या साहित्यखंडाचा तुडवडा निर्माण झाला आहे. या खंडांच्या पुरेश्या प्रतीही शासकीय ग्रंथागारात उपलब्ध नसल्याने साहित्यिक, वाचक आणि चाहत्यांच्या वर्तुळात नाराजीचा सूर उमटत आहे. या खंडांच्या प्रत्येकी पाच हजार प्रती शासनाने काढल्या होत्या आणि या क्रांतिकारक लोकशाहीराचे काम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावे या भूमिकेतून जाणीवपूर्वक खंडांची किंमत अतिशय माफक म्हणजे प्रत्येकी रुपये १२५ रुपये ठेवली होती. म्हणजे केवळ सव्वाशे रुपयात अण्णाभाऊंच्या दहा कादंबऱ्या त्या खंडांमध्ये समाविष्ट आहेत.
 
वा खंडांच्या संपादकीय मंडळाचे अध्यक्ष नांदेडचे प्रा. दत्ता भगत होते. लातूरचे प्रा. डॉ. माधवराव गादेकर हेही संपादकीय मंडळावर सदस्य होते. त्यांच्या या समितीने अण्णाभाऊंच्या साहित्य संपदेचे सात खंडांचे काम करून ठेवले आहे. पण सरकारने फक्त दोनच छापले. तिसरा खंड तर फक्त छापायलाच जायचा राहिलाय बाकी सगळे साहित्य तयार आहे. पण बजेट नाही. त्यात पुन्हा सरकार बदलले म्हणून मग समितीही बदलली.तीन तरी खंड व्हावेत म्हणून त्या समितीने तयारी केली होती, असे डॉ. गादेकर म्हणाले. भाजपचे सरकार गेले. आता आलेले नवीन सरकार दररोज पुरोगामी विचारांचे ढोल बडवीत असते. मागच्या सरकारच्या सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेचे आता नव्या सरकारात मुख्यमंत्री आहेत, शिवाय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना रोज शाहू-फुले-आंबेडकरांचे नाव घेतल्याशिवाय घास जात नाही. तरीदेखील लोकशाहीर अण्णाभाऊ साठेच्या जन्मशताब्दी वर्षात अण्णाभाऊंच्या साहित्यखंडांचा तुटवडा निर्माण झाला आहे. या जन्मशताब्दी वर्षाची आता पुढच्याच महिन्यात २० ऑगस्ट २०२० रोजी सांगता होईल. उद्याच म्हणजे १८ जुलै ला अण्णाभाऊंचा स्मृतिदिन आहे, त्याचे औचित्य साधून सरकारला आठवण करून देण्याचा हा प्रयत्न. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत अण्णाभाऊंनी स्वतःला झोकून दिले होते. १९४४ साली शाहीर अमर शेख आणि गव्हाणकर यांच्या मदतीने त्यांनी 'लाल बावटा' कलापथक स्थापन केले. या कलापथकावर तत्कालीन सरकारने बंदी घातली होती.
 
त्यांनी ३५ कादंबऱ्या लिहिल्या. त्यातील फकिरा, वारणेचा वाघ, माकडीचा माळ, चिखलातील कमळ, वैजयंता, वैर, अलगुज वगैरे १९ कादंबऱ्यांचा या दोन खंडांमध्ये समावेश आहे. त्यांच्या बऱ्याच कादंबऱ्यांवर चित्रपट निघाले. 'जग बदल घालुनी घाव... गेले सांगूनि मज भीमराव' हे त्यांचे गीत तर खूप गाजले. त्यांनी लिहिलेल्या लावण्यांमधील 'माझी मैना गावाकडं राहिली' आणि 'मुंबईची लावणी' या अजोड आणि अविस्मरणीय लावण्यांनी अख्या महाराष्ट्राला वेड लावले होते. 'पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तरली नसून ती श्रमिकांच्या व दलितांच्या तळहातावर तरलेली आहे' हाच त्यांच्या लेखनाचा प्रेरणास्रोत होता. महाराष्ट्रातील विद्यापीठांत अण्णाभाऊंवर अकरा पेक्षाही अधिक प्रबंध सिद्ध केले गेले आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात त्यांच्या सन्मानार्थ अण्णाभाऊ साठे अध्यासन सुरु करण्यात आले.
 
केवळ भारतीयच नव्हे, तर २२ परकीय भाषांत अण्णाभाऊंच्या कथा कादंबऱ्यांची भाषांतरे झाली आहेत. दहा बारा वर्षांपूर्वी महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाने अण्णाभाऊंचे समग्र साहित्य प्रकाशित केले होते. अल्पावधीत ती आवृत्ती संपली, असे असताना अण्णाभाऊंच्या साहित्याची ओळख नव्या पिढीला व्हावी, वाचक व अभ्यासकांनाही ते सहज कमी किमतीत उपलब्ध व्हावेत या भूमिकेतून सरकारने अण्णाभाऊंचे दोन खंड प्रकाशित केले. परंतु आता अण्णाभाऊंच्या जन्मशताब्दी वर्षातही शासकीय ग्रंथागारात हे खंड उपलब्ध नसल्याने साहित्य वर्तुळात निराशेचा सूर उमटत आहे. दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या पुरोगामी विचारांचा वारसा लाभलेले अमित देशमुख हेच सध्या राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आहेत. त्यांनीच पुढाकार घेऊन आता हे केले पाहिजे. सरकारच्या या संदर्भातील मौनाची भाषांतरे तेच
करू शकतील.