कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाचा “नॅशनल इन्फ्रा पाइपलाइन” या योजनेत समावेश करण्यासाठी केंद्राकडे प्रस्ताव पाठवा - आ. राणाजगजीतसिंह पाटील

जनदूत टिम    13-Jul-2020
Total Views |
उस्मानाबाद : उस्मानाबाद जिल्ह्यासाठी अत्यंत महत्वाचा असणारा कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प तातडीने पूर्णत्वाकडे जावा यासाठी नॅशनल इन्फ्रा पाइपलाइन या योजनेत याचा समावेश होणेसाठी राज्य सरकारकडून सविस्तर प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविणे गरजेचे आहे.
 
rana-patil_1  H
 
या अनुषंगाने संबंधित अधिकाऱ्यांची बैठक बोलवण्यात यावी, त्यांना योग्य ते निर्देश देण्यात यावेत व कृष्णा मराठवाडा प्रकल्पाचा नॅशनल इन्फ्रा पाइपलाइन च्या ६५०० प्रकल्पांमध्ये समावेश व्हावा यासाठी केंद्र सरकारकडे आवश्यक प्रस्ताव तातडीने पाठविण्यात यावा अशी मागणी आ.राणाजगजीतसिंह पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
 
उस्मानाबाद जिल्हा निती आयोगाने निवडलेल्या देशातील ११५ आकांक्षित जिल्ह्यांपैकी एक आहे. जिल्ह्याचे अर्थकारण केवळ शेतीवर अवलंबून आहे. अनेक वर्षे सलग कमी पर्जन्यमान, भूगर्भातील पाण्याची पातळी कमी होणे, जिल्ह्यात शेतकरी आत्महत्त्याचे प्रमाण वाढणे अशा अनेक संकटाना सामोरे जात येथील शेतकरी उभा आहे.शेतीला शाश्वत सिंचन उपलब्ध होण्यासाठी कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प हा एकमेव पर्याय असल्याचे आ.पाटील यांनी पत्रात नमूद केले आहे.
 
उस्मानाबाद जिल्हयासाठी कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प अत्यंत महत्वाचा आहे. सदर प्रकल्पाची किंमत रुपये ४८४५.०५ कोटी असून यातील पहिल्या टप्यातील ७ टि.एम.सी. पाणी वापरासाठी रुपये २३४९.१० कोटीचे काम ‍दि.२७.०८.२००९ च्या शासन निर्णयान्वये देण्यात आलेल्या प्रशासकीय मान्यतेने चालु आहे. परंतू सध्यस्थितिला शासनाने आखून दिलेल्या प्रकल्पाच्या कामांच्या प्राधान्य क्रमामध्ये लिंक-५, उध्दट बॅरेज, जेऊर बोगदा व उपसा टप्पा क्रं. १ ची कामे पूर्ण करावीत असे नमुद करण्यात आले आहे. त्यामुळे टप्पा क्रं. २ अंतर्गत पांगरदरवाडी साठवण तलाव ते रामदरा साठवण तलाव ही कामे अद्याप बाकी असल्याची माहिती आ.पाटील यांनी दिली आहे.
 
आ.पाटील यांनी या प्रकल्पाच्या कामासाठी निधी मिळावा म्हणून जिल्ह्यातील १ लाख शेतकऱ्यांच्या सह्यांचे दिलेले निवेदन, निधी उपलब्ध करून देण्यासाठी मा.राज्यपाल महोदय यांना भेटून घातलेलं साकडे ,विधिमंडळात याबाबत सातत्याने उठवलेला आवाज , तत्कालीन मुख्यमंत्री व जलसंपदा मंत्री यांना भेटून सदर प्रकल्पाला राष्ट्रीय प्रकल्प घोषित करून त्याला केंद्र सरकारच्या माध्यमातून निधी मिळवण्याबाबत केलेली मागणी आदींचा पत्रात उल्लेख केला आहे.
 
तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकारने आत्महत्याग्रस्त १४ जिल्ह्यांसाठी व उर्वरित महाराष्ट्रातील अवर्षणप्रवण भागातील सिंचन प्रकल्पाची बळीराजा सिंचन योजना तयार करून त्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे सादर केला व केंद्र सरकारची मान्यता मिळाल्यावर दि.०८.०८.२०१९ रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्यातील ५२ सिंचन कल्पासाठी रुपये १५००० कोटींचे कर्ज घेण्यासाठी मान्यता देत कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाचा यात समावेश केला होता व त्यासाठी रुपये ३१०० कोटींहून अधिक वित्तीय तरतूद कण्याचे नियोजन केले होते.तत्कालीन सरकारच्या या निर्णयामुळे रखडलेल्या कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाला गती मिळेल व तो लवकर पूर्ण होईल अशी या भागातील शेतकऱ्यांना आशा निर्माण झाली होती असे आ.पाटील यांनी म्हटले आहे.
 
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांनी दि.१५.०८.२०१९ रोजी लाल किल्ल्यावरून देशवासियांना संबोधित करताना पुढील पाच वर्षांत रुपये १०० लाख कोटींची गुंतवणूक पायभूत सुविधांमध्ये करू, अशी घोषणा केली आहे.यात आरोग्य, शिक्षण, रेल्वे, विमानतळ, मेट्रो, सिंचन, महामार्ग अशा विविध क्षेत्रांमध्ये मिळून ६५०० प्रकल्पांची एक मालिकाच तयार केली असून येत्या पाच वर्षांमध्ये "नॅशनल इन्फ्रा पाइपलाइन" अंतर्गत रुपये १०० लाख कोटींची तरतूद करण्यात येणार आहे. "नॅशनल इन्फ्रा पाइपलाइन" ही योजना थेट प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांचा ड्रीम प्रोजेक्ट असल्याने याला शाश्वत निधी उपलब्ध असणार आहे.त्यामुळे उस्मानाबाद जिल्ह्यासाठी अत्यंत महत्वाचा असणारा कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प तातडीने पूर्णत्वाकडे जावा यासाठी "नॅशनल इन्फ्रा पाइपलाइन" या योजनेत याचा समावेश होणेसाठी राज्य सरकारकडून सविस्तर प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवा अशी मागणी आ.राणाजगजीतसिंह पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.