वंदेभारत अभियाना मार्फत ५३ देशातून ३५ हजार ९७१ प्रवासी मुंबईत दाखल

जनदूत टिम    13-Jul-2020
Total Views |
मुंबई : वंदेभारत अभियानांतर्गत आतापर्यंत ५३ देशातून आणि २३९ विमानांच्या माध्यमातून तब्बल ३५ हजार ९७१ प्रवासी मुंबईत दाखल झाले आहेत. यामध्ये मुंबईतील प्रवाशांची संख्या १२ हजार ५७० आहे. उर्वरित महाराष्ट्रातील प्रवाशांची संख्या १२ हजार २९५ तर इतर राज्यातील प्रवाशांची संख्या ११ हजार १०६ आहे. दिनांक १५ जुलै २०२० पर्यंत आणखी ४० विमानांनी प्रवासी मुंबईत येणे अपेक्षित आहे.
 
Air-india_1  H
 
राज्यातील नागरिकांना मुंबईत उतरवून घेऊन त्यांना कॉरंटाईन करण्याची जबाबदारी महाराष्‍ट्र शासनामार्फत पार पाडली जात आहे.
 
या देशातून आले प्रवासी
अफ्रिका, इंडोनिशिया, नेदरलँड, जपान, श्रीलंका, म्यानमार, टांझानिया,स्पेन,आर्यलँड, कतार, हाँगकाँग, कझाकीस्तान, मॉरिशियस, ब्राझील, थायलंड, केनिया,मियामी,व्हियतनाम, इटली, स्विडन, इथोपिया, रोम, जर्मनी,दुबई,मालावी,वेस्ट इंडिज,नॉर्वे, कैरो, युक्रेन,रशिया, मादागास्कर, नायजेरिया,ऑस्ट्रेलिया, न्युझिलंड सौदी अरेबिया, कॅनडा, पूर्व अफ्रिका, फ्रान्स, नैरोबी, न्युयॉर्क, जॉर्जिया, कामेरुन, युनायटेड अरब अमिराती, कांगो अशा विविध ५३ देशातून प्रवासी मुंबईत दाखल झाले आहेत.
 
बृहन्मुंबईतील प्रवाशांसाठी संस्थात्मक कॉरंटाईनची सुविधा विविध हॉटेल्समध्ये करण्यात आली आहे. इतर जिल्ह्यातील व राज्यातील प्रवाशांना त्यांच्या जिल्हा मुख्यालयी पाठविण्याचे काम जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर यांच्या मार्फत करण्यात येत आहे. हे प्रवासी त्यांच्या जिल्ह्यात गेल्यानंतर त्यांच्या जिल्हाधिकारी तसेच महानगरपालिका आयुक्तांमार्फत त्यांना कॉरंटाईन करण्याचे काम करण्यात येत आहे.
 
मार्गदर्शक सुचनेनुसार आलेल्या प्रवाशांना कॉरंटाईन करण्याचे काम करण्यात येत आहे. इतर राज्यातील प्रवाशांचे वाहतूक पासेस संबंधित राज्याकडून प्राप्त होईपर्यंत या प्रवाशांना मुंबईतील कॉरंटाईन सेंटरमध्ये ठेवले जात आहे. तसेच या प्रवाशांचे वाहतूक पास संबंधित राज्याकडून प्राप्त होताच त्यांना त्यांच्या राज्यात पाठविण्यात येत आहे. वंदेभारत अभियानातील कामकाज जिल्हाधिकारी कार्यालय, मुंबई उपनगर,बृहन्मुंबई महानगरपालिका, प्रादेशिक परिवहन अधिकारी, बेस्ट, महाराष्ट्र राज्य रस्ते वाहतूक महामंडळ, भारतीय विमानतळ प्राधिकरण, मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्राधिकरण लि. यांच्या समन्वयाने केले जात आहे.