आत्मनिर्भर कोकण

जनदूत टिम    09-Jun-2020
Total Views |
कोकणातला माणूस हा जन्मापासूनच आत्मनिर्भर आहे कितीही मोठी आपत्ती आली तरीही तो त्याचा बाऊ करत नाही. फयान वादळ आले ,ओख्खी वादळ झाले,अतिवृष्टी झाली ,भूसक्खलन झाले,शेती वाडी सगळ्याचे नुकसान झाले पण त्याने कधीच कोणाकडून मदतीची अपेक्षा केली नाही.
 
Kokan_1  H x W:
 
बुधवारी निसर्ग नावाचे वादळ घेऊन विधाता संपूर्ण कोकणच्या जीवावर उठला होता आणि त्याने यथेच्च विध्वंस केला तरीही कोंकणी माणूस हा आज सकाळी उठून कोणाच्याही मदतीची अपेक्षा न करता स्वतःचे नुकसान विसरून स्वतःचा परिसर साफ करायला लागला !!!
 
हेच कोल्हापूर , औरंगाबाद, मराठवाडा ,विदर्भ असते तर एव्हाना मदतीचा ओघ सुरू झाला असता पत्रकार अहोरात्र कव्हरेज करताना दिसले असते पण इथे कोंकणात जीवितहानी झाली नाही ना त्यामुळे "मसाला" म्हणावा तसा त्यांना मिळाला नसेल. असो मला खात्री आहे, माझ्याही आमराईचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे पण आम्ही कोकणवासी मुळातच आत्मनिर्भर आहोत, राहू, पण फुटेज मिळवण्यासाठी इथल्या गरीब माणसाने सुद्धा कधीच आत्महत्या केली नाही आणि करणार तर नाहीच नाही कितीही नुकसान झाले तरी आम्ही खंबीर आहोत आणि राहू !!!
 
मुख्यमंत्री हे यंत्रणा सुसज्ज आहे असे सांगतात , जिल्हा प्रशासन सुसज्ज असल्याचे सांगतात पण आमाचे दुर्ग सरंक्षक मंडळ तसेच तरुणाई एन डी आर एफ च्या अगोदर अडचणीच्या ठिकाणी पोहचून रस्ते मोकळे केले जिल्हा प्रशासनाचा उपयोग झाला तो फक्त आदेश देण्यापुरताच त्यांची कामे करण्यात सुद्धा याच तरुणाईचा हात होता. आत्तापर्यंत प्रत्येकजण कोणत्याही मदतीची अपेक्षा न करता स्वतःच स्वतःचे आवार साफ करत आहे !!!
 
अनेक जणांच्या घराचे पत्रे उडालेत घरे भिजलीत पावसाळचे साठवणूक केलेल्या अन्न धान्याचे वाटोळे झाले. पोटच्या पोरा सारखी वाढवलेली आंब्याची, माडाची सुपारीची झाडे बागेत कोलमडून पडलेत त्या सोबत त्यांचे भविष्य सुद्धा कोलमडले आहे, पण कुठलाही आक्रोश नाही, आदळा आपट नाही, सरकार विरोधी निदर्शने नाहीत, हेच जर उत्तर प्रदेश मध्ये घडले असते तर ही राष्ट्रीय आपत्ती जाहीर झाली असती पण आम्ही मुळातच आत्मनिर्भर असल्यामुळे पंतप्रधान सुद्धा राष्ट्राला संबोधित करून ही राष्ट्रीय आपत्ती जाहीर करणार नाहीत याची खात्री आम्हाला आहे !!! कदाचित आपल्या पंतप्रधानांना कोकणी माणसावरूनच आत्मनिर्भरतेची कल्पना सुचली असावी.
 
शेवटी शिक्काच लागलाय ना की कोकणची माणसं साधी भोळी काळजात त्यांच्या भरली शहाळी ..... सार्थ अभिमान आहे कोकणवासी असल्याचा !!!