बंधपत्रीत अधिपरिचारीकांना प्राधान्यानेशासकीय सेवेत सामावून घेण्यात यावे - विधानसभा अध्यक्ष नाना पटोले

जनदूत टिम    09-Jun-2020
Total Views |
मुंबई : राष्ट्रीय आरोग्य अभियान (एन.एच.एम.) अंतर्गत सेवा बजावलेल्या बंधपत्रीत अधिपरिचारीकांना यापुढील शासकीय सेवेतील भरती प्रसंगी प्राधान्याने सेवेत सामावून घेण्यात यावे.
 
Nana Patole 1_1 &nbs
 
COVID 19 साथरोग तसेच अन्य आरोग्य सुविधांच्या बाबतीत अधिपरीचारीकांचे योगदान अत्यंत महत्वाचे ठरले आहे. बंधपत्रीत अधिपरीचारीकांपैकी अनेकांनी शासकीय सेवेतील प्रवेशाची वयोमर्यादा ओलांडली आहे. त्यांना अचानक सेवेतून कमी करणे उचित नाही, यादृष्टीने सहानुभूतीपूर्वक धोरण आखणे आवश्यक असून त्याबाबतची कार्यवाही करण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले.
 
आज विधान भवन, मुंबई येथे नागपूर विभागातील बंधपत्रित अधिपरिचारीकांच्या सेवा समस्यांसदर्भात एका बैठकीचे आयोजन करण्यात आले, त्यात यासंदर्भात सविस्तर चर्चा झाली. राज्यातील काही जिल्हा परिषदांमध्ये या अधिपरिचारीकांना सेवेत कायम करण्यात आले तर काही जिल्हयांमध्ये असे झाले नाही. ही उणीव दूर व्हावी आणि नागपूर विभागात भंडारा, गोंदिया जिल्हयात यापुढील भरतीप्रसंगी अशा अधिपरिचारीकांना प्राधान्याने कायम करण्यात यावे, असे निर्देश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले आहे. या बैठकीस राष्ट्रीय आरोग्य अभियानचे आयुक्त अनुपकुमार यादव व संबंधित अधिकारी उपस्थित होता.
 
साकोली, लाखनी व लाखांदूर नगर पालिका पाणीपुरवठा योजनांना तातडीने प्रशासकीय मान्यता द्या -विधानसभा अध्यक्ष नाना पटोले
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणांअंर्तगत भंडारा जिल्हातील लाखनी, लाखांदूर व साकोली येथील नगर पालिकेच्या नळ पाणीपुरवठा योजनांसदर्भात आज विधान भवन, मुंबई येथे विधानसभा अध्यक्ष, नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक आयोजित करण्यात आली. बैठकीस भंडारा जिल्हयाचे पालकमंत्री सुनिल केदार आणि संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. या तीनही योजनांसाठी तातडीने जागा उपलब्ध करुन देण्याचे आदेश पालकमंत्री सुनिल केदार यांनी जिल्हाधिकारी, भंडारा यांना दिले. या योजनांसाठी प्रशासकीय मान्यता आणि अन्य आवश्यक बाबींची तातडीने पूर्तता करण्याबाबत कार्यवाही करण्याच्या सूचना पटोले यांनी यावेळी दिल्या.